साहित्य – १/२ किलो वांगी, १ मोठा कांदा, ३ चहाचे चमचे भरून किसलेले कोरडे खोबरे, मूठभर भाजलेले दाणे, २ चहाचे चमचे भरून भाजलेले तीळ, दीड चहाचा चमचा तिखट, २ चहाचे चमचे गोडा मसाला, एका लहान लिंबाएवढा गूळ, अर्धा इंच आले, ३ चहाचे चमचे ओले खवलेले खोबरे, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, १ चहाचा चमचा चिंचेचा दाट कोळ. फोडणीसाठी दीड डाव गोडेतेल, हळद-हिंग-मोहरी प्रत्येकी १ चहाचा चमचा.
कृती– प्रथम वांग्याच्या देठाला विरुध्द बाजूने काटकोनात चार चिरा द्याव्यात त्या अशा की वांग्याच्या फोडी न होता वांगे अख्खेच राहील. वांगी लगेच पाण्यात टाकावीत म्हणजे काळी होत नाहीत.
कांदा किसून, परतून घ्यावा, खोबरे, दाणे व तिळाचे कूट करून घ्यावे. परतलेला कांदा, खोबरे-तीळ-दाणे यांचे कूट मीठ, तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ, हे सर्व पदार्थ एकत्र करून हा मसाला वांग्यांच्या चिरांत भरावा. एका पातेल्यात दीड डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली वांगी घालावी. थोडासा पाण्याचा शिपका मारावा, वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे. मंद आचेवर वांगी शिजवावीत. भाजी तयार झाल्यावर वाढताना वरून खोबरे व कोथिंबीर घालावी.
टीप – भरल्या वांग्याच्या भाजीसाठी वांगी काटेदार व लहान लहान घ्यावीत म्हणजे फार बिया नसतात.
साहित्य – २ जुडया माठाची पालेभाजी, ३ कांदे, १ चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, फोडणीसाठी १ डाव गोडेतेल, हिंग-मोहरी-हळद १ चमचा प्रत्येकी.
कृती – माठाची भाजी निवडून, धुवून बारीक चिरावी. कांदेही चौकोनी चिरून घ्यावेत. हिंग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी करावी. त्यावर चिरलेला कांदा टाकावा. जरा परतून झाकण ठेवावे. कांदा शिजला की त्यावर माठाची भाजी घालून ढवळावे व मंदाग्नीवर भाजी शिजू द्यावी. शिजल्यानंतर त्यात तिखट मीठ घालावे. ही भाजी शिजल्यावर थोडी होते म्हणून कधीही अगोदर तिखट मीठ घालू नये. भाजी चांगली शिजली, की मग त्यात कोथिंबीर व खोबरे घालून उतरवावी.
टीप – काद्यांऐवजी बटाटयाच्या पातळ फोडी घालूनही ही भाजी चांगली होते. माठाच्या भाजीप्रमाणेच चवळी, राजगीरा वगैरे पालेभाज्या करता येतात.
साहित्य – २ जुडया अंबाडीजी पालेभाजी, १/२ वाटी तुरीची डाळ, १/२ वाटी तांदुळाच्या कण्या, १ चहाचा चमचा तिखट, चवीनूसार मीठ, २-३ चहाचे चमचे डाळीचे पीठ, गूळ एक मोठया लिंबाएवढा, फोडणीसाठी १ डाव तेल व हळद- मोहरी प्रत्येकी एक चमचा, लसणाच्या फोडणीसाठी १ डाव गोडेतेल, २ लसणाचे गड्डे (सोललेले).
कृती – अंबाडीची भाजी निवडून धुवून बारीक चिरावी. एका पातेलीत तुरीची डाळ, तांदुळाच्या कण्या व अंबाडीची भाजी घालून, बेताचे पाणी घालून पातेली कुकरात ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भजी शिजल्यावर वरचे पाणी बाजूला काढून, डावेने भाजी घोटून घ्यावी. घोटतांना त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात वरील काढलेल पाणी घालावे. आपल्याला जितकी पातळ भाजी हवी असेल, त्या मानाने पाणी घालावे. नेतर मोठया पातेल्यात मोहरी, हळद तेलाची फोडणी करावी. त्यावर ही शिजलेली भाजी घालावी. नंतर तिखट, मीठ, थोडा गूळ घालावा. पण पुष्कळांना ही भाजी आंबट आवडते. तसेच पुष्कळ जणांना या भाजीबरोबर लसणीची फोडणी खूप आवडते. त्यासाठी लहान कढईत १ डाव तेल गरम करावे, सोललेल्या लसणाला जरासे ठेचून मीठ चोळावे व लसणीच्या पाकळया गरम तेलात टाकाव्यात व मंद अग्नीवर लसणी तळू द्याव्यात. नंतर गॅस बंद करून त्यात थोडेसे लाल तिखट घालावे. या पध्दतीने केलेली लसून कुरकुरीत होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार भाजीला पुन्हा वरून लसणीची फोडणी वाढावी.
टीप – अंबाडीच्या भाजीबरोबर भाकरी चांगली लागते.
साहित्य – २ वाटया मोड आलेल्या सोललेल्या डाळिंब्या, पाव वाटी सुक्या खोबर्याचा किस, १ चमचा जिरे, ४-५, हिरव्या मिरच्या, १/२ चमचा लाल तिखट, १ मोठया लिंबाएवढा गूळ, ४ चहाचे भरून खवलेले ओले खोबरे, चवीनुसार मीठ, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी १ मोठा चमचा गोडेतेल, १/२ चहाचा चमचा प्रत्येकी मोहरी, हिंग, हळद
कृती – डाळिंबा आधणाच्या पाण्यात शिजत ठेवाव्या. त्या शिजून पार लगदा होणार नाही अशी काळजी घ्यावी. जिरे व सुके खोबरे एकत्र भाजून, कुटून घ्यावे, मिरच्या वाटून घ्यावा. डाळिंब्या शिजल्यावर त्यात जिरे, खोबरे कूट, तिखट, हळद, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालावे. डाळिब्यांवर खमंग हिंग-हळदीची फोडणी द्यावी. डाळिंब्या वाढतेवेळी वरून खोबरे व कोथिंबीर घालावी.
टीप – ही उसळ शिजत असतांना त्यात थोडे दूध घातले, तर डाळिंब्या आख्या राहतात. डाळिंब्या शिजण्याआधी जर गूळ घातला तर त्या ताठरतात व चांगल्या लागत नाही.
साहित्य – एक पिकलेला लहान अननस, पाव किलो अर्धवट पिकलेले गरे (मध्यम आकाराचा फणस), ५-६ रायवळ आंबे, १ वाटी ओले खोबरे, ८-१० काळया मिरीचे दाणे, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, १ चमचा गूळ, मीठ चवीनुसार, फोडणीचे साहित्य, तेल.
कृती – फणसाच्या गर्यातील आठळया काढून गर्याचे प्रत्येकी चार तुकडे करावेत. अननसाची जाडसर साल, डोक्याकडील भाग व मधला दांडा काढून जरा मोठया फोडी कराव्यात, आंबे मऊ करून त्याचा रस कडावा. खोबरे, मिरे, हिंग, तिखट व हळद एकत्र करून जाडसर वाटून घ्यावेत. एका पातेल्यात तेल तापवून फोडणी करावी. त्यावर अननस, फणस व आंब्याचा रस घालावा. वाटलेले खोबरे, मीठ व गूळ घालून भाजी शिजू द्यावी. ही भाजी फार लवकर शिजते. मिश्र फळांच्या स्वादाने तिला वेगळीच चव येते.