केकच्या विविध कृती


पाऊंड केक

pound cake साहित्य – अंडी 4 (वजन अंदाजे 200 ग्रॅम), मैदा 200 ग्रॅम, बेकींग पावडर 1 सपाट टीस्पून, चिमूटभर मीठ, साखर 200 ग्रॅम, मार्गरिन 200 ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून.

कृती – 1) ओव्हन चालू करून 180 अंशावर तापवावा.

2) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा.नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा.मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे.

3) मैदा, बेकींग पावडर व मीठ एकत्र करुन तीनदा चाळून घ्यावा.

4) अंडी, मार्गरिन व साखर ह डमिक्सर किंवा इलेक्ट्रीक बीटर किंवा मिक्सर वापरुन साधारणपणे साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.

5) ह्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर हळूहळू घालत एका दिशेने गोलाकार मिश्रण फेटावे म्हणजे गुठळया होणार नाहीत. मैदा घातल्यानंतर मिक्सर वापरू नये. हाताने लाकडी किंवा प्लॅस्टीकचा चमचा वापरून मिश्रण फेटावे.

6) हे तयार मिश्रण टीनमध्ये घालावे.

7) साधारण 20 मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.

8) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. जाळीवर केक काढल्याने केकला दोन्ही बाजूनी हवा लागते. थंड झाल्यावर तुकडे कापावेत.

आदिती पातकर

अ‍ॅपल केक

apple cake साहित्य – ३ मध्यम सफरचंद, पाणी ३ टीस्पून, मैदा २५० ग्रॅम, कोको पावडर १ टीस्पून, बेकींग पावडर १/४टीस्पून, सोडा १/२ टीस्पून, मीठ १/४ टीस्पून, लवंग, दालचिनी, जायफळ पूड (सर्व मिळून १ टीस्पून), अंडी २, मार्गरिन १२५ ग्रॅम, साखर १८० ग्रॅम, किसमिस ५० ग्रॅम.

कृती – १) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.

२) मैदा व बेकिंग पावडर,कोको पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.

३) सफरचंद धुवून मधला बिया व दांडा काढून घ्यावा. सफरचंदाचे ८ तुकडे करावे. त्यात पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये घालून घुसळून घ्यावे.

४) त्यात अंडी, मार्गरिन व साखर घालून घुसळून घ्यावे.

५) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.

६) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.

७) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.

८) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.

९) हा केक पार्टीकरिता अगदी उत्तम आहे. २-३ दिवस आधी केला तरी चालतो. हवे असल्यास चॉकलेट सॉस वरून घालावा.

आदिती पातकर