आपल्या आहारातील भाज्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा करणे हे होय. म्हणूनच भाज्यांना आहारात फार महत्वाचे स्थान आहे. क्षार व जीवनसत्वांचे प्रमाण ताज्या भाज्यांमध्ये जास्त आढळून येते. ह्याशिवाय भाज्यांमघ्ये एक तंतुमय भाग आहे. आहारघटक म्हणून ह्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु मोठे आतडे स्वच्छ राहण्यासाठी व आतील मळ पुढे ढकलण्यासाठी व शरीराबाहेर टाकण्यासाठी या तंतुमय भागाचा फार उपयोग होतो. पालेभाज्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम, लोह (आयर्न) व जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ असते. कंदमुळात पिष्टमय घटकांचे प्रमाण जास्त असते. गाजरात ‘अ’ जीवनसत्व असते. साली सकट बटाटे वापरल्यास ‘क’ जीवनसत्व मिळते. आहारात आम्ल व अल्कली यांचे योग्य प्रमाण असणे जरूरीचे आहे. मांस, मासे, अंडी, सर्व धान्ये यात आम्ल असते. दूध, नाचणी, भाज्या व फळे ही अल्कली आहेत. कोबी, मटार, फरसबी, गाजर, लिंबू, बटाटा व मुळे ह्या भाज्यांमध्ये अल्कलीचे प्रमाण जास्त आहे. या विविध भाज्यांच्या महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या खास कृती येथे दिलेल्या आहेत.
साहित्य – पडवळ पाव किलो, भिजवलेले मूग १ वाटी, हिरव्या मिरच्या १-२, धणे, जिरे पूड, आमचूर अर्धा चमचा, मीठ चवीपुरते
कृती – मूग ७-८ तास भिजवून ठेवावेत. नंतर ते चाळणीवरून निथळून काढावेत. यात धणे, जिरे पूड, आमचूर, मीठ, वाटलेल्या मिरच्या सगळं एकत्र करावं. पडवळाचे गोल तुकडे करून आतील बिया काढून टाकाव्यात म्हणजे नळी तयार होईल. यात वरील मिश्रण भरावे. नंतर हे चाळणीवर ठेवून कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थोडया तेलाची हिंग, कडीपत्ता, मोहरी, हळद घालून फोडणी करावी. त्यावर हे उकडलेले तुकडे घालून परतावे नंतर त्यात मीठ, कोथिंबीर घालून एक वाफ काढावी व उतरावे. (ही भाजी अत्यंत पौष्टीक आणि पथ्यकर आहे. ह्दयासाठी पडवळ हे टॉनिक आहे)
साहित्य – लाल भोपळा, चिंच, मीठ, मेथी दाणे, खसखस, खोबर्याचा किस, हळद, तिखट, पिस्ता, गूळ
कृती – लाल भोपळयाच्या सालीसकट मोठया फोडी कराव्यात. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व मेथी दाणे टाकावे. नंतर खसखस व खोबर्याचा कीस टाकून परतून घेणे व त्यानंतर भोपळयाच्या फोडी टाकाव्या. चिंचेचा लहान तुकडा, तिखट, मीठ घालून पाणी न घालता भाजी मंदाग्नीवर शिजू द्यावी. शिजल्यावर थोडा गूळ घालून परतून घ्यावी. नंतर चिरलेली कोथिंबीर व पिस्ता घालून सजवावी.
साहित्य – अर्धा किलो कोवळा हिरवा घेवडा, १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, ५-६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले वाटून, ३-४ लसून पाकळया मीठ, साखर चवीनुसार, अर्धावाटी खवलेले नारळ, थोडी चिरलेली कोथिंबीर
कृती – श्रावण घेवडा दोन्ही बाजूने डेंख व शिरा काढून अगदी बारीक चिरावा व चिमूटभर सोडयाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन चाळणीत निथळात ठेवावा. जाड बूडाच्या पातेल्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करावी. चिरलेला श्रावण घेवडा टाकावा. वरतूनच पाण्याचे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यावी वाटलेली मिरची व आले, लसून घालावे, भाजी शिजल्यावर मीठ, साखर, ओला नारळ व कोथिंबीर घालून भाजी सुकी परतून उतरवावी.
साहित्य – अर्धी वाटी मुगाची डाळ, १ मोठा कांदा, कडीपत्ता, मिरजी, जिरे, हिंग, हळद, शेवग्याची कोवळी पाने, १-२ आमसुले, मीठ, फोडणीसाठी तेल
कृती – अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजत घालावी. १ मोठा कांदा बारीक चिरून घ्यावा. तेलावर कडीपत्ता, मिरची, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करून त्यावर चिरलेला कांदा परतून घ्यावा. मग मुगाची डाळ त्यावर टाकून वाफ काढून शिजवून घ्यावी. डाळ शिजवल्यानंतर त्यावर शेवग्यांची कोवळी पाने, मीठ, १-२ आमसुले टाकून भाजी वाफेवर शिजवावी. पोळी किंवा भाकरीबरोबर ती रुचकर लागते.
(शेवगा हा अतिशय उष्ण असून तो भूक वाढविण्याचं काम खूप चांगल्याप्रकारे करतो.)
साहित्य – १ जुडी मेथी, ३-४ लसुण पाकळ्या, ३/४ ते १ कप बेसन,१/२ कांदा बारीक चिरुन, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
कृती – मेथी निवडून, धुवून बारीक चिरुन घ्यावी. कांदा घालणार असाल तर बारीक चिरुन घ्यावा. लसूण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसूण घालून किंचित परतावे. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात चिरलेली मेथी घालून साधारण ३-४ मिनीटे परतावे. लाल तिखट, मीठ घालून एकदा नीट मिसळून घ्यावे. गॅस बारीक करुन मेथीमध्ये बेसन हळूहळू घालुन परतत जावे. साधारण ३/४ कप ते एक कप बेसन लगेल. मेथीला पाणी जास्त सुटले असेल तर बेसन थोडे जास्त लागण्याची शक्यता आहे. बेसन घालून नीट मिसळले गेले की कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी. गरम गरम पिठले भाकरी बरोबर वाढावे.
साहित्य – एक वाटी बेसन, दीड वाटी ताक, फोडणीचे साहित्य, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती – पातेल्यात किंवा निर्लेपच्या भांड्यात तेल हिंगाची फोडणी करून गेस विझवा. त्यात ताक घाला. परत गॅस मंद आचेवर सुरु करून बेसन पीठ टाकत मिसळा. गोळी होऊ देऊ नका. पिठले हलवत राहा. खदखद्ले की त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा. घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार ताकाच्या प्रमाणात तुम्ही बदल करू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरम भाकरी सोबत खायला द्या. ताक व्हिटॅमीन क ने युक्त असून आंबट चव असल्याने नेहमीच्या पिठल्यापेक्षा वेगळे लागते. हरभरा बेसनमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात.