भाज्या-तोंडीलावणी

सुरणाची भाजी

suran vegetable साहित्य – अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले खोबरे

कृती – सुरणाची सालं काढून सुरणाच्या लांबट पातळ फोडी कराव्यात. उकळत्या पाण्यात ३-४ आमसुले किंवा चिंच टाकून थोडे मीठ टाकून सुरणाच्या फोडी उकडून घ्याव्यात. १ डावभर तेलाची, कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत लाल मिरची व उडदाची डाळ घालावी व उकडलेल्या सुरणाच्या फोडी घालाव्यात. किसलेलं ओलं खोबरं घालावे. लगेच मीठ व साखर घालावी. भाजी खरपूस परतून कोथंबीर घालून उतरवावी.

यात चिंचेचा कोळ घातल्याने सुरणाची खाज निघून जाते. तसंच चिंच मलभेदक आहे म्हणून बध्दकोष्ठामुळे ज्यांना मूळव्याधीचा त्रास होतो, त्यांनी ही भाजी जरूर खावी. सुरण हा उत्तम उपाय अर्शाघ्न (मूळव्याधीचा नाश करणारा) आहे. मूळव्याधीचा त्रास असणार्‍यांनी रोजच्या आहारात सुरण जरूर वापरावा.

सुरणाच्या पाल्याची भाजी

साहित्य – सुरणाचा कोवळा पाला, भिजवलेली हरभरा डाळ, लाल मिरच्या, एक-दोन आमसुलांचं पाणी, ओलं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे गुळ, तिखट, मीठ.

कृती – सुरणाची कोवळी पानं मधला दांडा वगळून बारीक चिरावीत .कढाईत फोडणीमध्ये सुक्या मिरच्यांचे दोन-तीन तुकडे तळून त्यावर भिजवलेली चणा डाळ टाकून परतावी. थोडी मऊ झाल्यावर सुरणाचा पाला टाकावा. पाला परतून त्यावर आमसुलाचं पाणी घालावं. मीठ, तिखट, गुळ घालून भाजी मंद आचेवर शिजू दयावी. शेंगदाण्याचा कूट, खोबरं घालून खायला द्यावी.

कच्च्या केळयांची भाजी

Raw Banana साहित्य – भाजीची ३ कच्ची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १/२ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ

कृती – केळाची साले काढून प्रत्येक केळाचे १६ तुकडे करावेत व ते थोडया ताकात घालून स्वच्छ धुवावेत. मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर थोडी हळद व वाटलेली मिरची केळांना चोळून ठेवावी. थोडया पाण्यात मीठ घालून, त्यात केळांच्या फोडी टाकून मंदाग्नीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळाच्या फोडी कोरडया कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हलवत रहावे. नंतर खाली उतरून ठेवावे. दुसर्‍या पातेल्यात तेल,हळद,मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.

अळूची पातळ भाजी

alu patal bhaji साहित्य – ३ अळूच्या जुडया (१ जुडीत ७-८ पाने असतात), १ चुका जुडी, १ मुळा, १/२ वाटी हरबर्‍याची डाळ, १/२ वाटी कच्चे शेंगदाणे, थोडे सुक्या खोबर्‍याचे काप, मोठया लिंबाएवढी चिंच, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ चमचा मेथीचे दाणे, १ डहाळी कढीलिंब, दीड चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, १ मोठया लिंबाएवढा गूळ, दीड चमचा काळा मसाला, २ डावभरून गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग व हळद प्रत्येकी १ चमचा लहान १ डावभरून गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग, व हळद प्रत्येकी १ चमचा (लहान), १ डाव हरबर्‍याच्या डाळीचे पीठ

कृती – आदल्या दिवशी रात्री हरबर्‍याची डाळ व दाणे वेगवेगळे भिजत घालावेत. अळूची पाने ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत व बारीक चिरावीत. चुका व मुळाही बारीक चिरावा. सर्व भाज्या धुवून चाळणीवर निथळत ठेवाव्यात. एका पातेल्यात डावभर तेल घालून त्यावर अळूची व चुक्याची चिरलेली पाने, देठे वगैरे घालून जरा परतापवे. नंतर एका बेताच्या पातेल्यात भिजलेले दाणे, डाळ, खोबर्‍याचे काप, काजू, मिरच्या, व परतलेली अळूची व चुक्याची पाने, देठ, वगैरे घालून ही पातेली साध्या किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवून, भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यानंतर, वरचे पाणी बाजूला काढून, भाजी गरम आहे, तोच छावाने घोटून घ्यावी. भाजी घोटतानांच त्यात डावभर डाळीचे पीठ घालावे. नंतर मोठया पातेल्यात हिंग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी करावी. फोडणीतच मेथीचे दाणे व कढीलिंब घालावा. नंतर त्यावर वरील घोटलेली भाजी घालावी. थोडे पाणी घालून ढवळावे. त्यात चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, काळा मसाला व गूळ घालून ढवळावे. भाजी आवडीनुसार दाट किंवा पातळ करावी. नंतर त्यात कोथिंबीर व खोबर्‍याचे काप घालून चांगल्या चार उकळया येऊ द्याव्यात. प्रखर विस्तवावर भाजी जरा आटली की डाळीचे पीठ शिजते व चिंचेचा उग्रपणा कमी होतो.

टीप – भाजीसाठी अळू निवडतांना काळया देठाची पाने घ्यावीत म्हणजे अळू खाजरा निघत नाही. अळूने घशाला खाज येऊ नये म्हणून भाजीत चिंच व चुक्याचा आंबट पाला घालण्याची पध्दत आहे. चुक्याची पाने घातल्यामुळे अळूची भाजी छान मिळून येते व जास्त चवदार लागते

तांदुळक्याची भाजी

साहित्य – तांदुळका १ जुडी, कांदा १ मध्यम आकाराचा, लसूण ४-५ पाकळया, मीठ चवीपूरते, तेल २ चमचे, हिरव्या मिरच्या २, आमसूल २-३

कृती – प्रथम भाजी स्वच्छ निवडून घ्यावी. तिचा मुळाकडचा भाग घेऊ नये. वरवरची बोखं खुडून घ्यावीत. मग ती धुऊन चिरून घ्यावीत. एका कढईत तेल तापवून त्यात मिरची, हिंग, जिरे, हळदीची फोडणी करावी. नंतर त्यात कांदा लसूण टाकून परतावे. मग त्यात भाजी, मीठ, आमसुल टाकून वाफेवर शिजवून घ्यावी.