कणखर मन आणि कणखर शरीर खेळाच्या मैदानावरच तयार होते – भीष्मराज बाम
रोजच्या जगण्यात आपण संताप, अस्वस्थता, चिंता अश्या अनेक नकारात्मक भावना निर्माण करतो आणि स्वत:ला चालू असलेल्या कामातून ‘लक्ष केंद्रित’ करण्यापासून परावृत्त सुद्धा करतो. ह्या ‘नादाला’, ‘अविरत चालणा-या किलबिलला,’ सगळेजण ‘चंचल मन’ ही संज्ञा देतो. जे वर्तमानात असूनही भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दल विचार करण्यात मग्न असतं! पतंजली ऋषींनी ‘योग दर्शन’ मध्ये ‘अष्टांगीक योगा’ मार्फत मन नियंत्रित करण्याची सूत्रे सांगितली आहेत. हा समृद्ध सांस्कृतिक वारसा नुसता अभ्यासलेलाच नाही तर त्याचा आपल्या दैनंदिन, रोजच्या आयुष्यासाठी, व्यावहारीक दृष्टीकोनातून कसा उपयुक्त होईल हे ‘श्री भीष्मराज बाम’ यांनी दाखवून दिलं.
श्री. भीष्मराज बाम यांच आयुष्य विविध सकारात्मक छटांनी भरलेलं होतं. श्री. बाम यांचा जन्म हैदराबाद येथे १ ऑक्टोबर, १९३८ साली झाला. श्री. बाम यांनी उस्मानिया विद्यापीठामधून अॅप्लाईड मॅथेमॅटीक्स आणि स्टॅटीस्टीक्स विषयांमध्ये प्रथम श्रेणीची बी.ए. पदवी मिळवली होती. ‘रँगलर परांजपे’ यांचे ते लाडके विद्यार्थी होते. एम.पी.एस.सी. परीक्षा पास होऊन ते १९६३ साली ‘डेप्युटी सुपरिटेन्डेन्ट ऑफ पोलिस’ या पदावर महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले. एप्रिल १९७३ त फेब्रुवारी १९८२ सालापर्यंत ते सुपरिटेन्डेन्ट ऑफ पोलिस म्हणून कार्यरत होते. १९९६ साली असिस्टन्ट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर या पदावर उत्तम रीत्या काम करुन ‘जॉइंट डायरेक्टर-इंटेलिजन्स ब्युरो’ या पदावरुन निवृत्त झाले. पोलिस खात्यात असतांना सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये श्री बाम यांना विशेष रस होता. महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. १९८७ साली ‘‘स््लीप डीस्क’’ मुळे दुखापत झाली आणि त्यामुळे सहा महिने पूर्ण आराम सांगितला गेला. याच काळात कॅप्टन सोलोमन झायकेल या नेमबाजी प्रशिक्षकाने ‘मानसिक प्रशिक्षण’ या विषयावर माहिती तसेच जगाच्या विविध भागांमधून प्रसिद्ध झालेली पुस्तकं त्यांना दिली. श्री. बाम यांनी ती सगळी पुस्तकं वाचून काढलीच पण भारतीय तत्वज्ञानाशी त्याची सांगड घालून स्वत:ची ‘मानसिक प्रशिक्षणाची’ सूत्रं तयार केली. ‘विज्युअलायजेशनची तंत्रे,’ ‘उत्तमाची साधना,’’ ‘योग न्यास’, ही सगळी तंत्रे स्वत:च्या पद्धतीने आणि दुस-याला फायदेशीर ठरतील अशा रीतीने प्रगत केली. बाम सर स्वत: खेळाडू असल्यामुळे त्यांनी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना ‘योग आणि मन’ एकत्र गुंफवून मानसिक तंत्रज्ञानाचे धडे दिले. त्यातूनच ‘क्रीडा क्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ’ नावारुपाला आला. प्रथम बाम सरांनी भारतीय नेमबाजी संघाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मानसिक दबावाशी झुंज द्यायला त्यांनी खेळाडूंना शिकवलं. म्हणूनच भारतीय नेमबाजी संघातील खेळाडू बाम सरांना प्रेमाने ‘गॉड फादर’ म्हणत असत.
पुढे बाम सरांनी बिलियडर्स, स्नूकर, बॅटमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, पोहणे, टेनिस, गोल्फ अशा विविध क्रीडा क्षेत्रातील खेडाळूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. क्रिकेटमध्ये बाम सरांनी राहुल द्रविडला दिलेल्या प्रशिक्षणाने त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला. २००० साली कॉमनवेल्थ स्पर्धांमधून अंजली भागवतने सुवर्णपदक मिळवले. बाम सरांनी सचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरुर, पी गोपीचंद, अशोक पंडित, गगन नारंग, मोनाली गो-हे ह्यांना प्रशिक्षण दिले. फक्त क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर समुपदेशन आणि मार्गदर्शनच नव्हे तर गृहचारिणी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सगळ्यांना त्यांनी अडचणींना तोंड कसं द्यायचं ते शिकवलं. राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनासुद्धा त्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरलं. हे सगळं बाम सर ‘बिनशर्त’ करायचे, अगदी आईचं आपल्या लेकरावर प्रेम असतं तसं !
“बाम सरांच्या शिष्यांची, स्नेहीजनांची त्यांना आदरांजली”
अविनाश धर्माधिकारी
पोलिस खात्यात काम करताना आपल्यातला ‘माणूस’ जागा ठेवता येतो, कर्तव्य कठोरता आणि संवेदनशीलता या गोष्टी परस्पर विरुद्ध नाहीत. अधिकारी आपल्या अहंकारासाठी नाहीत तर लोकसेवेसाठी आहेत हे प्रत्यक्ष जगून शिकवणारे बाम सर पोलिस अधिका-यांच्या प्रस्थापित प्रतिमेत न बसणारा साधा, सात्विक चेहरा. मीही आय.ए.एस. सेवेत असताना सरांशी संबंध आला. आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले. म्हणून सर चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक विश्वस्त आहेत. औपचारिकरित्या निवृत्त झाल्यावर सरांनी क्रीडा मानसशास्त्र’ या विषयाची शास्त्रशुद्ध जोपासना केली. अध्यात्माचा विचार आणि योगशास्त्राचा आचार यांचा आधुनिकतेशी मेळ म्हणून घालून त््यांनी विषयाचे मानसशास्त्र तयार केलं. जे काम केवळ अधिकार कायदा, प्रशासन करु शकणार नाही ते नैतिकता आणि विज्ञाननिष्ठ अध्यात्म करु शकतं ही तर आमची जीवननिष्ठा आहेच. तीच घेऊन जे बाम सर खेळातले चॉम्पियन्स घडवत होते ते नियमितपणे चाणक्य मंडल परिवार मधेही मार्गदर्शन करत होते.
अंजली भागवत
NCC मधून निवड होऊन आम्ही ५ ते ६ मुली महाराष्ट्र रायफल असोसिएशच्या (MRA) शुटींग रेजवर प्रशिक्षणासाठी जात होतो आणि MRA चे अधिकारी श्री. भीष्मराज बाम यांची तेथे थेट झाली. मी, सुमा आणि दीपाली देशपांडे यांच्यामधली ‘चमक’ बघितली आणि नेमबाजी मध्ये व्यावसायिक पातळीवर प्रोत्साहन दिले. योगासनांचे धडे, श्वासाचे व्यायाम आणि मग ‘ध्यानाचा’ अभ्यास करत त्यांनी सफाईदरपणे मेंटल ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. मन कसे एकाग्र ठेवणे, झटकून न देता ते कसे आत्मसात करुन त्यात आपले कौशल्य दाखवणे, जिंकण्याच्या शेवटच्या क्षणी वर्तमानात राहून मनावर, विचारांवर काबू ठेवणे ह्यासारख्या अनेक गोष्टी आम्हांला शिकवल्या. २००३ साली मी म्युनिक, जर्मनी येथे वर्ल्ड कपसाठी गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. तू फक्त शॉट मार, प्रत्येक शॉट हा पहिला व शेवटचा समज, असे सांगून आत्मविश्वास निर्माण करायचे. खेळाडूंच्या हक्कांसाठी ते नेहमी भांडत असत, मात्र त्यांनी कधीही संयम सोडला नाही.
प्रकाश पडुकोण
माझ्या निवृत्तीनंतर विमल कुमार आणि विवेक कुमार यांच्याबरोबर १९९४ साली बँगलोर येथे ‘प्रकाश पडुकोण बॅडमिंटन् अॅकेडेमी’ चालू केली. सुरुवातीला ते आमचं खाजगी सेंटर होतं आणि २५ वर्षं या सेंटरची पूर्ण होतं असताना आम्ही सहा ऑलिंपीक खेळाडूंना, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना शिक्षण देऊन तयार केलं होतं. आमच्या सगळ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी खास सवलती ज्या आम्हांला आमच्या काळात मिळाल्या नव्हत्या त्या देण्याच्या ठरवल्या. उत्तम प्रतीच्या रॅकेटस, शटल्स, पुरेसा खेळण्यासाठी वेळ, उत्तम प्रतीचं जेवण वगैरे सगळ्या सवलती द्यायला सुरुवात केली. मग मानसिक प्रशिक्षणाबाबत बॅडमिंटन खेळाडूंसाठी काहीच केलं नाही हे आमच्या लक्षात आलं आणि तेव्हा आम्ही श्री. बाम यांच्या संपर्कात आलो. आमच्या पहिल्या भेटीपासून श्री. बाम यांनी बॅडमिंटन खेळामध्ये मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिलं. त्यांनी आम्हांला त्यांच्या स्वत:च्या मानासशास्त्राच्या क्षमतेच्या परिणामांचं महत्त्वसुद्धा पटवून दिलं. अशा तऱ्हेने ९०च्या दशकामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर खेळाडू तयार झाले. त्यातलीच काही नावं म्हणजे गोपीचंद, दिपकर आणि अपर्णा पोपट. १९९८ साली कॉमनवेल्थ खेळांमध्ये अपर्णा पोपटने शारीरीक आणि मानसिक थकव्यामुळे मेडल मिळण्याची अपेक्षाच सोडली होती. तेव्हा बाम सरांच्या मानसिक प्रशिक्षणामुळे तिने सिल्व्हर पदक मिळवलं. बाम सरांनी ‘अपर्णा’ सारख्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धात खेळवण्यासाठी कृष्णाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडली. यापुढे वर्षानुवर्षं बाम सरांचा क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून ब्रांड राहील !
जतीन परांजपे
“ज्याच्यावर मुंबईच्या टीमला अवलंबून राहता येईल अशा फलंदाजाला भेटत आहे!” बाम सर आमच्या पहिल्या भेटीत म्हणाले. माझा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे मित्र गौरव नाटेकरने त्यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांच्या शब्दांमुळे मला खूप हलकं वाटलं आणि माझा आत्मविश्वास सुद्धा वाढला. त्यांच्याकडे मी मानसिक प्रशिक्षण घेतले. बाम सरांनाच मी माझा गुरु मानतो. त्यांनी शिकवलेला प्राणायाम मी नियमित करतो. त्यांची पुस्तकं मी नियमित वाचतोच. पण त्यांच्या पुस्तकांच्या मी २०० प्रती विकत घेतल्या आणि मित्रांना वाटल्या.
पद्मजा फेणाणी जोगळेकर
बामकाकांच्या स्तृतीला गुरुपौर्णिमेनिमित्त मी प्रथम वंदन करते. एकदा गप्पा मारताना मी त्यांना म्हणाले, ‘‘माझा प्रत्येक कार्यक्रम उत्तमच झाला पाहिजे’’, ह्या आग्रहापायी मला सुरुवातीला थोडेसे टेन्शन येते. त्यावर ते म्हणाले, ‘‘पद्मजा, संगीताच्या दैवताला, देवी सरस्वतीला तुझ्या गळ्यात येऊन बसण्याचे तू आवाहन कर. तू तिच्यासाठीच गाते आहेस त्यामुळे तुझ्या डोळ्यांसमोर फक्त तीच असू दे’’ असा त्यांनी दिलेला सल्ला मला आजही मोलाचा वाटतो.
डॉ. भरत केळकर
वर्तमानमध्ये मन राहण्यासाठी प्राणायम, मन, शरीर सहकार्यासाठी न्यास, मानसिक चित्रीकरण अशी अनेक तंत्र त्यांनी शिकवली. ‘डॉक््टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेसाठी सिरिया आणि येमेन मध्ये जाऊन यादवी युद्धात होरपळलेल्या वर उपचार करायला एक डॉक्टर म्हणून गेलो त्याचे त्यांना विलक्षण कौतुक होते. अतिशय स्फोटक परिस्थितीत एकाग्र चित्ताने उपचार करण्यासाठी बाम सरांनी सांगितलेले मार्गच मला उपयोगी पडले. इतकेच नव्हे तर प्रत्येक मिशन वरुन परत आल्यावर चार दिवसांतरच प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेटून अनुभव ऐकले होते आणि प्रोत्साहन दिले होते.
कुमार केतकर
मी त्यांचा शिष्य नव्हतो किंवा खेळाडूपण नाही. मी त्यांची कोणतीच मानशास्त्रविषयक व्याख्यानंसुद्धा ऐकली नाहीत किंवा मी क्रिडा क्षेत्रातील पत्रकारसुद्धा नाही. मी त्यांच्याशी सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीने बांधला गेलो आहे. उच्चस्तरीय पातळीवर पंतप्रधान इंदिरा गांधीपासून ते अगदी साध्या पोलिसी वेष परिधान करणा-या पोलिसापर्यंत त्यांचा वावर होता. त्यांच अफाट ज्ञान, उत्तम स्मरणशक्ति तसेच विनोदबुद्धि आणि माणुसकी यामुळे माणसांचा संग्रह करण्याची त्यांची ताकद जबरदस्त वाखाणण्यासारखी होती.
वंदना अत्रे
देवाने निर्माण केलेले हे जग चालविण्यासाठी त्याला शूर माणसांची गरज नेहमीच असते. मग तो त्यासाठी आपल्यापुढे जगताना अडचणी ठेवतो आणि आपण त्या पार करतोय कि हातपाय गाळून बसून राहतोय हे बघत असतो. त्यामुळे आपल्यावर जेवढी अधिक संकटे तेवढे देवाचे आपल्यावर अधिक लक्ष आहे हे मनात पक्के धरावे आणि त्या संकटांना तोंड द्यावे.’’ अशा शब्दांना बाम सर जेव्हा धीर द्यायचे तेव्हा संकटांशी सामना करण्यासाठी बाहू जणू फुरफुर लागायचे ! माझ्या कॅन्सरच्या आजारपणात मला अमृत प्राणायाम, न्यास, मानसिक चित्रीकरण अशा अनेक उपासना शिकवून उमेद वाढवत. योगशास्त्र आणि अध्यात्म ह्या विषयांतील अतिशय गाढा व्यासंग, त्यासोबत चौफेर वाचन आणि जबरदस्त पाठांतर आणि अतिशय रसाळ पाणी असे अद्भूत, दुर्मिळ रसायन असलेला हा गुरु अत्यंत आंतरिक जिव्हाळ्याने जेव्हा रुग्णांशी बोलायचा तेव्हा त्या साधेपणाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नसे. परिस्थितीबद्दल कुरकुर न करता त्यातून ह्या उपासनांच्या आधारे मार्ग काढीत सतत जीवनसन्मुख राहण्याचे धडे आपल्या आचराणातून आणि शिकवणुकीतून देणारे बाम सर भेटणे हा आयुष्यातील एक अमृतयोग होता हे नक्की….
संजीव लाटकर
आपल्यात अजून काही तरी कमी आहे आणि ही कमतरता दूर सारुन आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय अशा मानसिकतेच्या टप्प्यावर असणा-या प्रत्येकाने ज्यांना वाचावं, ज्यांना ऐकावं, ज्यांच्या सहवासात सहावं असं नाव म्हणजे भीष्मराज बाम. ज्यांना आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हायचंय, स्वत:ची क्षमता जाणून घ्यायचीच, स्वत:हून स्वत:पुढे उभे केलेले अडथळे ओलांडायचेत त्यांनी एका टप्प्यावर बाम सरांच मार्गदर्शन घ्यावं.
संदीप जाधव
राहून द्रविड आणि इतर क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना बाम सर मार्गदर्शन करतात आणि ते नाशिकमध्येच राहतात हे ऐकल्यामुळे त्यांना फक्त भेटण्याची इच्छा होता. २००२ साली मी त्यांच्या ‘नेमबाजीच्या’ कॅम्पमध्ये दाखल झालो आणि तिथेच माझी भेट झाली. मी एकदा मोनाली गोप्हेबरोबर सरांच्या घरी गेलो होतो. त्या दिवशी सरांचा संगणक, इंटरनेट बंद पडलं होतो. मी बी.एस.सी (इलेक्ट्रानिक्स) करत असल्यामुळे थोडीफार माहिती होती. पण विशेष काहीच केलं नाही. फक्त संगणक बंद करुन चालू केला; आणि सगळंच चालू झालं. सरांनी त्याच दिवशी मला त्यांचा असिस्टंट होशील का आणि महिन्याला एक हजार रुपये देतो म्हणून सांगितलं. २००२ साली एक हजार रुपये माझ्यासाठी एक लाख रुपये असल्यामुळे मी होकार देऊन जायला सुरुवात केल, कॉलेज, नेमबाजी, पोहणे सगळं सांभाळून त्यांच्याकडे जायचो आणि त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झालो. पुढे मला राष्ट्रीय योगासनाच्या स्पर्धेत बाम सरांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळालं. तिथे माझ्या योगासनांच प्रात्याक्षिक बघून सरांनी ‘नेमबाजी’ शिकण्याचा सल्ला दिला. सरांचं मी सगळं ऐकायचो. त्यांच्याबरोबर सेमिनारला जात असल्यामुळे त्यांना जवळून बघितलं. त्यामुळे जगायच्या भरपूर गोष्टी कळल्या. २२ व्या वर्षी पतंजली योगसूत्रांचा मी अभ्यास करतोय ह्याचा सरांना खूप अभिमान होता. २००६ ला कझागिस्तान मध्ये योगासनं शिकवण्याची संधी आली आणि सरांनी मला तिथे जाण्याचा आदेश दिला. आजपाजय विधी, न्यास, मानसपूजा आता माझ्या दैनंदिन साधनेचाच एक भाग आहे. बाम सरांसारखी मोठी व्यक्ति माझ्या आयुष्यात गुरु म्हणून आली आणि काही निर्णय विवेकी पद्धतीने घ्यायला शिकवले ह्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
अजित बाम
लहानपणापासून आमच्या घरी बाबांना भेटायला भरपूर माणसं यायची. मला वाटायचं की पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे असेल पण नंतर कळलं, की त्यांच्याकडे प्रचंड उर्जा आणि सकारात्मक दृष्टीकोन होता, आणि आयुष्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन वाढवण्यासाठी यायचे. मी एवढी सकारात्मक व्यक््ती अजून बघितली नाही. आई-वडील सर्वप्रथम गुरु असतात. आणि त्याप्रमाणे बाबा माझे गुरु होते. मला आणि माझ्या भावाला, नरेंद्रला सुद्धा नेमबाजीचे धडे मानसिक प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून दिले. ‘उत्तमाची साधना’ करायला शिकवली. माणसाला पारखून मदत करायची नाही असचं ते नेहमी म्हणत. पतांजली योगसूत्रं, उपनिषदं यांच महत्त्व पटवून दिलं. स्वत: मध्ये उत्तमता कशी खुलवायची आणि एक चांगला माणूस म्हणून कसं जगायचं हे मी त्यांच्याकडून शिकलो.
राजीव पटेल
२०१६ चा नोव्हेंबर महिना सरत आला होता की डिसेंबर सुरु होत होता, बामसाहेबांची आणि माझी भेट आमच्याच निवासी झाली होती, अखेरची चार महिने अगोदर मनात ठरवून बामसाहेब माझ्याकडे येऊन सहज शैलीत ते म्हणाले, ‘‘राजीवभाई ! तुम्ही आद्य शंकराचार्य लिहा. तुम्हांला दादांमुळे आणि तुमच्या वडिलांमुळे तत्त्वज्ञान कळतं, त्या काळात जाता येतं. इतिहास समजतो…त्यावर मी म्हणालो, ‘‘असली पुस्तकं कुणी छापत नाही आणि त्याहून कुणी वाचत नाहीत’’. मला वाटलं चर्चा इथे थांबेल ! ते त्यावर लगेच म्हणाले, ‘‘आपल्यानंतर छापतील तुम्ही लिहायला तर लागा.’’ बामसाहेब माझ्याहून तेरा वर्षांनी वडील होते. अभ्यास, अनुभव, कार्यक्षमता आणि बुद्धी अशाने तर ते पन्नास वर्षांनी मोठे होते ! आमच्या दादांचे (प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले) यांचे ते सर्वोच्च होते आणि स्वाध्याय म्हणून ते आमचे ज्येष्ठ बंधू होते. कुठल्याही प्रकारे त्यांची अवज्ञा करणं शक्य नव्हतं ! अमेरिकेत अभ्यासाची पुस्तकं टेबलावर काढून मी कागदांवर बामसाहेबांनी दिलेला गृहपाठ लिहित होतो. पाहता पाहता कागदांची चळत दिड इंच जाडीची झाली होती. अचानक १२ मे ला आमचे मित्र प्रधान यांचा फोन आला. बामसाहेब गेले होते. असं सारखं वाटत राहातं की बामसाहेब ! आपण अचानक आणि लवकर गेलात ! आपण आस्तिक आणि पूर्णपणे आध्यात्मिक होतात. दुस-याचं हित बघणं हे आपल्या श्वासात होतं. आपल्या असण्याने खेळाडूंमध्ये चैतन्य असे आपला आणि आमचाही पुनर्जन्मावर विश्वास आहे. आपलं पुन:संभव निश्चित आहे. कुठल्या रुपाने, केव्हा आणि कुठे परत याल हे मात्र विश्वनियंत्यालाच ठाऊक !
सुप्रिया पिळगावकर
अंजली भागवत कडून चार वर्षांपूर्वी बाम सरांच नाव ऐकलं होतं. २०१७ च्या एप्रिल मध्ये मैत्रिणीच्या सांगण्यावरुन त््यांच्याकडे अमृत प्राणायम शिकण्याचा योग आला. पूर्ण दिवस सरांनी त्यांच्या दादरच्या घरी उपयुक्त गोष्टींची माहिती दिली, त््यांची ‘मना सज्जना’ आणि ‘विजयाचा मानसशास््त्र’ ही पुस्त्के सुद्धा दिली. ‘अमृत प्राणायाम’ आणि ‘न्यास’ यांच प्रात््यक्षिक दिलं. दुसऱ्या दिवशी सिनेमाचं शुटिंग चालू असतांना सर आणि बाम मॅडम बरोबर आमच्या व्हॅनमध्ये माटुंगा येथील त्यांच्या आवडीच्या हॉटेलमधून जेवण मागवून एकत्र जेवलो. पुढचं शिकायला नाशिकला येण्याच आमंत्रण त्यांनी दिल. मात्र तो योग आला नाही. फक्त दोनदा झालेल्या भेटीने सुद्धा मला खूप काही हरवल्यासारखं झालं. कारण त््यांच्याशी ‘आंतरिक कनेक्शन’ झालं होतं. त्यांच्या पुस्तकांमधून मला ते कायम मार्गदर्शन करत राहतील ह्याची मला खात्री आहे.
बाम सरांनी अनेकांना संकटावर मात देत योग्य मार्गावर चालायला शिकवलं आणि आज त्यांचे विविध क्षेत्रांमधील शिष्य आत्मविश्वासाने, खंबीरपणे उभे आहेत. बाम सरांचं अस्तित्त्व त्यांच्या पुस्तकांमधून तर आहेच पण शिष्य समुदायांच्या रुपांमधून सुद्धा छोट्या अंशाने बघायला मिळतं. असा हा खरा ‘योगी’… एक मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक !
– पूर्णिमा पारखी, मुंबई
आभार – अजित बाम, मुंबई