तारकांचा सडा

tarkancha-sada तारकांचा सडा’ हा श्री. शा. प्र. दि‍क्षित यांचा ”विराणी” या काव्यसंग्रहानंतर आलेला दुसरा छोटेखानी कवितासंग्रह.
या काव्यसंग्रहात फक्त दहा कविता आहेत. परंतु त्या एवढया मन:पूर्वक लिहिलेल्या आहेत की त्यांच्यासाठी केलेले संग्रहाचे नियोजन अनाठायी वाटत नाही.

तारकांचा सडा, या प्रेम कवितेपासून संग्रहाला सुरूवात होत असली तरी पुढे अनेकविध विषयांना कवीने स्पर्श केला आहे. ‘ त्या तिथे पलिकडे’ या कवितेत १ ते ९ पंचवार्षिक योजना राबविल्या गेल्या तरी गरिबांच्या झोपडपर्यंत आजही कोणतीही सुखसोय वा सुबत्ता पोहोचलेली नाही. सरकार फक्त अश्वासनांचा पाऊस पाडते. त्या आश्वासनांनी गरिबाला काय मिळतं? शेवटी कवी त्यांच्या प्रियेच्या झोपडीत बिनसाखरेचा, बिनदुधाचा चहा पिण्यासाठी तुम्हाला आमंत्रण देतो.

‘मोरूचा बाप मोरूला म्हणाला’ या कवितेत आजच्या टिव्हीमय झालेल्या जीवनाचे सुरेख चित्रण पुढे प्रेम आणि प्रार्थना या गोष्टींसाठी देखील कॅसेटची आवश्यकता पडते. हे वाचून हसू तर येतच: पण झपाटयाने कृत्रिमतेकडे धावणा-या जीवनाबद्दल दु:खही होतं.

रक्षित, आरक्षित, सुरक्षित या कवितेत शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण आपल्या पाल्यासाठी किती पैसा ओतावा लागतो आणि कोवळया मनातून जाती-धर्म – भेद नष्ट करण्याऐवजी तिथूनच जातीचे, धर्माचे, प्रमाणपत्र मागणे सुरू होते. लाचार पालक सर्वांना नोटा चारून व्यवहार पूर्ण करतात. त्यासाठी स्वत:ही भरपूर पैसे खातात आणि केलेल्या पापकृत्याची धुलाई करण्यासाठी देवदर्शनाला जातात. तर तिथेही पैशाच्या बद्दल्यात देवदर्शन. आता देवालाच जर हे सारं चालत असेल तर……… ‘हम है भारत की नारीयाँ’ यात एका बाजूला अन्यायपीडीत दिनदुबळया, वृध्द, अपंग स्त्रिया, तर दुस-या बाजूला पैशेवाल्या, नखरेल, नटया, तरूण देखण्या युवती अशी विसंगती चित्रीत केली आहे.

‘टोळीयुध्द’ ही पण भारताला अनादिंकाळापासून लुटत आलेल्यांवर केलेली अप्रतिम कविता आहे. तुर्क, डच, फ्रेच, इंग्रज, ठग, पेंढारी यांनी तर समाजाला लुटलंच, पण स्वातंत्र्यानंतरही मंत्री, संत्री, राजकारणी, समाजकारणी, सहकारमहर्षी, शिक्षणमंत्री, संगळयांनी लुटालुट सुरू केली, बँका, पतपेढया, मतपेटयांपासून सगळं लुटलं जातंय: पण कोणीही क्रांतीची भाषा बोलत नाही. उलट कारकून, गवळी, व्यापारी, शिक्षक, पोलिस, डॉक्टर… समाजाचा एकूण एक घटक भ्रष्टाचारात अहमहमिकेने सामील होत आहे आणि भ्रष्टाचारच आज शिष्टाचार होऊ बघत आहे. याचं ज्वलंत दु:ख कवितेत मांडलं आहे. ‘माणूस नावाचं बेट’ ही देखील अशीच एक नितांत सुंदर कविता आहे. माणसाच्या भोवती प्रचंड जनसमुदाय असला तरी प्रत्येक माणूस शेवटी एकटाच असतो. जगात कुणीच कुणाचं नाही हे त्रिवार सत्य आहे.

शेवटच्या २/३ कविताही संसाराची निरर्थकता दाखविणारी कविता आहे. आजच्या जमान्यात छिन्नभिन्न होणारे कुटूंब, त्यातील केविलवाणे पण या कवितेत मांडलं आहे. या सगळया कविता वाचतांना अंत:करण कळवळतं. कवीचं भावनाशील मन, सूक्ष्म निरीक्षण, खोल सहानुभूती यामुळे कविता खरोखर वाचनीय झाल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात वेगाने होणारी नीतिमूल्यांची घसरण, शोषण, भ्रष्टाचार, अन्याय, यांचं दर्शन काव्यातून घडतं. या काव्याच्या वाचनाने बेचैनी येऊन समाजात थोडेजरी परिवर्तन झाले तरी कवीची काव्यसाधना सार्थकी लागली, असे म्हणावे लागेल.

काव्यसंग्रहातील कविता संख्येने अल्प असल्यातरी त्या फार वेगळया आहेत त-हेच्या आहेत. त्यामुळे अवश्य वाचल्या पाहिजे, असा हा संग्रह आहे. पुस्तकास पंडित सोनवणी यांचे मुखपृष्ठ व आतील रेखाटने लाभली आहेत. यक्षायतन प्रकाशन अजिंठा यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

पुस्तकतारकांचा सडा
प्रकाशक – अरूणा कुलकर्णी

वनस्पतींच्या शास्त्रीय नावांची उत्पत्ती

scientific-name हे पुस्तक म्हणजे वनस्पती शाखेचे विद्यार्थी वनस्पतीशास्त्रज्ञ यांच्यासाठी अमूल्य ठेवा आहे. तसेच वनशास्त्र, शेतकीशास्त्र, उद्यानशास्त्र याप्रकारच्या शास्त्रामध्ये जे आवश्यक आहे त्यानांही हे पुस्तक उपयुक्त आहे. एस. एस. बुट सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक (महाराष्ट्र राज्य ) हे पुस्तक म्हणजे एका वनाधिका-याने परिश्रमपुर्वक केलेल्या प्रयत्नाचे फळ आहे. यामुळे वनस्पतीशास्त्राचा प्रगाढ अभ्यास करणा-यांना व या विषयाचा नुकताच अभ्यास करणा-यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. डॉ. बी. ए. हेगडे प्रा. आणि शाखाप्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग (शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापूर) मला खात्री आहे की हे पुस्तक केवळ वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणा-यांना खूपच उपयुक्त आहे असे नव्हे तर या विषयासंबंधी संबंधित असणा-या इतर शास्त्रांचा अभ्यास करणा-यांना उपयुक्त आहे. डॉ. ए. आर. कुलकर्णी प्रा. जीवशास्त्र विभाग या विषयाची सखोल आणि परिश्रमपुर्वक संकल्पित केलेल्या माहिती आणि शास्त्रशुध्द पध्दतीने सादर केल्याबद्दल मी श्री. दिक्षितांचे अभिनंदन करतो. डॉ. आर. एम. पै प्रा. आणि वनशास्त्र विभाग प्रमुख (मराठवाडा विश्वविद्यालय, औरंगाबाद)

शब्दांकन – अरूणा कुलकर्णी
पुस्तकपर्यावरण आणि प्रदुषण
लेखक – श्री. शा.प्र.दिक्षित
प्रकाशक – १५, मुक्ताई, बापु बंगल्याजवळ, इंदिरानगर, नाशिक – ४२२००९
किंमत – रु.८०/-