काही सन्माननीय अपवाद सोडले तर भारत पाकिस्तान संबंधांवर टोकाची भूमिका घेणारं लिखाणच कायम होत आलंय. रक्तरंजित इतिहास, चीड, आणि ‘असं व्हायला नको होतं’, इथपर्यंतच सर्व लिखाण होत गेलं. यातून होणा-या परिणामांची घातक प्रतिक्रिया ही नेहमीच उत्स्फूर्त पण चुकीची राहिली. याउलट यावर तोडगा म्हणून अंमलात आणायची योजना तेवढीच संथ व वाट पहायला लावणारी. आजपर्यंत राजकीय, सामाजिक, सामूहिक अशा अनेक पातळयांवरील निर्णयांमुळे समाजाच्या मानसिकतेवर परिणाम झालाच पण त्याशिवाय अत्यंत सामान्य पातळीवरील माणसालाही त्यात विनाकारण ओढले गेले, अजूनही ओढले जातेय.
बहुतेक चांगल्या पुस्तकांचे अनुवादित साहित्य हे एकतर मराठीत फार कमी प्रमाणात येते किंवा उशीरा तरी. ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट’ चा हा शोधनिबंध मात्र योग्य वेळेत मराठीत आल्यामुळेच त्याचं स्थान सर्वार्थानं वेगळं ठरतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक त्याच वेळी सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत झालं असतं तर कदाचित फाळणी दरम्यानचा हिंसाचार टाळता आला असता, इतकं ठाम मत बनण्याइतकं ताकदीचं ते पुस्तक आहे. याच पार्श्वभूमीवर मैत्रीपूर्ण संबंधांचा विचार करत असताना या पुस्तकाचं वाचन अपरिहार्य ठरतं. या पुस्तकातील विविध संदर्भातून हे स्पष्ट होत जातेच, पण एकमेकांची मर्मस्थाने ओळखून त्यावर घाला घालण्याऐवजी त्याचा बलस्थाने म्हणून वापर व्हावा असेही आवाहन त्यात दडलेले आहे. यामध्ये जशी राजकीय बलस्थाने आहेत तशीच नैसर्गिकसुध्दा.उभयपक्षी संघर्ष हा वरकरणी राजकीय दिसत असला तरी त्यांची मूळ कारणे ही छोटया छोटया तंटयातून आलेली आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की पाणीवाटप, जमीन यासारखे विषय चर्चेतूनच सोडवता येतील आणि यातूनच राजकीय विद्वेषाची धार बोथट होईल, असा विश्वास या प्रबंधातून व्यक्त झालाय. ३७० कलम, सिमला करार या आणि अशा मळलेल्या पायवाटेने जाण्यापेक्षा एक वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न यातून झालाय.
पूर्णपणे वर्तमानात राहून लिहिलेले आणि सकारात्मक विचार देणारं हे पुस्तक वाचकांसाठी वैचारिक खाद्य तर आहेच, पण, आपल्या नियमित चर्चेतील जिव्हाळयाचा विषय असणा-या उभयदेशी संबंधांच्या चर्चेला एक वेगळा पैलू उघडून देणारं आहे. हा ‘संवाद’ जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचला तर ते ‘पुढचे पाऊल’ ठरेल यात शंका नाही.
पुस्तक – विसंवाद
लेखक – संदीप वासलेकर
अनुवाद – अभय सदावर्ते
प्रकाशक – मराठीवर्ल्ड.कॉम
किंमत – रु. १५० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
स्वत:च्या कतृत्वाने काही विशिष्ट ध्येय गाठू इच्छिणा-या माझ्यासारख्याच असंख्य धडपडया मुलांना हे पुस्तक अर्पण अशी ‘अर्पण पत्रिका’ लिहिणारे श्री. सुधीर निरगुडकर हे प्रख्यात बिल्डर म्हणून प्रसिध्द आहेत.
‘एक असतो बिल्डर’ हे श्री. सुधीर निरगुडकरांचे आत्मकथनात्मक लेखन अनावश्यक तपशिलांचा फापटपसारा टाळून अत्यंत रंजक पध्दतीने सुत्र न हरवू देता, नेमक्या शब्दात यशस्वीपणे मांडण्याचे शब्दांकंन कौशल्य मात्र शोभा बोन्द्रे यांचेच.
माणसासमोरचा सर्वात कठीण प्रश्न म्हणजे ‘मी कोण आहे?’ याचा शोध घेणं, असं निरगुडकरांना वाटतं. म्हणून मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात ‘मला काहीतरी जगावेगळी धडाडी दाखवायची होती, स्वत:ची शक्ती जोखून बघण्याची खुमखुमी होती. अनेकांसाठी अनेक गोष्टी करावयाच्या होत्या. त्यासाठी मी अनेकदा बंद भिंतीवर धडका मारल्या, अनेकवेळा खोल दरीत कोसळलो, निराशा तर अनेकदा आली पण पुन्हा-पुन्हा आशेने उठून उभा राहिलो.
स्वत:चं कर्तृत्व सिध्द करण्यात मजा असते, आणि दुस-याला भरभरून देताना आपणही समाधानाने भरून पावतो. हा माझा अनुभव! त्यांच्या या अनुभवातले बरें- वाईट थरार पुस्तक वाचतांना, वाचकाला चकीत करतात.
ही रोमहर्षक कहाणी आहे धमक्या, खंडणी, फसवणुकीची भयकथाही असणारी. जीवनावर भरभरून प्रेम करणारा हा बिल्डर प्रत्यक्षात एक शेतकरी आहे. कलांचा चाहता आणि एका दानयज्ञाचा यजमानही. तर अशा या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाची ही चरित्रकथा अवश्य वाचायला हवी.
पुस्तक – एक असतो बिल्डर
लेखक – सुधीर निरगुडकर
प्रकशक – मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत – रु. १५० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.