ट्रंपुल्या, ट्रंपुल्या

ट्रंपुल्या, ट्रंपुल्या, रडायचे नाही,
खुर्चीसाठी हट्ट आता करायचा नाही ——- ध्रु .

गेली चार वर्षे किती केलास धिंगाणा,
तरी कुणी केला तुझ्या नांवे ठणाणा?
“व्हाईट हाऊस” सोडून आता आपल्या घरी जाऊ,
तूप-भात-मेतकूट मऊ आवडीने खाऊ ————–१

मारल्यास किती थापा, तुला आठवते कां रे?
काय होतास बोलत, तुला समजले कां रे?
कमला-जो आवरतील तू घातलेले राडे,
घरी जाऊन आपण पिऊ करोनाचे काढे! ———–२

मेक्सिकोची भिंत आता बांधायची नाही,
गोरा-काळा भेद आता करायचा नाही,
विज्ञानाच्या मदतीने मंगळावर जाऊ,
खेळातले घर तुझे तिथेच ठेवू ———————३

देशोदेशी नांव तुझे झालेलेच आहे,
नवेशब्द तुझ्या नांवे भाषेतही आले,
भारतात शिकविती “नको रे दर्पोक्ती”
आता तिथे म्हणतात , “नको रे ट्र्म्पोक्ती”——— ४

मेलेनिया म्हणते तुझा आला कंटाळा,
“माझ्या जागी प्रेमळसे कुत्रे तुम्ही पाळा”
जरी ती गेली दुसरी आणायची नाही,
आपली आपली भातुकली सोडायची नाही! ——-५

ट्रंपुल्या, ट्रंपुल्या, रडायचे नाही,
खुर्चीसाठी हट्ट आता करायचा नाही ——- ध्रु .

– कल्याणी गाडगीळ, पुणे