एक खाजगी एफ् एम् वाहिनी येते व बघता बघता लोकप्रिय होते. विन ९४.६ या फ्रिक्वेंन्सीवर सर्व मराठी मनांना ‘टयून’ करणारी अंजली कुलकर्णी आज आपल्या भेटीसाठी आली आहे. चला तर, माहिती करून घेऊ या ‘अस्मिता’बद्दल, अंजली कुलकर्णी बद्दल…
‘अस्मिता’ या खाजगी मराठी एफ् एम् चॅनलची सुरवात कशी झाली ते सांगशील?
मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर win ९४.६ वर ‘अस्मिता’चा श्रीगणेशा झाला. मला आजही स्पष्ट आठवते, ९ सप्टेंबर २००२ ची पहाट. गणेशोत्सवाच्या आधी, म्हणजे, सप्टेंबरच्या ७ व ८ तारखेला टेस्ट ट्रान्समिशन झालं होतं. तेव्हा काही कल्पनाही नसताना कितीतरी लोकांनी अस्मिता ऐकून लगेच अभिप्रायही दिले होते. खाजगी FM वाहिनीवर एखाद्या मराठी कार्यक्रमाची तेंव्हा खूपच गरज होती. ती win ९४.६ ने पूर्ण केली. आजही मराठी कार्यक्रम सादर करणारे एकमेव खाजगी एफ् एम् चॅनल असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ज्योतिर्भास्कर साळगावकरांनी गणेशोत्सवातले दहा दिवस गणपतीबद्दल खूप छान माहिती सांगितली. आणि एका अर्थी गणपतीच्याच पूजनाने सुरू झालेली ‘अस्मिता’ आज तर प्रचंड लोकप्रिय आहे!
‘अस्मिता’साठी गाणी कशी निवडली जातात?
‘अस्मिता’ करण्याआधी साडेतीन वर्षे मी आकाशवाणीच्या ‘एफ् एम्’वर निवेदिका होते. त्यामुळे जुनी-नवी पुष्कळ गाणी माहिती झाली. ‘अस्मिता’चा डाटा तयार करण्यासाठी सीडीज् खरेदी करताना त्या ज्ञानाचा पुष्कळ उपयोग झाला. मी काही शास्त्रीय संगीत शिकलेले नाही, पण कुठल्या गाण्यानंतर कुठलं गाणं ऐकायला चांगलं वाटेल, पहाटे-सकाळी कशा प्रकारची गाणी लोकांना आवडतील त्याचा अंदाज करू शकते. त्यामुळे ‘अस्मिता’ मधली गाणी नेहमीच सिलेक्टेड असतात. रोजच्या कार्यक्रमासाठी मी आणि आमची प्रोग्रॅमिंग हेड वीरा मल्कानी गाणी निवडतो. काही विशेष कार्यक्रम असेल, सण असेल तर, मात्र कोणती गाणी ऐकवायची, ते मीच ठरवते. पहिला एक तास भक्तिगीते. त्यातही सुरुवात स्तोत्र, भूपाळीने आणि शेवट शक्यतोवर आरतीने … नंतरचा एक तास भावगीते, नाटयगीते, चित्रपटगीते, बालगीते वगैरे असतात. त्यातही आधी हळुवार चालीची आणि शेवटच्या अर्ध्या तासात उडत्या चालीची – लावण्या, कोळीगीतं वगैरे असं कॉम्बिनेशन मी करते. खरंच सांगते, सुरुवातीला सकाळी ६ वाजता लोकांना भक्तिगीतं सोडून दुसरे काहीतरी ऐकायला लावणं हे माझ्या पुढचं मोठं आव्हान होतं.
कार्यक्रमाची तयारी कशी करतेस ?
उद्याच्या ‘अस्मिते’मध्ये काय बोलायचं ते तू लिहून काढतेस कां ?, असं मला लोक विचारतात. खरं सांगायचं तर उद्याच्या शो साठी आज ‘ही अमूक’ तयारी केली, असं कधीच होत नाही. एका अर्थी कायमच माझी तयारी सुरू राहते. डोळे आणि कान सततच जागृत ठेवावे लागतात. रस्त्याने जाताना, ट्रेन-बसमधून प्रवास करताना, प्लॅटफॉर्मवर, बसस्टॉपवर, आपल्या आजूबाजूला किती काय काय घडत असतं. फक्त त्यातून आपल्याला उपयोगाचं काय आहे, ते घेता आलं पाहिजे. याबरोबरच वाचनही मला महत्त्वाचं वाटतं. रोजचा पेपर, मासिकं, इतर पुस्तके हे सगळं वाचत राहिल्याने खूप विषय सुचतात आणि बोलण्यात कधीच तोच तो पणा येत नाही. ‘अस्मिता’ होस्ट करताना, आणखीही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. रात्री वेळच्या वेळी झोप घेणे, उत्स्फूर्तपणा, मनाची सजगता (presence of mind) आणि आत्मविश्वास या गोष्टी कोणत्याही चांगल्या निवेदकाकडे असाव्या लागतातच. अस्मितामध्ये मी ब-याचदा वेगवेगळया लोकांच्या मुलाखती घेत असते. त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्याविषयी माहिती करून घेणे, हे तर करावंच लागतं. २-३ मिनिटांत समोरच्या व्यक्तिकडून जास्तीत जास्त चांगलं आणि अर्थपूर्ण बोलून घ्यायचं असेल तर आपली तयारी परफेक्ट असायला हवी. वेगवेगळया मराठी साईटस् शोधायच्या, व्हिजीट करायच्या, आणि आपलं knowledge up date ठेवायचं, हे पण महत्त्वाचं! तर तयारी करण्याची अशी ही सगळी प्रोसेस आहे!!
कार्यक्रम सादर करताना त्यात कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं?
अस्मिताची वेळ खूप लौकरची आहे. मूळात पहाटे पाच वाजता मला स्वत:ला खडखडीत जागं असावं लागतं. कारण मला ‘अस्मिता’मधून अख्ख्या मुंबईला जागं करायचं असतं. तेही प्रसन्नपणे. त्यामुळे आदल्या दिवशी कितीही दमले असले, झोप अर्धवट झाली असली, अगदी आजारी असले तरी, स्टुडिओत पाऊल ठेवताना ते सगळं बाहेरच ठेवावं लागतं. गाण्यांमधले बाराकवे, वैशिष्टयं जर सांगितली तर ऐकणा-यांना ते खूप इंटरेस्टींग वाटतं. पण त्यासाठी आधी मला ती कळावी लागतात. म्हणून गाणी सुध्दा लक्षपूर्वक ऐकावी लागतात. भक्तिगीतांच्या स्लॉटमध्ये बोलण्यासाठी खरंच खूप तयारी करावी लागते. शिवाय ‘भाषा’ ही गोष्ट खूप महत्त्वाची. आपण ज्या भाषेत बोलतो, कार्यक्रम सादर करतो, तिची माहिती आपल्याला असायला हवी. त्या भाषेतील नाटकं, पुस्तकं, गाणी, गीतकार-संगीतकार, ती भाषा बोलणा-या माणसांची स्वभाव वैशिष्टये, भाषेचा इतिहास हे सगळं माहित असावं लागतं. तरच योग्य जागी आपण योग्य शब्द वापरू शकतो. भाषेचं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
‘अस्मिता’ची टीम किती जणांची आहे?
रोजची ‘अस्मिता’ टीम फक्त एका व्यक्तिची आहे. ती म्हणजे, अंजली! पण गाण्यांसाठी, तांत्रिक गोष्टींसाठी जी मदत लागते, ती मात्र सगळेच करतात. आमच्याकडे तांत्रिक स्टाफ २४ तास कार्यरत असतो!
मुलाखतींची तयारी कशी करतेस?
मुलाखतीसाठी विशिष्ट व्यक्ति निवडणं, आणि तिला कॉन्टॅक्ट करणं, हे पहिलं काम. एकदा ते झालं की, त्यांना इतक्या सकाळी मुलाखत देण्यासाठी तयार करावं लागतं. फोनवरून बोलायचं असलं तरीही! ‘एवढया सकाळी कोणी ऐकतं का, तुझा कार्यक्रम?’ ह्या प्रश्नाला न चिडता उत्तर द्यावं लागतं. ‘अस्मिता’ किती लोक ऐकतात ते सांगावं लागतं. मुलाखतीचा कन्टेन्ट ठरविल्यावर आठवणींसाठी आणि मुख्य म्हणजे, पहाटे लवकर उठण्यासाठी फोन करावे लागतात. म्हणूनच एक आवर्जून सांगायचंय की, इतकी लवकरची पहाटेची वेळ असूनही मागच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ला सुप्रसिध्द मॉडेल आणि अभिनेता समीर धर्माधिकारी आणि पाडव्याला सुप्रसिध्द गायक-संगीतकार श्रीधर फडके प्रत्यक्ष स्टुडिओत मुलाखतीसाठी आले होते. समीरने तर रात्री अडीचला शूटिंग संपून सुध्दा मुलाखतीसाठी दिलेला शब्द पाळला.
‘अस्मिता’चे चाहते, तुझ्या निवेदनाचे कौतुक करणारे रसिक काही फीडबॅक देतात की नाही?
रोज अस्मितासाठी भरपूर फोन कॉल्स, एस्.एम्.एस्., पत्रं, ई-मेल्स येत असतात. काहीजण रोजचे संपर्कात राहतात. कुणाला काही वेगळं सुचवावं, सांगावसं वाटल्यावर देखील लोक फोन करतात. या सगळयांच्या संपर्कात येणं, त्यांच म्हणणं ऐकून घेणं, हा खूप छान असा अनुभव आहे. चाहत्यांचे काही अनुभव हेलावून सोडणारे असतात. अस्मिताचा एक निस्सिम चाहता मला नियमितपणे ई-मेल पाठवायचा. त्यांची बदली गुजराथमध्ये झाली. त्यांना अस्मिता रोज ऐकायला मिळणार नाही म्हणून खूप वाईट वाटत होतं. बदली रद्द करायचा प्रयत्न करूनही ते शक्य झालं नाही. पण ते गृहस्थ रोज तिकडूनही मेल्स पाठवून ‘अस्मिता’मध्ये काय चाललंय म्हणून विचारत असतात. रोज ‘अस्मिता’ ऐकणारे लोक जेव्हा बाहेरगावी जातात तेंव्हा तिथून एस्. एम्. एस्. पाठवतात, मेल्स पाठवतात. आल्याबरोबर कधी एकदा ‘अस्मिता’ ऐकेन असं झालं होतं, म्हणतात. ते ऐकून खूप बरं वाटतं. सुनील बर्वे, प्रतिमा कुलकर्णी, अच्युत गोडबोले, चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. प्रवीण दवणे या सगळयांनी सुध्दा ‘अस्मिता’ ऐकून खूप चांगले अभिप्राय दिलेत. सगळया चाहत्यांची नावे देणे शक्य नसले तरी, एक मात्र खरं की त्यांचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया मला रोज काहीतरी ‘नवं’ करण्याची प्रेरणा देतात. पुष्कळ लोकांना उत्सुकता असते ती रोज रेडिओतून आपल्या घरी येणारी अंजली कशी दिसते याची. ह्या मुलाखतीमुळे ती उत्सुकता पूर्ण होईल असं वाटतंय…
श्रोत्याच्या प्रतिसादाचा किती परिणाम होतो?
नक्कीच होतो. त्यांच्या सूचना स्वीकारण्यासारख्या असतील तर नक्की स्वीकारते. गाण्याचे तपशील मी पूर्वी फारसे देत नव्हते. पण लोकांना ते हवे असतात असं जाणवल्यावर आता मात्र नवं, वेगळं गाणं असेल तर आवर्जून गायक-गीतकार, संगीतकार वगैरे सांगते. बरेच जण काही साईटस् सुचवतात, पुस्तके, गाणी सुचवतात. त्यातलं शक्य ते वाचण्या-ऐकण्याचा प्रयत्न मी करते. काही चाहत्यांनी विनंती केली की, रागांबद्दल माहिती द्या. आता मी काही त्यातली जाणकार नाही. मी स्वत: जर ती माहिती दिली असती तर ते कदाचित कृत्रिम वाटलं असतं. म्हणूच एका चाहत्याच्याच सूचनेवरून सुप्रसिध्द संगणकतज्ञ आणि संगीतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि आता रागांविषयी ते माहिती देत असतात.
थोडयाच काळात ‘अस्मिता’ने लोकप्रयतेच्या बाबतीत अक्षरश: मजल मारली आहे, त्यामागचं कारण सांगशील?
सोपं आहे. तुम्ही काहीही प्रामाणिकपणे दिलंत तर लोक ते स्वीकारतीलच! मराठी कार्यक्रमांचा दर्जा, तो सादर करताना असणारा आणि मिळणारा मोकळेपणा, गाण्यांची निवड, ट्रान्समिशन क्वालिटी या सगळयाच बाबतीत ‘अस्मिता’ दर्जेदार आहे. दर्जाच्या बाबतीत कुठलीही तडजोड आम्ही स्वीकारत नाही. गाणी मध्येच तोडणं, अर्धवट ऐकवणं हे करत नाही. लोकांच्या सूचनांची लगेचच दखल घेतो.
मी कधीही वेळ मारून नेण्यासाठी बोलत नाही. आजूबाजूला काय चाललंय, लोकांना काय जास्त जिव्हाळयाचं आहे, याच्यावर माझं सतत लक्ष असतं. कित्येक मराठी माणसांनाच मराठी संस्कृती विषयी आदर आपलेपणा नसतो. कारण आपली संस्कृती किती चांगली आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. ‘अस्मिता’मधून ते सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. ब-याच जणांनी मला सांगितलंय की, मराठी गाणी इतकी चांगली आहेत, किंवा मराठीतही इतकी चांगली गाणी आहेत, याची त्यांना कल्पनाच नव्हती. ‘अस्मिता’मुळे मात्र त्यांना ती ऐकाविशी वाटतात. अल्बमचं नाव विचारून ती संग्रहातही ठेवतात. मराठी कार्यक्रमांना आवर्जून जातात. कविता वाचतात. ‘नक्षत्रांचे देणे’ सारखा कार्यक्रम पाहताना ते ‘अस्मिता’ला त्याच्याशी रिलेट करतात, की अरे हे तर आपण अस्मितामध्ये ऐकलेलं गाणं आहे. किंवा सुरेश भटांबद्दल, पं. जितेंद्र अभिषेकीबद्दल ‘अस्मिता’मधून ऐकायला मिळालंय…
‘अस्मिता’च्या पहिल्या वाढदिवशी प्रा. प्रवीण दवणेंनी दिलेली प्रतिक्रिया खूप मोलाची वाटते. पुष्कळशा सातत्याने ते अस्मिता ऐकतात. त्यांनी सांगितलं की, ‘लोकांना आवडतं, ते देण्याबरोबरच लोकांना जे आवडायला हवं, तेही ‘अस्मिता’ देते. एखाद्या लावणीप्रमाणेच मर्ढेकरांची ‘मुंबापुरी’ कविताही अस्मितामध्ये ऐकायला मिळते. मला वाटतं, हेच अस्मिताच्या यशाचं रहस्य आहे.
‘अस्मिता’मधला एक दिवस वाचकांकरिता रंगवशील का?
आमचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर, राम मला, WIN ९४ ची गाडी घेऊन न्यायला येतो. मी पहाटे चार वाजता स्टुडिओत जाते. तिथे गेल्यावर आधी तंत्रज्ञांना व मग माईक ऑन करून सगळया ऐकणा-यांना उठवते! त्या दरम्यान माझं इ-मेल्स, एस्. एम्. एस्., व्हॉईस मेल्स चेक करणं सुरूच असतं. त्यातून मग ‘अस्मिता’मध्ये बोलण्यासाठी एखाद्या व्यक्तिला निवडणं वगैरे करते. सात वाजता मलिष्का आली की तिच्याबरोबर एखाद्याच मिनिटाचं धमाल बोलणं ! आणि नंतर बाहेर येऊन मेल्सना रिप्लाय देणं, मुलाखतीसाठी लोकांना कॉन्टॅक्ट करणं, पेपर वाचणं हे सगळं…
मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी काही सांगशील का?
आपण ‘मराठी अस्मिता’ जपली पाहिजे, असं बरेच जण म्हणतात. खरं तर ते आपल्या हातातच असतं. मूळात भाषा ही तिच्या ठिकाणी खूप थोर आहे, ती टिकण्यासाठी काही करणारे आपण कोणीच नसतो, पण तरीही चांगल्या कविता, नाटके, उत्कृष्ट कलाकृती यांची माहिती ‘अस्मिता’च्या माध्यमातून देण्याच्या मी सदैव प्रयत्नात असते. जिद्द, प्रामाणिकपणा व अत्युत्तम दर्जा हीच कुठलेही काम तडीस नेण्याची त्रिसूत्री आहे. आपली भाषा, आपल्या ‘मराठीपणा’तील चांगल्या गोष्टी या आपण सर्वांनीच जपायला हव्यात. लोकांची वाचन करायची आवड इंटरनेटच्या माध्यमातून आपण वाढीस लावत आहात, याबद्दल मराठीवर्ल्डच्या संपादकांचे हार्दिक अभिनंदन. मराठीवर्ल्डच्या रसिक वाचकांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. धन्यवाद!!
मुलाखत व शब्दांकन – अनघा दिघे