जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणा-या व सावरपाडा या आपल्या गावाच्या नावाने म्हणजेच “सावरपाडा एक्स्प्रेस” म्हणून प्रसिद्ध असणा-या कविता राऊत या धावपटूने अल्पावधीत गतिमान प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षात अनेक विक्रम तिने आपल्या नावावर केले आहेत. मागील वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवून तिने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. सध्या ती ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे. या विषयी मराठीवर्ल्डने तिच्याशी केलेला संवाद ………
कविता, मागील बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही या मागचे कारण काय?
ज्या वेळी या स्पर्धेत माझी निवड झाली त्याच वेळी नेमकी माझी तब्येत अचानक बिघडल्यामुळे मी खेळू शकले नाही. माझ्या ऐवजी तेथे प्रीजा श्री धरण हिची निवड झाली. संधी आलेली असताना देखील तब्येतीमुळे हुकली ह्याची खंत वाटते.
हो खरोखर आम्हालाही वाईट वाटते पण तू ह्यातून स्वत:ला कसे सावरलेस ?
खरं तर मी नाराज होते पण फोनवरून आईच्या समंजस शब्दांनी मला आधार दिला. अजूनही कठीण प्रसंगात आईचे शब्द मला बळ देतात आणि मी जोमाने पुढच्या सरावासाठी सज्ज होते.
बीजिंग मध्ये रौप्य पदक मिळाल्यावर चाहत्यांचा प्रतिसाद कसा होता ?
चाहत्यांचा प्रतिसाद खूपच उत्साह वाढवणारा होता. भारतात आल्यावर माझे जे स्वागत झाले ते पाहून अत्यानंद तर झालाच पण माझ्या कामगिरीमुळे माझ्या आई-वडिलांचा देखील गौरव झाला ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होती. त्याच वर्षी नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी मला “नाशिक फेस्टिवल” ची ब्रॅंड अंबेसेडर घोषित केले होते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्या नंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने तुझे प्रयत्न कसे सुरु आहे ?
देशासाठी खेळतांना नेहमीच आनंद वाटतो. अब्जावधी भारतीयांचे आपण प्रतिनिधी आहोत ही भावना खूप सुखावणारी आणि जबाबदारीची असते. ऑलिम्पिक पर्यंत पोहोचणे उत्साहवर्धक पण संघर्षमय वाटचाल असते. या साठी मानसिक व शारिरीक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. सध्या मी बंगळूर केंद्रात सराव प्रशिक्षण घेत आहे. तेथील वेळापत्रकाप्रमाणे लांब अंतराच्या धावण्याचा सराव केला जातो. त्या नंतर व्यायाम, सकस आहार व विश्रांती असा कार्यक्रम ठरलेला असतो. यासाठी माझे प्रशिक्षक मार्गदर्शन करतात.
आता पर्यंतच्या तुझ्या यशस्वी कामगिरीत सर्वात मोठा सहभाग कोणाचा ?
शाळेत असतांना, धावण्याच्या शर्यतीत माझा पहिला क्रमांक आला तेव्हा माझ्या आईवडिलांना माझे कौतुक वाटले नव्हते. परंतु माझे खेळातील गुण विजेद्रेसिंग सरांनी हेरले. माझ्या आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे सरांनी माझे शिक्षण व राहण्यची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यामुळे आज मी जे काही आहे ते सरांमुळेच.
कविता, कुटुंबापासून दूर असल्याने सणासुदीच्या दिवसात तुला गावाकडची आठवण येते का ?
सध्या मी घरांपासून दूर असल्याने कुटुंबाची व गावातील मित्रमैत्रिणींची सणांच्या दिवसांत खूप आठवण येते. आमच्या गावात अनेक सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. गोडधोड खाण्यापिण्याची चंगळ असते. मलाह्या सगळ्याची खूप आठवण येते.
थोडक्यात कुटुंबाविषयी काय सांगशील ?
माझे वडील रामदास राऊत हे वनखात्यात नोकरीला होते. बदली झाल्याने त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि गावीच शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आई घरकाम करते. मला दोन भाऊ आहेत, एक मुंबईला पोलीस खात्यात आहे तर दुसरा नाशिकमध्येच उच्च शिक्षण घेत आहे. माझ्या कामगिरीचा माझ्या कुटूंबाला अत्यंत अभिमान आहे.
मुलाखत – विजय निरभवणे
नुकत्याच झालेल्या ठाणे वर्षा मॅरेथोन स्पर्धेत नाशिकच्या मोनिका आथरे हिने प्रथम क्रमांक मिळवून सर्वाना धक्का दिला आहे. कोण आहे ही मोनिका हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी केलेली बातचीत.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर सराव करणारी मोनिका म्हणते, “मी मुळची दिंडोरी तालुक्यातील, पिंपळगाव-केतकी या गावची, पण लहानपणापासूनच नाशिककर.”
तुझ्या घरात तुझ्याशिवाय अजून कोणी खेळाडू आहेत का?
नाही. पण माझ्या वडिलांनी मला खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले, त्यांच्यामुळेच मी खेळाकडे वळाले.
तूझे शिक्षण कोणत्या शाळेत झाले? शाळेकडून सहकार्य मिळाले का?
माझे शिक्षण नाशिकच्या मराठा हायस्कूल येथे झाले. आमच्या शाळेचे क्रीडा शिक्षक हेमंत पाटील यांनी माझ्या धावण्याच्या शैलीमुळे मला धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी नाशिकला झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला.
पाटील सरांनीच माझी धावण्याचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग सरांची ओळख करून दिली. त्यांनी मला रोज सरावासाठी येशील का असे विचारले. विजेंद्र सिंग हे नाशिकच नव्हे तर जगभर सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेली धावपटू कविता राऊतचे प्रशिक्षक आहेत त्यामुळे कविता राऊतच सोबत सराव करण्यास मिळणार या कल्पनेने मी अगदी भारावून गेले.
तुझा रोजचा सरावाचा कार्यक्रम कसा असतो?
नाशिकच्या भोसला कॉलेजच्या मैदानावर रोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते साडेसहा पर्यंत आम्ही धावण्याचा सराव करतो.
तुझ्या आतापर्यंतच्या स्पर्धात्मक कामगिरीबाबत सांगशील?
भोसला कॉलेजच्या मैदानावर रोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते साडेसहा पर्यंत आम्ही धावण्याचा सराव करीत असल्याने आम्ही विविध स्तरावर होणा-या स्पर्धेमध्ये सहभागी होता येते. त्यात मला अनेक पदके देखील मिळाली आहे.
ठाणे वर्षा मॅरेथोन या स्पर्धेमुळे तू प्रकाशात आली त्याबाबत सांग.
ठाणे वर्षा मॅरेथोन स्पर्धेत मी २००९ मध्ये सहभाग घेतला होता पण माझ्या पुढे असलेला पायलट मार्ग चुकल्याने मी जवळपास एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर त्या पायलटला त्याची जाणीव झाल्याने पुन्हा मागे येऊन मुख्य मार्गाला लागले. तरीही त्या स्पर्धेत मी महिलांच्या गटात दुसरी आले होते.
या वर्षी झालेल्या स्पर्धेत १५ कि.मि.चे अंतर १ तास २ मिनिटे ८ सेकंद ही वेळ देऊन मागच्या वर्षी हुकलेले विजेतेपद खेचून आणले.
या विजयाचे श्रेय तू कोणाला देशील?
अर्थातच माझे वडील, प्रशिक्षक विजेंद्र सिंग सर आणि कविता राऊत. या स्पर्धेसाठी कविताने मला महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
या स्पर्धेत तू दिलेली वेळ आणि तुझे प्रशिक्षक विजेंद्र सिंग सर यांनी घेतलेली वेळ यामध्ये तफावत असल्याची चर्चा होती याबाबत तुला काय वाटते ?
प्रशिक्षक विजेंद्र सिंग सर यांनी मी ही स्पर्धा ५८.२० मिनिटांत पूर्ण केल्याचे सांगितले, पण आयोजकांतर्फे घेण्यात आलेली वेळच ग्राह्य धरण्यात येत असल्याने मी व माझ्या प्रशिक्षक यांनी वाद घातला नाही, मी विजेतेपद मिळविले असल्याने आम्ही दोघेही खुश होतो.
तुझे यापुढचे ध्येय काय आहे?
मला कविताच्या पावलावर पाऊल ठेऊन नाशिकचे त्याचप्रमाणे पिंपळगाव केतकीचे नाव जगात प्रसिद्ध करावयाचे आहे.
मुलाखत – अविनाश खैरनार