ब्राझीलमधील रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावातील दत्तू भोकनळ यांनी नौकानयन मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 6 ऑगस्ट रोजी या स्पर्धेत सहभागी होऊन नौकानयन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. या स्पर्धेत त्यांनी नेत्रदीपक खेळ केला होता पण पदकापासून ते आठ सेकंद दूर राहिले. ते आठ सेकंद २०२० मध्ये होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिक मध्ये भरून काढणार असल्याचे सांगितले.
प्रश्न – देशाचे स्वाभाविकच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत केले; काय वाटते आहे?
उत्तर – खूप छान वाटतंय. हा खेळ शारीरिक दृष्ट्या फार अवघड आहे तरी देखील सर्व कसोट्या पार करत रिओ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून थोड खटकत आहे कि पदक नाही मिळवू शकलो. पण टोकिओ मध्ये अंतिम लक्ष्य गाठायचंच आहे.
प्रश्न – चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही ते रिओ… काय सांगाल या प्रवासाबद्दल…
उत्तर – संघर्षमय प्रवास…घरी परिस्थिती हालाखीचीच होती. इयत्ता पहिली ते नववी चे शिक्षण कष्टाचे झाले. वडील विहिरीचे काम करायचे. इयत्ता नववीला असताना वडील आजारी पडले. त्यांच्या औषधोपचारासाठी विहिरीचे सर्व साहित्य विकले. मजुरी करुन घर चालवले. अशातच 2011 मध्ये वडील वारले. घराचा प्रमुख आधार हरपल्यानंतर गावातील मंडळींकडूनही फारसे सहकार्य मिळायचे नाही. फार वाईट वाटायचे. या काळात काका आणि मामा यांनी मला आधार दिला. प्रतिकुलताच आपल्याला घडविते. त्याचवेळी ठरवलं ग्रामस्थांचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी मोठी कामगिरी करायची. सैन्यदलात आल्यानंतर सारच बदलत गेल. सुभेदार कुदरत अली यांनी खूप मार्गदर्शन केल. 2014 साली पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळविले.पुढे पात्रता फेरीत 2 किमी अंतर 7 मिनिटे 14 सेकंदात पार करुन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो; नुकत्याच झालेल्या अमेरिका राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आणि आता यात भर म्हणजे रिओ ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व.
प्रश्न – आपल्या मायभूमीबद्दल काय भावना आहेत?
उत्तर – नाशिक मधील खेडेगावात जन्म झाला. संघर्ष काय असतो आणि खडतर परिस्थितीत आपल्या ध्येयावर लक्ष कसे केंद्रित ठेवायचे हे नाशिकने शिकवले. पुढे पुण्यामध्ये नाशिक फाटा परिसरात सराव करत असल्याने पुण्याचेही बरेच योगदान आहे. राज्य सरकारनेदेखील अर्थसहाय्य केले.
प्रश्न – पारंपरिक खेळाकडे वळण्याऐवजी या खर्चीक क्रीडाप्रकाराकडे कसे वळलात?
उत्तर – सन 2012 मध्ये सैन्यदलात वाहनचालक म्हणून रुजू झालो. तोपर्यंत या खेळाबद्दल काहीच माहिती नव्हते. सुभेदार कुदरत यांनी माझी शरीरयष्टी बघून या खेळाची गोडी लावली आणि मार्गदर्शन केले. नौकायननमध्ये आवड निर्माण झाली; स्पर्धा जिंकू लागलो. हे सर्व कसे आणि किती वेगाने घडले ते मला देखील कळले नाही.
प्रश्न – द.कोरिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत 2 किमी अंतर 7 मिनिटे 14 सेकंदात पार करण्याची छान कामगिरी केलीत. हे कसे जमले?
उत्तर – 2015 च्या आशियन स्पर्धेत पाठीचे दुखणे असतानाही खेळलो होतो. त्याचवेळी रिओ ऑलिम्पिक मध्ये खेळायचं हे लक्ष्य ठरवलं होत आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींचे नियोजन केलेले होते. मेहनतही घेतली.
प्रश्न – आताच आपण सांगितले की, सगळ नियोजनानुसार चालू आहे. गेल्या वर्षभरात कसं होत नियोजन आणि यापुढे आपल नियोजन कस असणार आहे?
उत्तर – राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक इंदरपाल सिंग यांनी एक वेळ ठरवून दिली होती. त्याच वेळेसाठी झटत होतो. शरीरात फॅटस् अजीबात नाही ठेवले. जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढवत होतो. एवढ्या वेळेत एवढे अंतर पार करण्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर होत त्यामुळे तेवढी वेळ नोंदवता आली. आणि इथून पुढे म्हणाल तर आता सराव फक्त टोकिओ ऑलिम्पिक लक्ष्य समोर ठेवूनच.
प्रश्न – 2012 मध्ये ज्या खेळाबद्दल किंचितही माहिती नव्हती त्या खेळात प्राविण्य मिळवत ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व केले….काय सांगाल याबद्दल.
उत्तर – याचे सर्व श्रेय मी माझे प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या मार्गदर्शकांनाच देईल. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित करुन या खेळासाठी मला तयार केल. मी निश्चित प्रयत्न केले पण त्यासाठी व्यवस्थित दिशा त्यांनीच मला दिली.
प्रश्न – रिओ वरून आला आहात त्याबद्दल सैन्य दलातील अधिकारी आणि समाज यांच्या काय भावना आहेत?
उत्तर – रिओ वरून आल्यावर सगळं बदललं आहे. आधी सहसा दुर्लक्ष केल जायचं पण आता सगळे स्वत:हून लक्ष देताय. सैन्यदलातील अधिकारी वर्ग नेहमीच प्रोत्साहन देत आलेला आहे आणि आता सुद्धा सर्वच स्तरातून माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
प्रश्न – आपण ऑलिम्पिकला प्रतिनिधित्व करणारेरे पहिले महाराष्ट्रीयन नौकानयनपटू आहात ? उदयोन्मुख खेळाडूंना काय संदेश द्याल?
उत्तर – आधी ध्येय नक्की करा आणि कायमस्वरूपी त्यावरच टिकून रहा. प्रशिक्षकांना खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतात. खेळाडू सर्व प्रयत्न करतात पण अंतिम क्षणाला आशा सोडून देतात आणि अपयशी होतात. खेळाडूंनी तसे न होऊ देता शेवटपर्यंत टिकून रहायला हवे. नकारात्मक विचारांना कुठेही थारा द्यायला नको. एक नकारात्मक विचार सारं काही उध्वस्त करतो.
प्रश्न – आपण रिओ मध्ये खेळण्यासाठी पाण्यात उतरत होता तेव्हा काय भावना होत्या…
उत्तर – फार अभिमानाची वेळ होती ती. जेव्हा पाण्यात उतरण्यासाठी बोट काढली तेव्हा तिरंग्याकडे बघून आपोआपच आत्मविश्वास जागृत झाला..आणि तो तिरंगा तुलनेने सर्वात उंच कसा जाईल याचसाठी प्रयत्न केला…पण काही कारणास्तव त्यापासून दूर राहिलो.. आता मला दुसरे काहीच माहिती नाही. टोकिओ मध्ये पदक मिळविणारच…
प्रश्न – आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
उत्तर – धन्यवाद.
शब्दांकन- वैभव कातकाडे