संगीत नाटक अजरामर करणारे ‘बालगंधर्व’ यांची भूमिका साकारणारा तसेच २१ व्या शतकात बालगंधर्वांच्या आठवणींना उजाळा देणारा अभिनय करीत प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने आजपर्यंतच्या कारकीर्दीत ४६ मराठी चित्रपटात काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. नुकताच त्याचा ‘भारतीय’ हा मराठी चित्रपट येऊन गेला. ‘महासागर’ या नाटकाचेही त्याचे प्रयोग सुरु आहेत. ‘क्षण’ चित्रपटातील त्याची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘कुलवधू’ मधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याच्या या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल त्याच्याशी साधलेला संवाद…
‘बालगंधर्व’ बद्दल काय सांगशील? अनुभव कसा होता?
लोकांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. त्यांना असं वाटतं की मी महात्मा जोतिबा फुले, स्वामी विवेकांनद यांची भूमिकाही साकारू शकतो. मला असं वाटते की या निमित्ताने का असेना एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला लोकं माझ्यात बघतात आणि ती भूमिका माझ्याकडून व्हावी असं त्यांना वाटत. पण ती खरंच घडेल की नाही ते मला माहित नाही.
मागे टोरांटो येथे झालेल्या झगमग मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये बालगंधर्व दाखवण्यात आला. तिथे प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसादही मिळाला, याबद्दल काय वाटतं?
मला असं वाटत की मराठी लोकं मोठ्या संख्येने गुजरात, मध्यप्रदेशमध्ये राहतात, मग त्यांच्यापर्यंत मराठी चित्रपट का नाही पोहोचत? पण ‘मिफ्ता’च्या माध्यमातून मराठी चित्रपट परदेशात पोहचत आहेत, ही खरंच चांगली गोष्ट आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अनेक कार्यक्रम होतात. सातत्याने वेगवेगळे चित्रपट तेथे दाखविले जातात. मराठी कार्यक्रम, मराठी चित्रपट तिथल्या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. कॅनडामध्ये असणा-या अनेक मराठी बांधवांना मराठी चित्रपट प्रत्यक्ष थियेटरमध्ये जाऊन पाहण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. कायम वेगवेगळ्या व्यक्तिरेखांतून लोकांपर्यंत पोहचावं हीच माझी अपेक्षा आहे.
सध्या चित्रपटाच्या बदलत्या स्वरुपाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याबद्दल तुला काय वाटतं?
चांगले प्रयोग मराठीत होतात. माझे अनेक तरूण मित्र मराठीत चांगले दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आहेत. ते सातत्याने वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटत की मराठी चित्रपटसृष्टीचा विकास होण्यासाठी सातत्याने नवे नवे प्रयोग होणं गरजेचे आहे.
‘महासागर’ या नाटकात काम करण्याचा अनुभव कसा आहे?
खुपच छान. ब-याच दिवसांनंतर एक चांगली संहिता असलेले नाटक करण्याची संधी मला मिळाली. नीना कुलकर्णी यांनी जेव्हा मला यामधील भूमिकेबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना लगेच होकार दिला.
तू आधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पुढे चित्रपटाच्या दिग्दर्शनाच काही विचार आहे का?
दिग्दर्शनात मला फारसा रस नाही. कारण कॉलेजमध्ये असतांना मी माझी सगळी नाटकं स्वतः दिग्दर्शित करायचो. ‘कट्यार काळजात घुसली’ हे माझ व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटकं आहे. पुढेही काही नाटकं आहेत ज्यात मला काम करायची इच्छा आहे.
‘भारतीय’ चित्रपटामधला तुझा अनुभव कसा होता?
मुळात मला या चित्रपटाची कथाच खूप आवडली आणि त्याचबरोबर गिरीश सोबत चित्रपट करायला मिळणार होता. कारण गिरीश हा माझा लाडका दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबतच इतर खूप काम केली असली तरी चित्रपट करायला मिळण्याची ही पहिलीच संधी होती. पहिलीच निर्मिती असलेल्या ‘देऊळ’ला जे यश अभिजीतने मिळवून दिलंय त्यामुळे अभिजीत सोबत काम करण्याचीही संधी मला मिळाली. भारतीय असण्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असतो तसा मलाही आहे. इतकंच काय पुढच्या जन्मी आणि त्याच्या पुढच्या जन्मीही परत परत भारतीय म्हणूनच मला जन्माला यायला आवडेल..
नवीन कुठले प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील?
सध्यातरी ‘अय्या’ नावाचा हिंदी चित्रपट माझा लवकरच प्रदर्शित होईल. त्यात मी राणी मुखर्जी सोबत काम करतोय. अनुराग कश्यप चित्रपटाचे निर्माते आहेत. सचिन कुंडलकर दिग्दर्शक आहेत. अजून काही प्रोजेक्टची बोलणी सुरु आहेत. लवकरच त्यांची घोषणा करण्यात येईल.
मुलाखत- आशिष कोकरे