श्रीपाद महादेव माटे : (२ सप्टेंबर १८८६ – २५ डिसेंबर १९५७)

smmateबहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक, नामवंत प्राध्यापक, अस्पश्यता विरोधी कार्य करणारे कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक. जन्म विदर्भातील शिरपूर ह्या गावी. शिक्षण सातारा व पुणे येथे, एम्.ए. पर्यंत. त्यांच्या विद्यार्थी जीवनात रॅंग्लर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, गो. चिं. भाटे, पां.दा.गुणे, सीतारामसंत देवधर ह्यांसारख्या थोर अध्यापकांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. लोकमान्य टिळक, थोर संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर ह्यांच्या जीवनाचाही प्रभाव माटे ह्यांच्यावर पडला. सातारा (न्यू इंग्लिश स्कूल) आणि पुणे (न्यू इंग्लिश स्कूल; नूतन मराठी विद्यालय) येथील शाळांतून अध्ययन केल्यानंतर १९३५-४६ ह्या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यपक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी झाली.

माटे ह्यांच्या वाङ्मय करकीर्दीच्या आरंभकाळात त्यांनी ‘केसरी-प्रबोध’ (१९३१) ह्या ग्रंथाचे एक संपादक म्हणून परिश्रमपूर्वक काम केले. केसरीने केलेल्या बहुविध कामगिरीचा परामर्श निरनिराळया लेखकांनी ह्या ग्रंथात घेतलेला आहे. माटे ह्यांनी ह्या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड, १९३३-३५) हा माटे ह्यांनी संपादिलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. विविध सांवत्सरिकांचा काळजीपूर्वक अभ्यास करून माटे ह्यांनी महाराष्ट्र सांवत्सरिकाचा आराखडा तयार केला. इंग्रजी सांवत्सरिकाचे केवळ अंधानुकरण न करता, मराठी वाचकांच्या अपेक्षा आणि गरजा विचारात घेतल्या. रोहिणी ह्या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञानप्रसाराचे महत्त्व जाणून त्यांनी ‘विज्ञानबोध’ संपादिला; त्याल दोनशे पृष्ठाची विस्तृत प्रस्तावना लिहिली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा वैचारिक द्दष्टिकोण ह्या प्रस्तावनेत त्यांनी विवेचिला असून ही प्रस्तावना पुस्तकरूप झाली आहे. (‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’, १९४८). ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ (१९३३) हा आपला मूलगामी ग्रंथ लिहिण्यापूर्वी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य त्यांनी अनेक वर्षे तळमळीने केले होते. ते करीत असताना आलेल्या अनुभवांतून स्वत:चे चिंतन परिपक्व झाल्यानंतर ह्या ग्रंथाच्या लेखानाला त्यानी आरंभ केला. जातिसंस्था व अस्पृश्यता ह्यांच्या बुडाशी वंशविषयक भिन्नत्वाची जाणीव आहे; त्रिवर्णाना ती प्रबल वाटल्यामुळे त्यांनी संस्कार होऊ न देण्याची व्यवस्था केली; वंश जपणुकीची भावना सार्वत्रिकही आहे; परंतु सर्व भोक्तृत्वे त्रैवर्णिकांनीच भोगायची; इतरांनी त्यांचे दास व्हावयाचे आणि सर्व हलकीसलकी कामे करायची हा अन्याय होय, असे परखड प्रतिपादन त्यांनी ह्या ग्रंथात केले. ‘रसवंतीची जन्मकथा’ (१९५७) ह्या आपल्या मौलिक ग्रंथात, भाषेचा जन्म आणि विकास कसा झाला, ह्यचे विवेचन त्यांनी उत्क्रांतितत्त्वाच्या आधारे केले आहे. काव्य म्हणजे गेय वाक्यरचना, ही काव्याची एक नवी व्याख्याही ह्या ग्रंथात त्यांनी मांडली. संत-पंत-तंत (१९५७) ह्या आपल्या पुस्तकात संतकवी, पंडितकवी आणि शाहीर ह्यांच्या काव्याचा परामर्श त्यांनी घेतला अहे. ‘परशुराम चरित्र’ (१९३७), ‘गीतातत्त्वविमर्श’ (१९५७), ‘रामदासांचे प्रपंचविज्ञान’ (१९६०), हे त्यांच्या ग्रंथही मूलगामी विचारपध्दतीचे व स्वतंत्र प्रज्ञेचे निदर्शक आहेत. माटे ह्यांचा पिंड चिंतनशील समाजशास्त्रज्ञाचा असल्यामुळे त्यांचे महत्त्वाचे वैचारिक लेखन ह्या चिंतनशीलतेतून निर्माण झाले आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, राजारामशास्त्री भागवत, टिळक-आगरकर इ. मराठीतील निबंधकारांच्या उज्ज्वल आणि थोर परंपरेत माटे ह्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

‘उपेक्षितांचे अंतरंग’ (१९४१), ‘अनामिका’ (१९४६), ‘माणुसकीचा गहिंवर’ (१९४९), ‘भावनांचे पाझर’ (१९५४) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द असून महारमांग, रामोशी, कातवडी इ. उपेक्षित जमातींतील व्यक्तींचे, त्यांच्या सुखदु:खाचे, त्यांच्या जीवनरीतींचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी त्यांत सह्रदयतेने केले आहे. ‘कृष्णाकांठचा रामवंशी’, ‘तारळखो-यातील पि-या’, ‘नाथनाक आणि देवकाई ह्यांची काळझोप’ आणि ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्यासारख्या त्यांच्या कथा आजही अविस्मरणीय वाटतात. ‘पश्चिमेचा वारा’ (१९५६) ही त्यांची एकमेव कादंबरी. साहित्यधारा (१९४३), विचारशलाका (१९५०), विचारमंथन (१९६२) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय होत. विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले.

आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित व स्वतंत्र ठेवून मराठी वाङमयावर एक चिरंतर मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत माटे ह्यांची गणना केली जाते.