खेळाडू


भारताचा अष्टपैलु क्रिकेटपटु अजित आगरकर

क्रिकेटची आवड केंव्हापासून लागली?
Ajit Agarkar अजित आगरकरअगदी लहानपणापासून. हा असा खेळ आहे की, बॅट आणि बॉल मिळाला की कुठेही खेळता येतो. आजीच्या इमारतीत, अगदी लहानपणापासून तिथल्या मुलांबरोबर मी क्रिकेट खेळायचो.

मग पुढे सिझन क्रिकेटकडे कसा वळलास?
माझी क्रिकेटची आवड बघून, वडिलांनी शिवाजी पार्क येथील जिमखान्यावर सुटीच्या शिबिरामध्ये मला पाठवले. त्यानंतर माझे काका श्री. पाटेकर हे, श्री. संदीप पाटील यांचे वडिल एम्. एस्. पाटील यांना भेटले. श्री. एम्. एस्. पाटील यांनी काकांना श्री आचरेकर सरांचे नाव सुचविले. नंतर मग सुटीत मी आचरेकर सरांकडे सरावासाठी जाऊ लागलो. तेव्हा मी आय्. ई. एस्. शाळेत जायचो. आचरेकर सरांनी सांगितले की पुढे खेळण्यात रस असेल तर शारदाश्रम शाळेत प्रवेश घे.

नंतरचा प्रवास (अर्थातच क्रिकेटच्या) पटलावर कसा झाला?
‘शारदाश्रम’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे मला फायदाच झाला. मी अगदी चांगल्या दर्जाचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला लागलो. आंतरशालेय स्पर्धांचा मिळालेला अनुभव खूप मौलिक होता. १६ वर्षांखालील व १९ वर्षांखालील शालेय क्रिकेट खेळलो. नंतर मला ‘टाटा स्टील’साठी ‘टाईम्स शिल्ड’सारखी स्पर्धा खेळायला मिळाली.

पुढील मार्ग कसा काय सुचला तुला?
नंतर मग लगेचच ‘रणजी ट्रॉफी’ खेळलो. अर्थातच मुंबईकडून. १९९६-९७ ला गुजराथ विरूध्द मुंबईत रणजी ट्रॉफी खेळलो. त्यानंतरचा अविस्मरणीय क्षण म्हणजे, १९ वर्षाखालील मुलांच्या श्रीलंका येथे भरलेल्या क्रिकेट सामन्यांत मी भारताकडून खेळलो. या सामन्यानंतर रणजी स्पर्धेचा उपान्त्य फेरीचा सामना व अंतिम फेरीचा सामना खेळलो, तेव्हा संजय मांजरेकर आपले कर्णधार होते. त्या वेळेला मुंबईने ग्वाल्हेर येथे रणजीचा अंतिम सामना जिंकला होता.

‘भारतीय-अ’ संघासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन खेळलास त्याबद्दल थोडसं सांग…
त्यावेळेला पाकिस्तानच्या अ-संघात आशिक मुजताबा, अब्दुल रझाक, अकिब जावेद इ. खेळाडू होते. त्या खेळाचा, अनुभवाचा मला खूपच फायदा झाला. बरंचसं शिकायला मिळालं.

तुझी व भारताची कामगिरी या दौ-यात काय होती?
भारतीय संघ कसोटी मालिका जिंकला पण एक दिवसीय सामन्यांची मालिका आपण हरलो. मी त्या कसोटी मालिकेत एकंदर १७ बळी मिळविले व एक शतकही लगावले.

तुझा भारतीय संघामध्ये प्रवेश कसा काय झाला?
Ajit Agarkar नंतर मी भारतीय संघात महम्मद अझरूद्दिनच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया व झिम्बाव्वे यांच्याविरूध्द एक दिवसीय मालिका खेळलो. ही मालिका भारतातच खेळली गेली. संघातले सर्व ज्येष्ठ खेळाडू माझ्याशी चांगले वागले. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले शिवाय त्यातील ब-याचशा खेळाडूंविरूध्द मी ‘चॅलेंजर ट्रॉफी’ खेळलो होतो. तेव्हा मला तसे काही दडपण देखील नव्हते. त्यावेळी माझा रूम पार्टनर विनोद कांबळी हा होता. आम्ही दोघे यापूर्वी देखील मुंबईसाठी एकत्र खेळलो हातो, त्यामुळे मला भारतासाठी खेळतोय, म्हणून काही निराळं वगैरे वाटलंच नाही.

तुझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल ऐकण्यास फार उत्सुक आहे?
कोची येथे ऑस्ट्रलियाविरूध्द मी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलो. या सामन्यातला माझा पहिला चेंडू मी ऍडम गिलक्रिस्टला टाकला. या सामन्यात मला ऍडमची विकेट मिळाली. नंतरच्या सामन्यात पुढे श्रीनाथला दुखापत झाल्याने, आंतराष्ट्रीय सामन्यात मला नवीन चेंडूदेखील सर्वप्रथम वापरावयास मिळाला.

मग पुढचा दौरा?…
नंतर मग भारतीय संघ झिम्म्बाव्वेच्या दौ-यावर गेला. दरम्यानच्या काळात मला २३ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० बळी मिळाले. हा एक विक्रम आहे, मला हे आधी माहितच नव्हतं. हरारेत एका स्थानिक भारतीयाने मला आणून दिलेल्या वर्तमानपत्रामुळे मला हे समजलं की फास्टेस्ट फिफ्टी विकेटस् चा हा विक्रम आहे…

तू टेस्ट क्रिकेटही खेळला आहेस आणि एक दिवसीय सामना देखील खेळला आहेस. या दोन्ही क्रिकेट प्रकारांबद्दल एक खेळाडू म्हणून तुझं काय मत आहे?
Ajit Agarkar एक दिवसाच्या सामन्यापेक्षा कसोटी सामन्यांत तुमचा खरा कस लागतो. कधीकधी छोटयाशा चूका या एक दिवसीय सामन्यात एक वेळ खपून घेतल्या जातात. चूक झाली तरी निभावून नेता येतं, आणि सामना जिंकता देखील येतो. परंतु कसोटी मालिकेमध्ये ख-या अर्थाने तुमची कसोटी लागते. एक थोडीशी चूकदेखील सर्व सामना फिरवू शकते. कसोटी सामन्यापेक्षा एक दिवसीय सामना हा शारिरिक श्रम आणि क्षमता यांची जास्त मागणी करणारा असतो, हे खरे आहे, परंतु, कसोटी सामन्यात तुम्हाला स्वत:ला सिध्दच करावं लागतं.

आता तुझ्या ‘फास्टेस्ट फिफ्टी’बद्दल बोलू?
मी त्या सामन्यात खेळायला आलो, तेंव्हा फक्त ९ ओव्हर्स बाकी होत्या. आमची धावसंख्याही तेवढी नव्हती. आणि जिंकण्यासाठी राजकोटच्या त्या विकेटवर स्कोर तर भरपूर हवाच होता. मी त्या सामन्यात नऊ नंबरवर बॅटिंग केली. तेंव्हा मी अगदी सहजपणे व माझ्या अश्या नैसर्गिक शैलीत खेळलो. सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणेच घडत गेल्या.

‘लॉईडस्’चं तुझं शतक ही अशीच एक अविस्मरणीय बाब आहे, त्याबद्दल तुझ्याकडून काही ऐकायचंय…
भारतीय संघ ४७५ धावांचा पाठलाग करीत होता. त्यावेळी आपल्या संघाच्या २५७ ला सात की सहा विकेटस् पडल्या होत्या. पाचव्या दिवशी मी व लक्ष्मणनी ठरविले होते की जास्तीत जास्त वेळ धावपट्टीवर टिकायचे व जास्तीत जास्त धावा करायच्या. मी प्लॅनप्रमाणे खेळत गेलो. शतक…ते काय मला कधीही कुठल्याही दिवशी मिळेल. century is century, पण वाईट एवढंच वाटलं की आपण तो सामना हरलो. आपण तो सामना वाचवू शकलो असतो.

प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत लीच पॅचेस, ड्राय पॅचेस येतात. त्या बद्दल तुझं काय मत आहे?
Ajit Agarkar अजित आगरकरहो असे पॅचेस येतात. चढ-उतार हे खेळडूच्या कारकिर्दीचा भागच असतात. सचिन तेंडुलकर सारखी सातत्यपूर्ण कामगिरी फार कमी जणांना करता येते. अशा लीच पॅचेसच्या वेळी आपली कौशल्ये घासून-पुसून घ्यावी लागतात. बेसिक्सवर भर द्यावा लागतो. झालंच तर आम्ही आमच्या जुन्या सरांकडेही जातो. आचरेकर सर कधी भेटले किंवा आम्ही कधी गेलो तर महत्त्वाच्या गोष्टी अजूनही सांगतात. एवढंच काय, मैदानावरचा माळी, जो तुमचा खेळ पाहात असतो, कदाचित तो सुध्दा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगतो. कधी कधी असं होतं की, गोलंदाजी चांगली होत असते, पण विकेटस् मिळत नाहीत. बॅटिंग होत असते. पण रन्स होत नाहीत. या अशा गोष्टी होतातच. तो खेळाचा भाग असतो. धावपट्टी चांगली नसते, ‘क्लीन’ नसते तेंव्हा संघ, कोच यांनी पाठबळ दिलं तर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

क्रिकेटमध्ये सध्या चालू असलेल्या ‘स्लेजिंग’बद्दल तुझं काय मत आहे?
तो खेळाचा एक भाग झालाय.जोवर व्यक्तिगत पातळीवर टीका होत नाही, तोवर ठीक आहे. एखाद्यावर मुद्दाम टीकेची झोड जोवर कुणी उठवत नाही, तोवर त्यात काही आक्षेपार्ह आहे, असं मला तरी वाटत नाही.

क्रिकेटमधील जाणकार म्हणतात की तुझ्याकडे एवढी चांगली गोलंदाजी आहे, फलंदाजी देखील आहे, पण त्याला तू अजून पाहीजे तेवढा न्याय दिलेला नाहीस… गोलंदाजीत तू खूप प्रयोग करतोस…?
नाही ते काही तेवढंसं खरं नाही. गेले बारा महिने बॅटिंगच्या दृष्टीने पाहता मला चांगले गेलेत. गोलंदाजीवर सुध्दा मी खूप मेहेनत घेत आहे. माझ्या मते प्रयोगक्षमता हा एक आवश्यक गुण आहे. मी माझ्या गोलंदाजीच्या बाबतीत नवनवे प्रयोग करतो, त्यामुळेच मला एवढया संख्येने विकेटस् घेता आल्या आहेत. माझ्यावर टीका होत असेलही, पण मला एक ठाऊक आहे की, माझ्या प्रयत्नांमध्ये जागरूकता आहे, त्यामागे एक निश्चित असे प्रयोजन आहे. त्यात आणखी एक बाब म्हणजे, ब-याच वेळा संघाच्या निर्णयानुसार गोलंदाजी करावी लागते.

आपल्या देशातील बुजुर्ग गोलंदाजांनी किंवा आंरतराष्ट्रीय गोलंदाजांनी तुला, तुझी गोलंदाजी अजून धारदार करण्याकरिता मदत केली आहे का?
हो. मायकल होल्डिंगशी याबाबत मी बोललोय. एम्. आर्. एफ्. कॅम्पमध्ये डेनीस लीलींनी खूप मदत केलीय. आकिब जावेद, वकार युनुस यांच्याशी मी गोलंदाजीबाबत चर्चा केली आहे. मदत करायला सर्वच तयार असतात, पण you have to approach…

मॅच खेळताना तुझ्या अशा काही खास सवयी आहेत का, किंवा अशा काही गोष्टी आहेत का, की ज्या तू खेळायला उतरण्यापूर्वी नेहमी करतोस ?
माझी श्रध्दा अंधळी नाही. पण रिलॅक्स होण्याकरीता काही गोष्टी मी आवर्जून करतो. यात चांगले संगीत ऐकणे वगैरे गोष्टी येतात.

योग किंवा मानसोपचार तज्ञ यांचा फायदा होतो का?
होतो. वर्ल्ड-कपच्या वेळी आमच्या संघाबरोबर सॅडी गॉर्डन हे मानसोपचार तज्ञ होते. ते निष्णात होते. पण मला असं वाटतं की अनुभवातून जेवढं शिकता येतं, तेवढं कशातूनही शिकता येत नाही. प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय, तरबेज होता येत नाही. आता मी गेली पाच वर्षे भारतीय क्रिकेट संघाबरोबर आहे. त्यामध्ये ब-याच वेळा पेचप्रसंग उद्भवले. अशा प्रसंगातून पार जाऊनच त्यांना कसं सामोरं जायचं हे शिकता आलं.

असा प्रसंग कधी आला आहे का, की जेंव्हा जोरकस कामगिरीची फार जरूर होती आणि तू ती केलीस. मॅचच पूर्ण फिरवलीस.
‘मी केलं म्हणून झालाय’ असं बोलणे खरं तर चूकीचं आहे. पण विचारलंच आहेस तर सांगतो. अगदी या वर्षीचीच घटना आहे. ‘रणजी’ ट्रॉफीच्या स्पर्धेच्या वेळी, तामिळनाडू विरूध्द घेतलेले चार बळी मला महत्वाचे वाटतात. श्रीलंकेतल्या Independence Cup बद्दल सांगतो. तो सामना अगदी चुरशीचा ठरला. त्यात मला जयसूर्या, कालुविदरणा, डिसिल्व्हा, रणतुंगा यांच्या विकेट मिळाल्या होत्या.

गोलंदाज ‘अपिल्स्’ करतात, त्याबद्दल आणि ‘अंपायरींग’ बद्दल काही सांगशील?
ज्यावेळी गोलंदाजाला असं वाटतं की, आपण फलंदाजाचा बळी घेतला आहे, त्यावेळी तो ओरडून#जोरकसपणे अनुमोदन देतो. तेच ‘अपील’ होय. आणि पंचांबद्दल म्हणशील तर, शेवटी ती देखील माणसंच आहेत. चुका होणारच. काही वेळेला अंपायर्सना दिसत नसतं. पटकन कळत नाही. पण ठीक आहे. कधीतरी नसणारी विकेट सुध्दा मिळते आणि असणारी मिळत नाही. शेवटी ताळेबंद सारखाच येतो…

आपल्याकडच्या धावपट्टीबद्दल तुझं काय मत आहे?
बरीच वर्षे आपल्याकडे फिरकी गोलंदाजांचा प्रभाव होता. फिरकी गोलंदाजांना मदत करणारी अशी धावपट्टी असायची, आणि त्यात काही चूक नाही. आपल्या बलस्थानांची पारख ठेवूनच क्रिकेटमध्ये बळी घेता येतात.

तुला कुठले खेळाडू आवडतात?
क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर नंबर एक. अभारतीय म्हणशील तर ब्रायन लारा. पण त्याच्याबरोबर मी फारसा खेळलो नाही. स्टिव्ह वॉ, ग्लेन मॅग्राय अशी आणखीनही पुष्कळ नावे आहेत. लिएंडर पेस व महेश भूपती आवडतात. ग्रँड स्लॅम सारख्या स्पर्धांपर्यंत पोहोचणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. विश्वनाथन आनंद आवडतो.

तू दुसरा कुठला खेळ खेळतोस का?
वेळ मिळाला तर टेबल टेनिस, स्क्वॅश खेळतो.

जाहिरातीत अभिनय करतांना नक्की काय वाटतं?
सुरुवातीला जरा विचित्र वाटतं. पण काही थोडया जाहिराती झाल्या की त्याचाही सराव होतो. जाहिराती हे माझं क्षेत्र नाही. ते नेहमीच दुय्यम असेल.

वर्ल्डकप मध्ये सुरवातीला आपली कामगिरी जेंव्हा चांगली होत नव्हती, तेंव्हा काय वाटलं?
आम्ही अर्थातच समाधानी नव्हतो. दडपण होते. पण आम्हाला सगळयांना माहित होते की आम्हाला काय करायचे आहे. विश्वचषकाच्या आधीचा न्युझीलँडचा दौरा खराब झाला होता. तरीही आमचो लक्ष्य निश्चित होते. मनोबलही होते. म्हणून तर अंतिम फेरीपर्यंत आम्ही पोहोचलो.

तुला ‘सामाजिक बांधिलकी’ ही कल्पना पटते का? एक खेळाडू या नात्याने तू ती कशी सांभाळतोस?
आमच्या सारख्या प्रकाश-झोतामध्ये वावरणाऱ्या व्यक्तिंना सामाजिक जाणीव ही हवीच. सिगरेटस्, मद्य या सारख्या वस्तूंच्या जाहिराती करण्यास मी नकार देतो. आपल्या भारतीय संघातही अशा उत्पादनांच्या जाहिरातींना नकार देणारे बरेच खेळाडू आहेत.

फावल्या वेळात तू काय करतोस?
पाटर्यांना जाणं मला फारसं आवडत नाही. फावल्या वेळात मी व्यायाम करतो. कसरत करतो. बाकी इतर वेळी घरी रहायला मिळत नसल्याने, वेळ असेल तेंव्हा घरीच रहाणं पसंत करतो. एखाद दुसरा निवडक चित्रपट, परिक्षण चांगलं आलं असेल तर, पाहतो.

तुझे आवडते कलाकार कोणते?
अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरूख, माधुरी दिक्षित, ज्युलिया रॉबर्टस्, निकोलस केज यांचे चित्रपट बघायला आवडतात.

खाण्यातील आवडीचा पदार्थ कोणता?
वरण भात. घरी आल्यावर वरण भात लागतोच.

मराठी वर्ल्डच्या वाचकांसाठी काही सांगशील?
तुमच्या पाठबळामुळे, प्रोत्साहनामुळे, शुभेच्छांमुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. प्रयत्नांत कुठेही कमी पडायचं नाही, यासाठी मी जागरूक आहे, व जागरूक राहीन. धन्यवाद…

मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर