वसंत सबनीस : (६ डिसेंबर १९२३ – १५ ऑक्टोबर २००२)

मराठी चित्रपट सृष्टितील दोन नावाजलेले कलाकार. सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे. दोघेही स्त्री पार्टीच्या भूमिकेत आहेत. सचिन आजारी असून शेवटच्या घटका मोजत आहे. लक्ष्या म्हणजे त्याच्या भावाची बायको. होय, तोच चित्रपट … ‘अशी ही बनवाबनवी’. सचिन म्हणतो, ‘जाऊबाई, …’ त्याला लक्ष्या उत्तर देतो, ‘नका बाई इतक्यात जाऊ !!’ हे दृष्य पाहिल्यावर पटकन आणि मनापासून हसू येते. ही किमया आहे, ज्येष्ठ पटकथाकार, श्री. वसंत सबनीस यांची. नर्म विनोद, आपण विनोद करीत आहोत याचा आविर्भाव देखील व्यक्त न करता हलकेच त्यांचे शब्द मराठी मनांना ‘आनंद-झुल्यात’ झुलवित असत. हा हास्यझुला, निकोपतेचा हा ‘वसंत’ मराठी साहित्य सृष्टितून निघून गेला.

रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. रा. श्री. जोग यांच्या ‘साहित्य सहकार’ या संस्थेत ते दाखल झाले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. जीवनाकडे खटयाळपणे बघणे, प्रतिकूलतेतही चेह-यावरचे हसू कायम ठेवणे आणि इतरांच्या जगण्याकडे आस्थेने बघणे, या गोष्टी मित्रांप्रमाणे त्यांच्यातही आल्या.

सबनीस बहुरूपी होते. ते ग्रामीण बाजाचे उत्तम लिखाण करीत. तसेच एकांकिका, रहस्यकथाही लिहीत. १९९३ साली मुंबईत झालेल्या नाटयसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘घरोघरी हीच बोंब’, ‘कार्टी श्रीदेवी’, या नाटकांबरोबरच, ‘विच्छा माझी पुरी करा’ सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचे वैशिष्टय म्हणजे, प्रत्येक वेळी त्यांनी निर्माण केलेली कलाकृती ही ट्रेडसेंटर ठरली. ‘गेला माधव कुणीकडे’ सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, ‘कलावैभव’ संस्थेला यश देणारे नाटक, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’ सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात.

‘आत्याबाईला आल्या मिशा’ (१९८५), नील सायमनच्याच नाटकाचा स्वैर अनुवाद, ‘कार्टी श्रीदेवी’ (१९८८), याशिवाय ‘चिलखतराज जगन्नाथ’ ‘बिन माणसाचा हात’, ‘चोर आले पाहिजेत’, ‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’ अशा जवळपास १५ एकांकिका त्यांनी लिहील्या. ‘घरोघरी हीच बोंब’ ’निळावंत’, ‘नाटक’ नावाचेचे नाटक तसेच ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘गेला माधव कुणीकडे’, अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. ‘सबनिशी’ हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, ‘थापडया’, ‘पखाल’, हे विनोदी कथासंग्रह, तर ‘माझेश्वरी’ हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.

मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही तेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या पथकापुरते लोकांना माहीत होते. पण ‘विच्छा’ ने क्रांती केली. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून ‘विच्छा’ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंतराव दादांबरोबर बतावणीला उभे राहिले आहेत. पु. लं. समवेत त्यांनी ‘तुका म्हणे’ मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. ‘छपरी पलंगाचा वग’, म्हणजेच ‘विच्छा’ हे नाटक, व त्याबरोबरच ‘खणखणपूरचा राजा’, ‘एक नार चार बेजार’, ‘त्रिशूलाचा वग’, ‘तुम्ही माझं सावकार’, ‘आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी’ अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.

ग्रामीण आणि शहरी संस्कृतींमध्ये तितक्याच सहजतेने वावरणा-या सबनीसांना लोककलांबध्दल विशेष प्रेम होते. १९९३ मधे, ते नाटयसंमेलनाचे अध्यक्ष झाले तेंव्हा ‘मराठी नाटकांनी लोककलांची पुरेशी दखल न घेतल्याबद्दल’ त्यांनी खंत व्यक्त केली.

‘किशोर’ मासिकाच्या संपादनामुळे पुढील पिढयांना सबनीसांबद्दल कृतज्ञता वाटत राहील. मराठीतील मुलांची मासिके धडाधड बंद पडत असताना सबनीसांनी राज्य सरकारच्या पाठयपुस्तक मंडळातर्फे किशोर चालू केले व ते नेटाने चालविले. उत्कृष्ट छपाई, अभिवन, आधुनिक व मुलांना आवडेल असा मजकूर हे किशोरचे वैशिष्टय.

गेली सुमारे ४५ वर्षे सबनासांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. ‘गोंधळात गोंधळ’ आणि ‘खिचडी’ या व्ही. के. नाईक यांच्या दोन चित्रपटांसाठी वसंतरावांनी लेखन केले. गोंधळात गोंधळचा मुहूर्त झाला त्यावेळी श्री. नाईक यांना आयत्या वेळी एक कल्पना सुचली. अशोक सराफला सगळेजण उचलतात तेव्हाच त्याची होणारी बायको रंजना येते. नाईकांनी वसंतरावांना फोनवरून ऐकवलेल्या या कल्पनेवर रणजित स्टुडिओमध्ये येऊन अवघ्या पंधरा मिनिटांत हा सीन लिहून त्यांनी नाईकांकडे सोपविला. हेच वसंतराव ‘खिचडी’ लिहीत असताना, लिहीण्यात मन लागत नाही, वेळ लागेल असे नाईकांना सांगून मोकळे झाले.

वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि ‘सोंगाडया’ रूपेरी पडदयावर आला. ‘एकटा जीव सदाशीव’ सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांची जोडी जमल्यावर ‘नवरी मिळे नव-याला’, ‘गंमत जंमत’, ‘एकापेक्षा एक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले.