हार्मोनियम हे सर्वांना सुपरिचित असे वाद्य. हार्मोनियम मधे योग्य ते बदल करून त्याला ‘संवादिनी’ हे समर्पक नाव देऊन स्वतंत्ररित्या आपली कला सादर करण्याचे प्रयत्न केले पंडित चिमोटे गुरूजी ह्यांनी. चिमोटे गुरूजींचे अथक परिश्रम, कला आणि संगीतज्ञान त्यांचे शिष्य समर्थपणे पुढे चालवत आहेत. त्यांच्याच एका प्रतिभावान शिष्याशी गप्पांचा योग आला. राजेंद्र वैशंपायन हे पंडितजींचे शिष्य सध्या परदेशात असून संवादिनीचा प्रचार व प्रसार हे व्रत म्हणून जोपासना करीत आहेत. त्यासाठी http://www.samvadiniartiste.com हे संकेतस्थळ कार्यरत आहे. व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असणारे राजेंद्र तितक्याच तन्मयतेने संवादिनीवर आपली बोटे फिरवतात. राजेंद्र ह्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून तबला शिकायला सुरूवात केली. घरातले वातावरण ‘संगीतमयच’ होते. आई सतार वाजवायची तर वडिल अप्रतिम भजन म्हणत असत. दोन्हीकडचे आजोबाही संगीत साधकच होते. त्यामुळे साहजिकच राजेंद्र आणि अरूंधती ह्या दोन्ही मुलांनी अनुक्रमे तबला आणि गाणं शिकायला सुरूवात केली. राजेंद्रच्या तबला वादनाची सुरूवात भांडी, ताट-वाटया वाजवून झाली हे वेगळे सांगायलाच नको.
प्रश्न – आपल्या मायभूमीबद्दल काय भावना आहेत?
राजेंद्रचे तबला शिक्षण तसे सुरळीत चालू होते इंजिनीअरींगचा अभ्यास सुरु असताना थोडाफार तबल्याचा रियाज होत असे. त्याच काळात राजेंद्रच्या बहिणीने पं. चिरोटे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला जायचं असं ठरलं तिची सोबत म्हणून राजेंद्रही पंडीतजींच्या ‘संवादिनी संगीतालयात’ गेला. आणि तिथेच त्याची पं.चिमोटेंशी पहिली भेट झाली. राजेंद्रला खरं तर शास्त्रीय गायन विशेष भावत नसे. आणि जे थोडं गाणं तोपर्यंत त्याच्या कानावर पडलं त्यामुळे असेल कदाचित पण ‘भूप’ या रागाविषयी जरा अधिकच आकस होता. (राजेंद्र आता त्याच्या त्यावेळचा तोकड्या ज्ञानाबद्दल कबूली देतो) पण त्यावेळी कर्मधर्मसंयोगाने ‘भूप’ रागच पंडितजी शिष्यांना शिकवत होते. सर्व वातावरण ‘भूपमय’ झाले होते. राजेंद्रच्या शब्दात सांगायचे तर “I was mesmerised”. शास्त्रीय संगीत इतके मधूर असू शकते ही जाणीव पहिल्यांदाच राजेंद्रला झाली. त्यानंतर महिन्याभरातच गुरूजींच्या ‘सोलो’ संवादिनीचा कार्यक्रम दादर (मुबंईत) होता. गुरूजींनी त्यावेळेला ‘रागेश्री’ वाजवला. प्रेक्षकगृहात सूरांचा स्वर्ग निर्माण झाला होता….आणि राजेंद्रला त्याचे गुरू सापडले होते.
राजेंद्रला गुरू तर सापडले पण वाद्य कोणते निवडावं याविषयी राजेंद्रच्या मनात बरच द्वंद्व त्यावेळी सुरु होतं. गळा हे एका प्रकारचे वाद्य होय, ज्यातून ह्दयाचे सूर निघतात. आधी “सतार शिकवाना” अशी राजेंद्रची विनंती अमान्य केल्यावर संवादिनी शिकविण्याची तयारी गुरूजींनी दाखवली. मे महिना.. प्रथम वर्ष इंजिनिअरींगची परीक्षा तोंडावर आलेली आणि राजेंद्रची संगीत शिक्षणाला सुरूवात झाली. सारेगम फिरवणारी बोटे इतकी रमली की अजूनही त्यांची ‘लगन’ लागलेली आहे.
रूढ अर्थाने शैक्षणिक सत्र संपल्यावर राजेंद्रने आर्थिक स्थैर्याकरिता अमेरिकेची वाट धरली. सोबत आणि साथ अर्थातच संवादिनीची. रूटीन नोकरीबरोबर सुरूवातीला लॉस अँजल्स येथे राजेंद्रने शिकवायला सुरूवात केली होती. पण स्वत:च्या रियाझाकरिता अधिक वेळ देता यावा म्हणून तेही बंद केले. परदेशात आल्यावर राजेंद्रला मोठया लोकांचा सहवास जास्त जवळून मिळाला. पं. जसराज, झाकीर हुसेन, वीणा सहस्त्रबुध्दे, अश्विनी भिडे- देशपांडे असे आणि अनेक दिग्गजांच निरीक्षण करता आलं. परदेशात वातावरण जास्त ‘ओपन’ आहे तसेच तिथल्या लोकांनाही भारतीय संगीताबद्दल आकर्षण आहे. पं. चिमोटेना सुरूवातीला संवादिनीबद्दल एक आकस सहन करावा लागला होता तो राजेंद्रच्या वाटयाला आला नाही. तसेच राजेंद्रला अनेक प्रयोग करण्याचीही संधी परदेशात उपलब्ध झाली. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय संगीत ह्यांची सांगड घालायचे प्रयोग राजेंद्रने केले आहेत.
राजेंद्रची वीणा सहस्त्रबुध्देंची आठवण आवर्जून सांगण्यासारखी.. लॉस अँजलीसला वीणाताईंचा प्रयोग असतांना राजेंद्रने कार्यक्रमानंतर त्यांच्याकडून काही शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वीणाताई त्यावेळेला ‘डेव्हीसला’ उतरल्या होत्या. म्हणजेच एकूण जाऊन येऊन १२ तासांच्या अंतरावर. वीणाताईंचा होकार मिळताच राजेंद्रने वीकएन्डला ड्राईव्ह करून त्यांचे घर गाठले. परत सोमवारी येऊन ऑफिस आणि परत पुढच्या आठवडयात वीणाताईंकडे मुक्काम. राजेंद्रचे कष्ट आणि संगीतप्रेम बघून वीणाताई प्रभावित तर झाल्याच पण त्यांच्या संगीताचे दरवाजे राजेंद्रसाठी खुले झाले. आता वीणाताई अमेरिकेत असल्या की, राजेंद्रची भेट ही नक्की असते.
संगीत क्षेत्रातील दिग्गज आपल्या मुलांना पुढे आणण्याच्या प्रयत्नात आहेत पण तुम्हाला तसा गॉडफादर नाही याबद्दल तुमचं काय मत आहे? हया प्रश्नाचे उत्तर राजेंद्रने अतिशय सकारात्मक पध्दतीने दिले. ते म्हणतात, “संगीताचा एक हिरा तयार होण्यासाठी मागच्या तीन पीढयांनी पैलू पाडावे लागतात. हे एक ‘मिशन’ आहे त्यात निस्वार्थतता आणि सातत्य हवे त्यामुळे जेव्हा मागच्या पीढीचे गायक, वादक जेव्हा आपल्या मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. तेव्हा मला त्यात काही वावगे वाटत नाही. संगीत हा ज्ञान सागर आहे, मागच्या पिढीने पुढच्या पीढीला प्रोत्साहन देणे वावगे वाटत नाही. आणि माझं म्हणाल तर कलाकारांत जर दम असेल तर प्रेक्षकच त्याचा निवाडा करतात. परिश्रम, हुशारी, आणि ‘लगन’ ही कधीतरी पुढे येणारच. एखादयाच्या प्रारब्धात नाव कमवणे असेल तर कुणीही ते हिरावून घेऊ शकत नाही”.
राजेंद्रसाठी कुठलेही संगीत त्याज्य नाही. अगदी लोकसंगीतापासून ते सिनेसंगीतापर्यंत. आजच्या पीढीचे ए.आर.रेहमान, शंकर महादेवन हे प्रतिभावान कलाकार आहेत. ‘कजरारे’ची बांधणी राजेंद्रला अतिशय ‘क्रिएटीव्ह’ वाटते. त्यामुळे सच्चे सूर आणि प्रतिभा ह्यांना त्याला मनापासून दाद दयावीशी वाटते. राजेंद्रच्या संगीत वाटचालीत पंडित चिमोटेजींचे स्थान सर्वात वरचे. गुरूजींच्याच शब्दात सांगायचे तर ज्या दिवशी माणसाला स्वत:च्या आयुष्याचे ध्येय कळेल त्या दिवशी संपूर्ण जीवनाचा प्रवास त्याच दिशेने सुरू होतो. मग वाटेत येणा-या अडचणी हया गौण ठरतात. सुरेशदादा तळवळकरांमुळेही राजेंद्र प्रभावित आहेत. सुरेशदादांच्या शब्दात सांगायचे तर, “मागच्या पीढीने भर टाकूनच पुढे पीढी आगेकूच करते.”
गप्पांच्या शेवटी राजेंद्रने गुरूजींची एक अतिशय हळवी आठवण सांगितली. गुरूजींचे शिकवणे म्हणजे मुक्तद्वार होते. जो तो आपल्या कुवती प्रमाणे ज्ञान ग्रहण करीत असतो. एकदा क्लास संपल्यावर स्टेशनकडे जात असतांना गुरूजी हळवे झाले आणि राजेंद्रच्या पाठीवर हात ठेऊन म्हणाले, “राजू, माझ्यानंतर तुला संवादिनी सांभाळायची आहे. विश्वासाने आणि निश्चयाने कार्य करत रहा. जरूर होईल”. केवढा विश्वास आणि किती मोठी जबाबदारी !
राजेंद्रच्या मते गुरूजींनी संगीताचा अपरंपार सागर निर्माण करून ठेवलाय आणि ते फक्त सैनिकाची भूमिका बजावता आहेत. राजेंद्रने लावलेले सूर.. त्यात त्यांची इतकी समाधी लागली आहे जणू सारे विश्वच सूरांनी व्यापले आहे.
मुलाखत व शब्दांकन – भाग्यश्री केंगे