उपवासाचे पदार्थ

बटाटयाचा कीस

साहित्य – बटाटे, दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, तूप जिरे.

कृती – बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा किस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. असाच रताळयाचा कीस करावा.

चटपटीत बटाटे

chatpatit-batate साहित्य – एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत), एक ते दीड कप साधारणं आंबट दही, अर्धा कप भाजलेले तीळ, एक टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती – भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालाव. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. पाणी निघून जाईपर्यंत परतावं.

रत्याळाची पोळी

ratalyachipoli साहित्य – रताळी, कणीक, गुळ वेलदोडे, थोडे मीठ, दोन – तीन चमचे तेल, तांदळाची पिठी.

कृती – रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करुन रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.

रताळयाचे गोड काप

ratalycheykaap साहित्य – अर्धा किलो रताळी, १ वाटी साखर, १ वाटी ओला नारळ, ५-६ वेलदोडे, तूप.

कृती – रताळयाची साले काढून विळीवर त्याचे गोल काप करावेत व स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात २ टेबलस्पून डालडा घालून त्यात धुतलेल्या फोडी घालाव्यात. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. झाकणीवर थोडेसे पाणी घालावे. म्हणजे फोडी मऊसर, छान शिजतात, नंतर रताळी शिजल्यावर त्यात नारळ, साखर व वेलची पूड घालावी. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. हे रताळयाचे काप लहान-मोठया सर्वांना फार आवडतात.

रताळयाची फराळी खांडवी

ukdichibhakari साहित्य – रताळयाचे पीठ २ किलो, आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ तसेच १०० मि.ली ताक.

कृती – प्रथम रताळयाच्या पीठात ताक टाकून मिक्स करावे. आले, मिरची, कोथिंबीर नीट चिरून ठेवावी. तूपात जिरे मीठ, हळद, टाकून फोडणी द्यावी. त्यात आले, मिरची, कोथिंबीर इ. टाकून नीट हलवावे. त्यात रताळयाचे पीठ व ताकाचे मिश्रण टाकून मंद विस्तवावर थोडेसे शिजवावे. घट्ट झाल्यावर ताटलीत पसरवावे.

दाण्याची आमटी

daanyachi-amti साहित्य – १ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, मीठ, गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा.

कृती
दाण्याचे कूट थोडे पाणी घालून, पाटयावर वाटून घ्यावे. मिरच्या, लवंगा, दालचिनी हेही वाटावे. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करावे. मीठ, आमसुले व गूळ घालावा. नंतर आमटी उकळण्यास ठेवावी. पळीत तूप घालून जिर्‍याची फोडणी करावी व ती आमटीत घालावी.

भगरीचीभाकरी

bhagar-bhakri साहित्य – भगर दळून आणावी, भिजवण्यासाठी पाणी, चवीपुरते मीठ

कृती
चवी पुरते मीठ घालून भगरीचेपीठ भिजवावे. थोडे पीठ भुरभुरुन भाकरी थापावी. तव्यावर नेहमी भाकरी भाजतो तशी भाजावी. भाकरी करतांना तव्यावर टाकल्या वर पाणी लावतात तेही लावावे. उलटली की मोठ्या आचेवर भाजावी. ही भाकरी बटाटा उकडून तुपाची फोडणी जिरे घालून केलेल्या भाजी सोबत उपासाला चालते.

भगर थंड गुणधर्माची आहे. नवरात्रात महिला उपास करतात तेव्हा पटकन आणि पोटभरीची होणारी आहे. ह्यामुळे साबुदाणाही टाळता येतो.

वर्‍याच्या तांदुळाचे थालीपीठ

varyachey-thalipith साहित्य – वर्‍याच्या तांदुळ बुडतील इतक्या पाण्यात ४-५ तास भिजत घालावे नंतर बारीक वाटावे. वाटतांना त्यात जिरे व मीठ घालावे. नंतर दाण्याचे कूट व कच्च्या बटाटयाचा किस घालावा. हे पदार्थ एकत्र मिसळावेत. त्यात जरूरीएवढे पाणी घालून मळून थालीपीठ लावावे किंवा अधिक पाणी घालून धिरडे पसरावे.

शिंगाडयाच्या पिठाच्या चकल्या

साहित्य – शिंगाडयाचे पीठ १ वाटी, नाचणीचे पीठ पाव वाटी, भिजवलेला साबुदाणा १ वाटी, उकडलेल्या बटाटयाचा किस १ वाटी, जिरे १ चमचा, मिरची पावडर पाव चमचा, साखर, चवीपुरतं मीठ.

कृती
शिगांडा, नाचणीचं पीठ, साबूदाणा, बटाब्याचा किस, भाजलेले जिरे १ चमचा, तिखट, मीठ, साखर सगळं एकत्र करून कोमट पाण्यात भिजवून चांगले मळावे. त्याच्या लहान लहान चकल्या पाडाव्यात. उन्हात चांगल्या वाळवून ठेवाव्यात. गरज पडेल तेव्हा तळून खाव्यात. वाळवलेल्या चकल्या हवाबंद डब्यात ठेवल्यास खूप दिवस टिकतात.