मुक्तांगण कविता

बटाटेवडा
”मराठमोळी कुठे अस्मिता?” पुसले मजला कधी कुणी
”बटाटेवडा” उत्तर माझे ओठी येईल त्याच क्षणी

रंग कसा तो सुवर्णकांती खरपुस ठिपके मधे मधे
नसूण चटणीसंगे येतो, नकळत शिरतो मुखामधे

तिखट मराठी तलवारीपरि तिखट तयाचा प्राण असे
मिळमिळित कधि झाला तो तर, ”पुचाट” गणला जात असे

मराठी भाषेची रसवंती वडयांवरि जरी ना दिसते
वास तळणीचा खमंग येता जिव्हेवर ती रसरसते

संतांच्या वचनाला स्मरूनी भेदभाव तो करीत नसे
तारांकित हो हॉटेल किंवा हातगाडीवर शोभतसे

मर्‍हाठीचा रांगडेपणा हो कृतीत त्याच्या भिंनलेला
नवशिक्याने केला तरीही, कधी पाहिला फसलेला?

संगीत, नाटक वेड मराठी रक्तातच जे मुरलेले
वेड तेच, दिसतात वडे हे रंगमंदिरी तळलेले

‘उद्योजकता”, कानमंत्र आजच्या युगाचा ठरलेला
वडा-पाव विकणार्‍या शाखा शाखांनी तो अनुसरला

मुलुखगिरी शिवबाची, अमुच्या परंपरेची शान असे
दूरदेशीच्या मंडळातही ‘वडे-पताका’ फडकतसे

”माय मराठी, तशी संस्कृती टिकेल ना?” कधि पुसू नका
जोवर आहे बटाटेवडा, चिंता कसली करू नका.
– कल्याणी

ओढ
मला ओढ पंढरीची
इंद्रायणीच्या डोहाची
डोहामधल्या पावन
तुकारामाच्या गाथेची

मला ओढ पणतीची
तिच्या सतेज ज्योतीची
तमातुनी तेजाकडे
नेणार्‍या प्रकाशाची

मला ओढ गाभार्‍याची
त्याच्या नि:शब्द शांतीची
अंधारात दडलेल्या
पावित्र्याची, मांगल्याची

मला ओढ करीतसे
माझ्या मनाला पावन
उजळून टाकीतसे
माझे आध्यात्मिक मन
– सौ. शर्मिला उपेंद्र कुलकर्णी, पुणे

माहेराचे गांव माझे
माहेराचे गांव माझे
पहाटेला उजाडले
वाटते की उषेसंगे
सप्तरंगी ओलावले

माहेराचे गाव माझे
उन्हामध्ये उजळले
वाटते की अरूणाचे
तेज त्याने पांघरले

माहेराचे गाव माझे
सांयकाळी सुने झाले
वाटते की शांततेच्या
अंकावरी विसावले

माहेराचे गाव माझे
अंधारात अंधुकले
वाटते की चांदण्याच्या
प्रांगणात सुखावले
– सौ. शर्मिला उपेंद्र कुलकर्णी, पुणे

माझं म्हणोनी काही नसतं
गर्व बाळगावा ज्याचा असं आपलं आपल्यशी काही नसतं
जे आहे ते कधीच नसतं हे फारच उशीरा कळतं

माझं माझं असं माझं माझ्यापाशी काहीच नव्हतं
रुपापासून गुणांपर्यंत आयुष्य सारं उसनं होतं

काही कधी का होतं माझ्यापाशी असं माझं
गुणसूत्रांची उसनवारी ही आयुष्याची नोंदवही अनाकलनीय

मलाही मानवी कल परक्याला दाखवया उरतो पुळका
आपल्याच गोताशी का जन्माचा दावा, अहंकाराचा पीळावा
नि हट्टाचा दुरावा आस्वस्त हुंकार जेव्हा आतून नसतो
– यतिन सामंत

माझं गुपित
काळजाच्या डबीत मनाच्या कुशीत
जपलंय मी माझं इवलसं गुपीत
आहे त्याचा आनंद आहे
नसल्याची नाही उणीव काही
आनंद परिमल,‬ दु:खाची मळमळ
कुठल्या भासाची तळमळ न ठेवता
जपलंय मी माझं इवलसं गुपित।।१।।

चक्रावणा-या या चक्रव्यूहातून
गुदमरणा-या गाढ गर्दीतून
विवंचनांच्या वावटळींमधून
शहाणपण माझ आटोकाट जपत
जपलय मी माझं इवलसं गुपित।।२।।

जीवाचा आटापिटा करून
कभिन्नकाळया कातकातून
माणूसकीच्या दुष्काळातून
मायेचा पान्हा जिवंत झरत
जपलयं मी माझं इवलसं गुपित।।३।।

जीवघेण्या स्पर्धेच्या गर्दीतून
बुभुक्षितांच्या हव्यासातून
पाय पायावर देण नाकारून
‘पहले आपचा’ पाढा पढत
जपलय मी माझं इवलसं गुपित।।४।।

निसटलं त्याचा शोक न ठेवून
आहे हाती जे ते सावरून
ठुसठुसणा-या भूतकाळाकडे
निर्धाराने मी पाठ फिरवत
जपलय मी माझं इवलसं गुपित।।५।।

उपेक्षेच्या रणरणत्या उन्हात
माणूसकीच्या चेंगरत्या लिलावात
रूजू पहाणा-या प्रत्येक आशेला
मुक्त जगण्याचा मक्ता देत
जपलय मी माझं इवलसं गुपित।।६।।

ऐहिक बेडया बेगडया तोडून
विसावतो मी शांतीच्या कुशीत
मी पणाच्या मोहाला सारून
सांभाळत माझं माझेपण खुशीत
जपलय मी माझं इवलसं गुपित।।७।।
– यतिन सामंत

आई
तुमचं आमचं नातं कधी
एका जन्मचं गुलाम नव्हतं‮
ऋण आपली फेडता फेडता
बंध गुंतले गाढ दृढता ।।१।।

मनाचा कुठला असा कोपरा काही
जिथे तुमचा ठसा नाही
तुम्ही लावल्या वळणांनी
सरळ झाले मार्ग जीवनी ।।२।।

दुर्धर दुर्गमशा वाटेवरती
काजळलेल्या निराश राती
संस्कारांचा दीप सोबतीला
आर्शीवादाचा कवडसा ओला ।।३।।

तुम्ही आम्हां दिलं नाही
असं काही उरलं नाही
ज्याने ओतावी कृतार्थ भरपाई
माप शोधून मिळत नाही ।।४।।

आयुष्यभर पळता पळता
विराम खचित येणार खरा
मोकळा श्वास घेऊन मांडू
पुन्हा एकदा डाव सारा ।।५।।

गळयात आपले घालून गळे
मनाला करू कणकण मोकळे
छोटया मोठया आठवणींचे
आनंद मोहोळ कल्लोळमळे ।।६।।

पांग आम्ही फेडावे कसे
ऋणांतून होऊन उतराई
जन्म पुढील बदलून पाहू
होऊनिया तुमची आई ।।७।।
– यतिन सामंत

माकड आणि माणूस
एकदा एक माकडीण बाजारात गेली
चोरून कैरी अन् डाळ घेऊन आली
माकडभाऊ बसले होते छान ऊन खात
भसाडया आवाजात कुठलेसे गाणे गात

माकडाला म्हणाली – बसलाय काय, उठा!
गुळ चांगला किसा अन् वेलदोडा कुटा

माकड: अगं ए बये, काय झालयं काय तुला
सकाळच कोवळं ऊन खाऊ दे ना मला

माकडीण: आता तुमचा पुरे झाला आराम
तुम्हाला काही करायला नको काम

माकड: काम मला सांगते, हे अतीच झालं
चार पिढ्यांनी माझ्या कधी काम नाही केलं
“म्हणे आराम पुरे”, “तू येडी का खुळी?”
ब्रेकफास्ट राहिलाय माझा मला दे चार केळी

माकडीण: सकाळपासून कससंच होतंय मला
म्हणून तेवढं स्वयंपाकाचं सांगते तुम्हाला
करा बेत शिरापूरी बटाटयाची भाजी
जोडीला भरलेली वांगी करा ताजी
चांगलचुंगलं खावसं वाटतंय मला
आबंट-तिखट चव लावा माझ्या जिभेला

सासूबाईंचे पाय जेव्हा झाले होते भारी
मामंजींनीच उचलली जबाबदारी सारी
तुमचाही पुरे आता पोरकटपणा
झाडावरून उडया मारत राहता दणादणा

माकड: काय बोलतेस तू…काही समजत नाही
पाय भारी – चकरा काही उमगत नाही
पित्त झालंय तुला म्हणून हा त्रास होतो
आत्ता जाऊन तुझ्यासाठी मोरावळा घेऊन येतो

माकडीण: अहो संसाराच्या वेलीवर उमलणार आहे फूल
इवलाश्या पावलांची लागली मला चाहूल

माकड: कसले वेल कसले फूल काहीही बोलतेस
मला अशी सारखी कोडयात टाकतेस
वेल अन् फूल, मला काय घेणे देणे
मला फक्त माहित गोड फळे खाणे

माकडीण: आता कसे सांगू तुम्हाला, काही समजत नाही
अहो तुम्ही बाबा होणार अन् मी होणार आई
घरात आपल्या छोटेसे बाळ आता येणार
त्याच्या माकडलीलांनी घर आपले भरणार

माकडाची टयुब जरा उशीरानेच पेटली
घरातच त्याने मग कैरी डाळ वाटली
शेपूट तोंडाला लावून माकडीण हसली
कैरीला खाता खाता मनात म्हणत बसली

माणूस काय अन् माकड काय
माणूस काय अन् माकड काय
‘त’ वरून ताकभात ओळखणे यांना माहितच नाय
यांना माहितच नाय!
– सौ. शर्मिला उपेंद्र कुलकर्णी,पुणे

गाडीचा धडा
साडेसातीची बाधा ही, मनोमनी पटले,
गाडी शिकावी, खूळ कोठले, मनामधे उमटले – १

जाहिर करता बेत मनीचा, घर कां हादरले?
आठया कपाळी नवर्‍याच्या, लेकाने तोंड फिरविले – २

अट्टाहासाने जेव्हां मी टुमणे लावुन धरले,
वरकरणी मग हासुनी यांनी गराज ते उघडले – ३

बसली जेव्हां स्वारी यांची शेजारी खाशी,
झाले चालक, मनी घोळवित स्वप्नांच्या राशी – ४

लावुनी किल्ली सुरू करताना गाडी कां अडली?
”हेही येईना तुला?” चिडचिड कानांवर आली – ५

गियर टाकुनी घेता गाडी गराजबाहेरी,
”गियर, ब्रेक, क्लच” या शब्दांच्या सटसटल्या फैरी – ६

”जरा हळू घे, जा जोराने, वळवी उजवीकडे,
थांब, थांब की, लक्ष तूझे ना लाल दिव्याच्याकडे? – ७

दिसते कां तूज समोर आहे आली म्हातारी?
माझे आई, दाब ब्रेक, तिज धाडिशी देवाघरी?” – ८

क्षणाक्षणाला वाढत जाई गोंधळ मनातला,
घाम कपाळी, उरात धडधड, तळहातही ओला – ९

”लाव ब्रेक” ऐकता पाय कां अँक्सलरेटरवर?
नकळत गाडी आली कैशी रोड डिव्हायडरवर? – १०

चडफड, धुसफुस करीत संपला पहिला – वहिला धडा,
पुन्हा: पुन्हा: हा अनुभव येता कानी लाविला खडा – ११

धरला रस्ता ड्रायव्हिंग स्कुलचा, पाहिट केले रिते,
लाख चुका जरी केल्या, अंती लायसेंन्स हातामधे – १२

सराव झाला आता पुरता, चालक मीच सदाची,
तरी समोरूनी आला ट्रक तर, मूठ घट्ट यांची – १३

कधी उसासे, चुकचुक चाले, घाली न मी भीक,
झाली कटकट असह्य तर करी, मी यांना ठीक – १४

”पाच अपयशे तुमच्या भाळी, मी फटक्यात यशस्वी”,
लायसेन्सची त्यांची फजिती सुनवी हसत मनस्वी – १५

परंपरा ही चालत आली अगणित दशकांतुन,
स्त्रीयांस सादर केली, निश्चित धडा शिका त्यातून – १६

गाडी खरिदण्या पाकिट घ्यावे खुशाल नवर्‍याची सत्ता,
आपण हाणावी गाडी कशी ही समजुनी स्वमालमत्ता – १८
गाडी कधीही नका शिकू पण आपल्या नवर्‍याकडे,
बायांनो तुमच्या हितास्वत, घाली मी साकडे – १९
– कल्याणी