चटण्या – कोशिंबीर

चटण्या

कोशिंबीर

लोणची

पानात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना आपल्याकडे तसे वरचे स्थान आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याच्या लोणच्यांचे दिवस आल्यासारखे वाटते.

डिसेंबर-जानेवारी महिन्यात लिंबाचे लोणचे घातले जाते. याशिवाय कच्ची करवंदे, भोकरे, माइनमूळ, मिरची, विविध भाज्यांची तात्पुरती लोणची ही जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी खाल्ली जातात. उन्हाळयाच्या दिवसात भाज्या फारशा चांगल्या मिळत नाहीत व मिळाल्याच तर त्या खूप महाग असतात. त्यावेळी पूरक तोंडीलावणे म्हणून यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. प्रत्येकाला जेवणात काहीतरी नवीन, चटकदार हवे असतेच. वेगवेगळया चटण्या-लोणची किंवा कोशिंबीरी जेवण अधिक रूचकर बनवितात. अशा चटकदार चटण्या कोशिंबीरींच्या कृती येथे नमूद केलेल्या आहेत.

कैरीचे लोणचे

mango-achar साहित्य – दीड किलो लोणच्याच्या कडक कैर्‍या (साधारण मध्यम आकाराच्या १३-१४ कैर्‍या), २५० ग्रॅम मीठ, २ चमचा मेथीचे दाणे, ४ चमचे हळद, १० ग्रॅम हिंग खडे, ८ चमचे तिखट, १०० ग्रॅम मोहरीची डाळ, २५व ग्रॅम गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी ३ चमचे.

कृती – प्रथम मीठ भाजून घ्यावे म्हणजे कैर्‍यांना फार पाणी सुटत नाही. कैर्‍यां धुवून, पुसून घ्याव्यात. कैरीच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात व त्यांना मीठ व हळद लावून ठेवावे. ३-४ चमचे तेल एका पातेल्यात घालून त्यात हिंग व मेथी तळून घ्यावी, नंतर त्याच तेलात हळद परतून घ्यावी. पातेले खाली उतरवून त्यात तिखट घालून जरा हलवावे. हिंग व मेथी कुटून घ्यावी, नंतर उरलेल्या तेलाची फोडणी करून घ्यावी. स्टीलच्या पातेल्यात किंवा परातीत मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट, हिंग, मेथीची पूड व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात, त्यावर गार झालेली फोडणी ओतून लोणचे कालवावे व बरणीत भरावे. लोणच्याच्या फोडींवर तेल राहील इतके असावे.

लिंबाचे लोणचे

lemon-achar साहित्य – १० पिवळी लिंबे (मध्यम आकाराची), १ चमचा हळद, १ चमचा मेथी, २ चमचे तिखट, १ चमचा हिंग, ८ चहाचा चमचे मीठ, १ पळी फोडणीसाठी तेल.

कृती – प्रथम थोडया तेलावर मेथी परतून लालसर तळून घ्यावी. नंतर बारीक वाटून घ्यावी उरलेल्या तेलाची मोहरी घालून फोडणी करावी. एका थाळीत हिंग, हळद, तिखट एकत्र करून त्यावर ही फोडणी ओतावी. फोडणी गार होऊ द्यावी. एका लिंबाच्या आठ किंवा सोळा फोडी करून ठेवाव्यात व त्यांना मीठ चोळून ठेवावे. नंतर मेथीपूड व कालवलेले हिंग, हळद, तिखट इत्यादींचे मिश्रण व लिंबाच्या फोडी एकत्र करून बरणीत भरून ठेवावे.

मिरच्यांचे लोणचे

chilli साहित्य – अर्धा किलो मिरच्या, अर्धी वाटी मोहरीची डाळ, २ चहाचे चमचे मेथी, दीड वाटी मीठ, हिंगाची पूड ४ चमचे, हळद ३ चमचे, २ वाटया लिंबाचा रस,१ वाटी उकळून गार केलेले पाणी, १ वाटी तेल व फोडणीचे साहित्य.

कृती – मिरच्यांचे अर्धा इंच लांबीचे मधे चीर देऊन एकसारखे तुकडे करावेत. लिंबाचा रस काढून घ्यावा. १ टेबल स्पून तेलात मेथी गुलाबी रंगावर परतून घ्यावी व त्यातच हिंगाची पूड परतून दोन्ही एकत्र करून पूड करावी. मिक्सरमध्ये मोहरीची डाळ, लिंबाचा रस व हळद घालून एकजीव होईपर्यंत घुसळावे. उकळून गार केलेल पाणी थोडे थोडे घालून परत मोहरी फेसून घ्यावी. मोहरी फेसून पांढरी व हलकी झाली पाहिजे. चिरलेल्या मिरच्यांचे तुकडे, मेथी, हिंगाची पूड, फेसलेली मोहरी, लिंबाचा रस व मीठ एकत्र कालवावे. १ वाटी तेलाची फोडणी गार करून त्यावर घालावी व नंतर बरणीत भरावे.

टीप – वरील मिरच्यांना मुरायला ७-८ दिवस लागतात. तोपर्यंत बरणीतले लोणचे रोज तळापासून हलवावे. मिरच्या चिरण्याऐवजी मिक्सरमधून जाडसर कुटून वरील मसाला मिसळावा व लोणचे करावे. हे लोणचे लवकर मुरते.

भाज्यांचे तात्पुरते लोणचे

साहित्य – १ गाजर (साधारण १०० ग्रॅम), १०० ग्रॅम फ्लॉवर, १ सलगम (५० ग्रॅम), अर्धी वाटी मटारचे दाणे, ३ हिरव्या मिरच्या, १ लहानसा आल्याचा तुकडा, २ चमचे मोहरी, १/२ चमचा मेथीच्या दाण्यांची पूड, १/२ चमचा हिंग, १ चमचा हळद, २ टेबल चमचा मीठ, २ लिंबाचा रस, १ पळी तेलाची फोडणी.

कृती – सर्व भाज्या व मिरच्या चिरून त्यांना मीठ चोळून ठेवावे. मोहरी बारीक कुटून ठेवावी. आल्याचे बारीक तुकडे करावेत, नंतर हिंग हळद, मेथीपूड व सर्व चिरलेल्या भाज्या व आले हे सर्व एकत्र करावे. तेलाची फोडणी करून कालवलेल्या भाज्यांवर ती गार करून घालावी व लिंबाचा रस घालावा. हे लोणचे अत्यंत चविष्ट लागते. हे लोणचे ५-६ दिवसच टिकते.

गाजराचे लोणचे

carrots-pickle साहित्य – अर्धा किलो लालभडक गाजर, १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, ८ ते १० लिंब, पाऊण वाटी मोहरी डाळ, पाव वाटी लाल तिखट, १ चमचा हिंगपूड, १ वाटी मीठ, १ वाटी तेल.

कृती – गाजर स्वच्छ धुवून सोलून मधला पिवळा भाग काढून टाकून गाजराच्या एकसारख्या छोटया पातळ फोडी कराव्यात. लिंबाचा रस काढून घ्यावा. मिरच्यांचे गाजरासारखे छोटे तुकडे करावेत. २ टे. स्पून तेल गरम करून त्यात हिंग व मेथी तळून घ्यावी व उरलेले तेल ताटलीत तिखट, हळद घेऊन त्यावर ओतावे. मेथी व हिंग बारीक वाटून घ्यावा व त्याच पाटयावर मोहरीच्या डाळीला एक घसरा द्यावा. मेथी, हिंगाची पूड, तिखट, हळद, मीठ सर्व एकत्र मिसळावे व त्यात गाजराच्या व मिरचीच्या फोडी घालाव्यात व लिंबाचा रस घालावा. उरलेल्या तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी व ती फोडणी गार झाल्यावर लोणच्यावर घालून लोणचे बरणीत भरावे.

आवळयाचा मुरांबा

amla-muramba साहित्य – डोंगरी (अहमदाबादी) आवळे १ किलो, साखर सव्वा किलो, केशर व वेलची आवडीप्रमाणे.

कृती – प्रथम आवळे स्वच्छ पुसून स्टीलच्या किसणीने किसावेत. प्रेशरकुकरमध्ये आवळयाचा किस चाळणीत ठेवून वाफवावा. साखरेत एक ते सव्वा वाटी पाणी घालून गोळीबंद पाक करावा. नंतर त्यात वाफवलेला आवळयाचा किस घालून घट्टसर होईपर्यंत शिजू द्यावे.

टीप – हा मुरांबा पाचक, पित्तशामक, क्षुधावर्धक व जिभेची रुची वाढवत असल्यामुळे पोळी, पुरी, ब्रेडबरोबर किंवा नुसता खायला सुध्दा चांगला लागतो.

मेतकूट

metkut साहित्य – १ वाटी हरभर्‍याची डाळ, १/२ वाटी तांदूळ, १/२ वाटी उडदाची डाळ, २ चहाचा चमचा गहू, १ चहाचा चमचा जिरे, १ चहाचा चमचा हिंग, १ चहाचा चमचा हळद, २ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा धने, १ चहाचा चमचा मोहरी, १/२ चहाचा चमचा मेथीचे दाणे.

कृती – दोन्ही डाळी, तांदूळ व गहू भाजून घ्यावे. नंतर डाळी व बाकीचे सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरवर बारीक करावे. तयार झालेले पीठ नंतर चाळणीने चाळून बाटलीत भरून ठेवावे. मेतकूट बरेच दिवस टिकते, मऊ भाताबरोबर ते छान लागते.