स्वरांक आणि ओंकाराधिष्ठित स्वरसाधना

swarank माणसांचा जसा बुदध्यांक आणि भावनांक मोजला जातो तसे संगीतामध्ये आत्तापर्यंत मोजमाप कोठेच नव्हते. डॉ. केतकरांनी पाच वर्षे संशोधन करून ते प्रथमच निर्माण केले आहे. त्यांनी केलल्या संशोधनाचा लिखित पुरावा म्हणजे हे पुस्तक. शास्त्रीय संशोधनातील निष्कर्ष हे व्यक्तिनिरपेक्ष आणि प्रमाणित अशा तर्कप्रणालीवर आधारित आणि संख्या शास्त्रीय काटेकोर निकषांवर टिकणारे असावेत असा नियम आहे. तो सर्वार्थाने डॉ. गोविंद केतकर यांच्या या संशोधनाला लागू पडतो.

बुद्ध्यांकाला समकक्ष अशी ‘स्वरांक’ ही संकल्पना त्यांनी प्रथमच सिध्द केली आहे. कोणत्याही माणसाला, दोन जवळच्या स्वरामधला किती सूक्ष्म फरक ओळखता येतो यावर त्याचा स्वरांक ठरतो. जितका लहान फरक ओळखता येईल तेवढा त्याचा स्वरांक जास्त. स्वरांक ही संकल्पना जगातील कोणत्याही संगीत पध्दतीला उपयुक्त आहे आणि म्हणून ती संगीत संशोधनांतील मैलाचा दगड ठरणार आहे.कोणाचाही ‘स्वरांक’ विशिष्ट पध्दतीने साधना केल्यास सुधारता येतो हेही डॉ. केतकरांनी सप्रमाण सिध्द केले आहे. त्यासाठी त्यांनी ओंकार, तंबोरा, आरोह अवरोहाचा रियाझ आणि प्राणायाम या चार गोष्टींचा आधार घेतला आहे. या चारही गोष्टी शतकानुशतके आपल्याजवळ आहेत. त्यांचे एकत्रीकरण करून एक नवीन शीघ्र फलदायी साधनसंपत्ती निर्माण करण्याचे श्रेय डॉ. केतकरांकडे जाते.

हे स्वयंशिक्षकी पध्दतीचे पुस्तक व प्रत्यक्ष साधना पध्दती निर्माण करून डॉ. केतकरांनी संगीत अभ्यासकांची फार मोठी सोय केली आहे. या साधना पध्दतीने स्वरांक तर सुधारतोच, म्हणजेच एका अर्थाने कानाची संगीत क्षमता वाढते. त्याच बरोबर आवाजाची रेंज वाढते. दोन सप्तक असल्यास अडीच सप्तक होऊ शकते. दमसास किंवा स्टॅमिना वाढतो. सलग दहा सेकंद तान घेण्याची क्षमता पंधरा सेकंद होऊ शकते. वैशिष्टय म्हणजे हे सर्व केवळ एक महिना रोज एक तास साधना केल्याने झालेली प्रगती मोजता येते. ती संख्याशास्त्रीय दृष्टयाही लक्षणीय असते.

या सर्व संशोधनावरचे तज्ञांचे अभिप्राय बोलके आहेत.

”या अभिनव साधना पध्दतीने गायकाचा गळा तर सुधारतोच आणि त्याची स्वरविभेदन शक्तीही तीव्र होते. नेहमीच्या पारंपारिक स्वरसाधना पध्दतीला डॉ. केतकरांनी एक मौलिक नेटकेपण दिला आहे. या साधना पध्दतीला यापुढे ‘केतकर पध्दती’ म्हणून संबोधले जाते हे अगदी रास्त आहे. ‘केतकर पध्दती’ प्रत्येकाने मनापासून आपल्या नित्य रियाझात अंतर्भूत करावी असे मला मनापासून वाटते”. – पं. यशवंत देव, ज्येष्ठ संगीतकार.

”आपले पुस्तक गाणा-या तसेच वादकांसाठी अभ्यास करण्यासारखे आहे.” – पं. श्रीनिवास खळे.

” स्वरांक आणि ओंकाराधिष्ठीत स्वरसाधना (केतकर पध्दती) हे पुस्तक म्हणजे केलेले संशोधन लोकाभिमुख करण्याचा डॉ. केतकरांचा प्रयत्न आहे. संगीत क्षेत्रातील व्यक्तिसापेक्षता कमी करून विज्ञानावर आधारित अशी प्रगती मोजण्याची पध्दती डॉ.
केतकरांनी या पुस्तकाद्वारे मांडली आहे. संगीत क्षेत्रात प्रगती करू इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वरसाधनेची ही ‘केतकर पध्दती’ उपयुक्त ठरेल.” – डॉ. शालीग्राम, रीडर, पुणे विद्यापीठ.

”तुमच्या संशोधनाने मी अवाक झालो आहे. ही कल्पना स्फुरली कशी ? याबद्दल राहून राहून आश्चर्य वाटते. आपल्या परंपरेनुसार मौल्यवान विचार अपौरूषेय (दैवी) असतात असे गृहीत धरले आहे. आपल्या संशोधनाला अपौरूषेयत्वाचा स्पर्श आहे असे म्हणावेसे वाटते.” – डॉ. रविन थत्ते, निष्णात प्लास्टिक सर्जन व ज्ञानेश्वरीवरील व्यासंगी प्रवचनकार

“खूपच कमी शास्त्रज्ञ नवनिर्मितीच्या मागे असतात. त्यासाठी विषयाचा ध्यास पाहिजे. मेंदूच्या जमिनीची केवळ ज्ञानलालसेपोटी नीट मशागत झालेली असली पाहिजे व त्यात नवीन विचाराचे बीज मेहनतीने रूजविले पाहिजे. हे सर्व झाले तरच नवनिर्मिती होते. आपल्या स्वरांकाच्या बाबतीत या सर्व प्रक्रिया ठळकपणे दिसतात व त्याबद्दल आपले अभिनंदन” – डॉ. विद्याधर ओक, प्रख्यात संवादिनीवादक

पुस्तकस्वरांक आणि ओंकाराधिष्ठित स्वरसाधना
लेखक – डॉ. केतकर
किंमत – रु. ४०० रुपये दोन सिडींसह