वेलिंग्टनच्या, न्युझीलंडच्या राजधानीतील, “द वेलिग्टोनियन” (The Wellingtonian) वृत्तपत्रात भारतीय तरूणाचा फोटो पाहिला. छान गुरू कुडता घातलेल्या तरूणाची तबल्यावर पडलेली बोटे…फोटोग्राफरने बोटांची ती हालचाल अचूक टिपली होती. तबल्याच्या सुंदर टणत्कार कानात उमटवणारी…मन थेट भारतीय संगीत मैफिलीत घेऊन जाणारी….पण हा फोटो प्रत्यक्षात भारतीय मैफिलीत नेणारा नसून न्यूझीलंडच्या “सिंफनी ऑर्केस्ट्रा” कडे घेऊन जाणारा होता. कुतुहलाने बातमी वाचली आणि आनंदाचा छानसा धक्का बसला. हा तरूण म्हणजे भारतातला…नव्हे आपल्या पुण्यातला संजय दीक्षित. मग तर फारच आपुलकी वाटली. आपला गाववाला हो काही झालं तरी!
संजयची पहिली भेट झाली ती गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमात. हल्ली ऑकलंडमध्ये व वेलिंग्टनमध्ये दिवाळी धामधुमीत साजरी होते. ऑकलंड सिटी काउन्सिलतर्फे सौ. वीणाताई सहस्त्रबुध्दे यांच्या शास्त्रीय संगीताचा व त्यानंतर श्री. मिलिंद तुळणकर यांच्या जलतरंगाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. वीणाताईंना व तुळणकरांना तबल्यावर साथ देणारा संजय. कार्यक्रम अप्रतिम झाले. कार्यक्रमानंतर कलाकारांचे कौतुक करण्यासाठी जेव्हा स्टेजच्या मागे गेले तेव्हा संजयची प्रत्यक्ष भेट झाली. संगीताच्या आवडीचा समगुणधर्म आमच्या स्नेहाचा धागा पुढे विणत न्यायला उपयुक्त ठरला.
व्यवसायाने आय.टी क्षेत्रातला संजय रशिया, अमेरिका, जपान, स्वीडन, चीन अशी जगाची सफर करून शेवटी न्यूझीलंडच्या राजधानीत – वेलिंग्टनमध्ये स्थिरावला आहे. विकसित देशांच्या दृष्टीकोनातून (भारताच्या दृष्टीकोनातून नव्हे) “laid back” म्हणजे “निवांsssssत” अशी येथील जीवनपध्दती. ती संजयला आवडली. ते स्वाभाविकच आहे. आपला व्यवसाय करतांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी शक्ती कामावर संपवून आपल्या आवडीच्या कामाला वेळ व ताकतच नाही असे कसे चालणार? संजयला तर नाहीच! कारण तबला वाजविणे हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दिवसभराच्या थकावटीनंतर घरी येऊन तबला काढून त्यावर बोटे चालवली की संजयचा थकवा दूर होऊन तन-मन उत्साहाने भरून जाते. तासभराच्या रियाजानंतर सकाळी उठल्यावर वाटते तसे ताजेतवाने व प्रसन्न त्याला वाटते. तबल्याच्या रियाजासाठी हा मोकळा वेळ मिळण्यामध्ये संजयची पत्नी रेवा हिचा मोठा वाटा आहे. रेवा IBM मध्ये पूर्ण वेळ काम करते. दिवसभराचे हे काम करतानाच कल्याणी (१२ वर्षे) व चिन्मय (७ वर्षे) अशा दोन मुलांची देखभाल, त्याचे अभ्यास-खाणे-पिणे व इतर सांसारिक जबाबदा-या ती समर्थपणे पेलून संजयला त्याच्या आवडीच्या तबला-रियाजाला मोकळा वेळ मिळवून देते. पडद्यामागची तयारी कधी प्रत्यक्ष पडद्यावर दिसत नाही पण त्याचे मूल्य व त्यासाठी करावी लागणारी धावपळ या सर्वांची संजयला पूर्ण कल्पना आहे, त्या बद्दल नितांत आदराची व कृतज्ञतेची भावना आहे.
संजयच्या घरी संगीताचा वारसा आई सौ.शोभनाताई व वडील डॉ.माधवराव चितांमण दीक्षित या दोघांकडून आलेला. श्री.विजय ऊर्फ दाजी कंरदीकर ही संगीतक्षेत्रातील नामवंत व्यक्ती. पंडित भीमसेन जोशी यांच्यासमवेत आर्य संगीत प्रसारक मंडळी स्थापन करणारे दाजी हे संजयचे आजोबा- म्हणजे आईचे काका. वडिलांचे वडीलही गाण्याचे दर्दी. संजयचे काका व चुलत भावंडे या सर्वांनाच कंठय संगीताची नैसर्गिक देणगी व त्यात त्यांनी चांगली प्रगतीही केलेली. संजयचे वडील मागल्यावर्षी न्यूझीलंडमध्ये आले असताना त्यांनी वेलिंग्टनला हौशी मंडळीसाठी चार शनिवार-रविवार गाण्याचे वर्कशॉपस् पण घेतले. थोडक्यात काय तर ताल आणि सूर यांच्या सहवासातच संजय लहानचा मोठा झाला.
संजय अगदी लहान वयातच तबला वाजवू लागला. त्याच्या वडिलांनी सुरूवातीला त्याला साधे बोल, ठेका यांची तोंडओळख करून दिलेली होती. वडील भजने, नाट्यगीते किंवा बंदिशी म्हणू लागले की त्यांना साथ करण्यासाठी संजय पुढे सरसावे. त्याही आधी संजयची आई म्हणजे शोभनाताई यांना भावगीते किंवा नाट्यगीते म्हणण्याचा संजय आग्रह करी. आईने स्वयंपाकघरात काम करता करता गायला सुरूवात केली की संजय लगेच साथ द्यायला लागे. या साथीला लागणारी वाद्ये म्हणजे स्वयंपाकघरातील हाताला लागेल ती वस्तू. ताट म्हणू नका, जेवणाचे टेबल म्हणू नका. घरात संगीत होतं, संगीताला पोषक वातावरण होतं. ओल्या मडक्याला आकार देण्याचं अनौपचारिक काम असं चालू होतं. वयाच्या नवव्या वर्षी मात्र संजय व्यवस्थित तबला शिकू लागला तो गाणा-या वडीलांना साथ म्हणून. नंतर त्याने तबल्याचे गुरू श्री.विनायक नगरकर यांच्याकडे १९७९ सालसपासून सहा वर्षे शिक्षण घेतले. १९८६ मध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेला असता संजयची पंडित ग्यानशंकर घोष यांच्याशी ओळख झाली. संजयने पंडित घोष यांच्याकडे तबल्याचे पुढचे शिक्षण घेतले. त्यावेळी या दोन्ही गुरूंकडून सुरू झालेले संजयचे तबल्याचे शिक्षण त्याने न्यूझीलंडसाठी प्रस्थान ठेवेपर्यंत चालू होते. आता प्रत्यक्षात पुढयात बसून नसले तरी फोनवरून पढंत, तिहाया, चलन यांच्याविषयीचे कानमंत्र संजयला मिळतच असतात.
तबला शिकण्यामागची संजयची प्रेरणा
अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षणामुळे संजयला गणिताची चांगली जाण व आवड. तबला वाजविण्यासाठी लागणारा अचूक गणिती ताल-गणितातल्या पटी यांचे आकर्षण एकीकडे तर संगीताचा घरातून चालत आलेला वारसा दूसरीकडे. या दोन्हींचा मिलाफ हीच संजयला तबला शिकण्यासाठी खेचणारी प्रेरणा. एका समेपासून ते दुस-या समेपर्यंत तबला वाजविताना कलाकाराला नवनिर्मितीसाठी असलेला असीमित वाव हे हवेहवेसे आव्हान. यात इतके आव्हानात्मक असे असते तरी काय? पुस्तकात वाचून एखादे गणित किंवा प्रमेय कागदावर मांडणे एकवेळ सोपे म्हणता येईल कारण थोडा विचार करून, खाडाखोड करून बरोबर उत्तर मांडता येते. पण तबला वाजवितांना चूक सुधारायला वाव नाही. “९० टक्के बरोबर वाजवले, दहा टक्केच चूक झाली” असल्या सबबी (किंवा दयामाया) सादरीकरणाच्या कलेत अस्तित्वात नाहीत. शिवाय “आम्ही थोडेच व्यावसायिक कलाकार आहोत? आम्ही आपले हौशी कलाकार” असे म्हणून आपल्या चूकांवर पांघरूणही घालता येत नाही…ही संजयची भूमिका. ही भूमिका मनात ठसविणारे अर्थातच दाजी- संजयचे आजोबा. दाजी नेहमी “बाबा रे आपलं भारतीय संगीत म्हणजे रोखठोक आहे…ताला-सुरांच्या बाबतीत हयगय खपवून घेणारं नाही ते. “बाप दाखव नाहीतर श्राध्दाला बस” अस ठणकावणारं आहे ते!” घरातल्या प्रोत्साहनामुळे व स्वाभाविक आवडीने सुरू झालेले संजयचे तबला वादन, दाजींसारख्या कडक शिस्तीच्या आजोबांच्या वरच्यावर मिळणा-या कापपिचक्यांनी आकार घेत, दोन्ही गुरूंकडून मिळालेल्या विद्येच्या साधनेतून आता सुजाण यौवनात आले आहे.
सौ. वीणाताई सहस्त्रबुध्दे व श्री. मिलिंद तुळणकर हे गेल्या वर्षी, तर त्याच्या गेल्यावर्षी श्री. समीर दुबळे व श्री. चैतन्य कुंटे यांनी ऑकलंड व वेलिग्टन येथे आपली कला सादर केली. साथीला संजय होता. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे कला सादर करण्याची उत्तम संधी संजयला मिळते. त्याचबरोबर भारतातून इथे येणा-या कलाकारांना इथे आपली संस्कृती जपणारा व आपली भाषा बोलणारा एक स्थानिक तबलजी मिळाला ह्याचे खूपच अप्रुप वाटते. त्यांची चांगलीच सोय होते. स्थानिक तबलजी मिळाल्यामुळे भारतातून एक तबलजी आणण्यासाठी लागणार प्रवास, रहाणे, जेवणखाण याचा खर्च वाचतो व ते पैसे भारतातील आणखी एखाद्या गायक वा वाद्यक कलाकाराला निमंत्रित करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे भारतीय कलाकारांना आपली कला परदेशी सादर करण्याची संधी मिळते तसेच येथील किवींना (‘किवी’ म्हणजे न्यूझीलंडचे गोरे लोक) वेगवेगळे कलाकार पहायला, ऐकायला मिळतात. याशिवाय संजयच्या दृष्टीने त्याच्या मुलांच्या मनावर नकळत घडणारे संगीताचे संस्कार हा केवढा महत्वाचा भाग. आजला संजयची मुले लहान आहेत. त्यांच्यावर तबला शिकण्याची सक्ती केलेली नाही. पण मुले आवडीने स्वत:हूनच बाबांच्याजवळ येऊन बसतात. मुलांचे संगीताचे अनौपचारिक शिक्षण केव्हांच सुरू झालेले आहे.
वेलिग्टनमधे संजयला समविचाराचे मित्र भेटले आहेत. श्री. सुभाष मुनीश्वर, श्री. देवदत्त पांडे, श्री. मिलिंद खोत, श्री. विराज साळवी, श्री. राकेश राणा या भारतीय मित्रांप्रमाणे श्री. जेराड वुड व श्री. डेव्हिड पार्सनस् हे दोन गोरे मित्रही. या सर्वांबरोबर तबला वाजविणे, संगीताविषयी चर्चा करणे, रेकॉर्डिंग करणे, यात संजय रमून जातो. जेराड वुड व डेव्हिड पार्सनस् हे मूळचे ‘किवी’. दोघेही भारतात जाऊन संगीत शिकून आलेले आहेत. डेव्हिड सतार वाजवितो. जेराड हा पंडित हरीप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरीचे शिक्षण घेत आहे. डेव्हिडचे कान स्वर व श्रुती टिपण्यात व त्यातील सूक्ष्म बारकावे ओळखण्यात चांगले तीक्ष्ण आहेत. डेव्हिडचे घर एखाद्या म्युझियमसारखे आहे. त्यात सर्व स्वरांचे तंबोरे, सतार, सारंगी अशी वाद्ये आहेत. या वाद्याची दुरूस्ती डेव्हिड स्वत: करतो. आपल्या अपत्याची काळजी घ्यावी तशी या वाद्यांची काळजी तो घेतो. डेव्हिडचे कोणतेही वाद्य कायम “चालत्या- बोलत्या” स्थितीत असतं. गेल्या दोन तीन वर्षात झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तबल्यावर संजय व तंबो-याच्या साथीला डेव्हिड अशी जोडगोळी वेलिंग्टनमध्ये गाजत आहे. सौ. वीणाताईच्या व श्री. मिलिंद तुळणकर यांच्या समवेत घेतलेल्या फोटोत तंबो-यावर दिसतो तो डेव्हिङ
सध्या स्वत:च्या रियाजाबरोबर संजयचे न्यूझीलंड स्कूल ऑफ म्युझीकच्या तीन विद्यार्थ्यांना तबला शिकविण्याचे काम चालू आहे. याच बरोबर वेलिंग्टनमधील अनेक गो-या लोकांनाही तबल्याची आवड निर्माण करण्याचे कार्य संजयने केले आहे. वेलिंग्टनमधील अनेक ‘किवी’ भारतात जाऊन आलेले आहेत. अनेकांनी भारतात जाऊन संगीताचे शिक्षणही घेतलेले आहे. त्यांना तबला या वाद्यामध्ये चांगला रस निर्माण झालेला आहे. यातूनच न्यूझीलंड सिंफनी आर्केस्ट्रामध्ये सहभागी होण्याची संधी संजयने घेतली आहे. या आर्केरूट्राची संकल्पना श्री. शिरीष कोरडे या मूळच्या भारतीय पण अमेरिकेत स्थिरावलेल्या संगीतकाराची. हा कार्यक्रम चांगलाच गाजला. वेलिंग्टनच्या वेलिंग्टोनियन (दि. १५ फेब्रुवारी) या वृत्तपत्राने त्याची दखल घेतली. “Artmart, Wellington” मध्ये “Sumptuous sounds of the tabla” या शीर्षकाखाली संजयचा तबला वाजवितांनाचा फोटो व पानभर माहिती असलेला लेख घरोघरी जाऊन पोचला. “कापी माना” (Kapi Mana) या माओरी वृत्तपत्रातही संजयच्या कलेची व तबल्याविषयीची माहिती प्रसिध्द झाली.
संजयचा गुरू कुडता घातलेला फोटो पाहिला तेव्हा संजयने सांगितलेली एक आठवण डोळयापुढे आली. पुण्याच्या सवाई गंधर्व पुण्यतिथीचा कार्सक्रमाला हौशे- नवसे- गवशे चांगले नटून थटून जातात. संजयही असा रेशमी झब्बा घालून गेलेला असताना दाजींनी त्याला हटकले. “गाण ऐकायला आला आहेस, गायला किंवा वाजवायला नाही ना आलास? मग रेशमी झाब्याची काय गरज आहे? तो रेशमी झब्बा घालण्याजोगे काम कर पहिले !” आज दुर्देवाने दाजी हयात. असते तर संजयचा फोटो पाहून मनोमन सुखवले असते. पण “आता तरी झब्बा शोभतोय का ? असे संजयने विचारले असते तर दाजी म्हणाले असते “ज्या दिवशी तुला गुरू कुडता घालण्याची गरज वाटणार नाही त्या दिवशी तो नक्की शोभेल! …… संगीताच्या विशालतेची जाणीव असणारे व त्यांच्या पूर्णत्वासाठी परखडपणे जागृत असलेले आजोबा…संजयच्या आजवरच्या प्रगतीचं श्रेय दाजी आणि इतर जाणकार लोकांकडून मिळत गेलेल्या मौलिक संस्कारांना देता येईल.
मी स्वत: दाजींच्याकडे भावगीते शिकत असे. दाजीचा भारतीय संगीताचा व्यासंग, त्यांचा थट्टेखोर स्वभाव, परखडपणा या सर्वांचे अनुभव मीही घेतलेले आहेत. त्यांच्या नातवाची भेट कुणा एक परदेशी व्हावी हा केव्हढा योगायोग ?
परदेशात स्थलांतरित झाल्यावर तिथल्या जीवनाशी जुळवून घेताना अनेक नवीन पध्दतींचा अंगिकार करावाच लागतो. पण ते करतांना आपली संस्कृती किंवा संस्कार सोडून देण्याची गरज नसते…किंबहूना तसे करणे अयोग्यच म्हणावे लागेल. तद्देशीय गोष्टी अंगिकारताना आपल्या चांगल्या गोष्टीही या समाजाला द्यायलाच हव्यात…भारताची अमोल देणगी…भारतीय संगीत…याचा या जगात प्रसार करण्याचे काम संजय करीत आहे. “वैश्विक खेडे” या नवसंकल्पनेतली ही भारतीयांना अभिमान वाटावी अशीच गोष्ट. संजय, शिरीष यांसारखे अनेक भारतीय लोक हे काम करीत आहेत. आपल्या माणसांचे कौतुक आपल्या घरापर्यंत पोचविण्यासाठी हा लेखप्रपंच.
– सौ. कल्याणी गाडगीळ, न्यूझीलंड