डॉ. शरदिनी डहाणूकर

sharadini dahanukar रूग्णांवरील उपचारपध्दतीत आधुनिक औषध विज्ञाना इतकीच परंपरागत आयुर्वेद चिकित्सा व औषधे प्रभावी ठरू शकतात, या वास्तवाचा संशोधनपर वेध घेत वैद्यक क्षेत्राला नवी दिशा देणा-या नायर पालिका इस्पितळाच्या डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या लोकप्रिय अधिष्ठात्री होत्या.

आपल्या संशोधनपर वृत्तीने आणि माणुसकीचा वसा जपलेल्या प्रेमळ स्वभावाने भारतीय वैद्यक व अन्य अनेक क्षेत्रात नाव कमावलेल्या डॉ. शरदिनींचा जन्म १७ ऑक्टोबर १९४५ रोजी मुंबईत झाला. गोव्यातील पणजी येथील बेतीम वेरे या गावच्या पै धुंगट या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डहाणूकर यांचे वडील भिकू पै धुंगट उद्योगानिमित्त मुंबईत आले आणि येथेच स्थायिक झाले. बुध्दीने कुशाग्र आणि चिकित्सक असलेल्या डॉक्टर ही पदवी संपादित केल्यानंतर फार्माकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

सुमारे २५ वर्षांपूवी अमेरिकावारीत एका परदेशस्थाने आयुर्वेदाबद्दल उत्कंठापूर्वक काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देतांना डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या मनात आयुर्वेदाबद्दल अधिक संशोधन करण्याची ओढ जागृत झाली. तेव्हापासून १० वर्षे त्यांनी अथक संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच के. ई. एम. मध्ये आयुर्वेदाला ऍलोपथीच्या जोडीने रोगनिदान व उपचारात स्थान मिळाले.अध्यापन आणि संशोधन ही दोन उद्दिष्टे समोर असलेल्या डॉ. डहाणूकर यांच्या सलग बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे के. ई. एम. मध्ये भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र १९८९ साली स्थापन झाले. या विभागाचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले. गुळवेल, कडुनिंब बस्ती यांच्यावरील कामाचे पेटंट त्यांच्या नावावर असून या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. नायर इस्पितळाच्या अधिष्ठात्री झाल्यानंतर त्यांनी तेथेही आयुर्वेद विभाग सुरू केला.

उद्योगपती अरूण डहाणूकर यांच्याशी विवाहबध्द झालेल्या डॉ. डहाणूकर ह्यांचे वैद्यक क्षेत्रांतील अनोख्या कामगिरीसह, निसर्गाच्या विविध आविष्कारांवर बेतलेले ललित लेखनही अत्यंत मनोवेधक ठरले. ‘लोकसत्ता’मध्ये विविध विषयांवर सदर लेखन करणा-या डॉ. डहाणूकर यांचे वृक्षगान, मनस्विनीचे मणी, फुलवा, सगे सांगाती, हिरवाई, पांचाळीची थाळी असे ललित साहित्य प्रकाशित झाले. गोमंतकन्या असलेल्या डॉ. डहाणूकर यांच्या या आगळया लेखनाचा गोवा कला अकादमी, गोमंत विद्यानिकेतन, मडगांव या संस्थांनी गौरव केला. ललित लेखनाला मिळालेला वाचकांचा तसेच मान्यवरांचा हा प्रतिसाद पाहून अधिक मोठया प्रमाणात ललित लेखनाला वाहून घेण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अधूरे राहिले.

साहित्य आणि वैद्यक आशा दोन क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व फारच लौकर काळाच्या पडद्याआड गेले.

डॉ. विजय भटकर

vijay bhatkar परदेशात नोकरी न करता स्वदेशासाठी स्वदेशातच काम करायचे या हेतूने भारतातच थांबलेले शास्त्रज्ञ विजय भटकर ह्यांना भारत महासंगणकाचा निर्माता म्हणून ओळखतो. त्यांच्या उतुंग कारर्कीदीचा आढावा घेणारा हा लेख.

विजय भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर तालुक्यातील, मुरंबा या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीयरींगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी राहून पूर्ण केले.

अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून भारताने डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. श्री. भटकर तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक, अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दाखवला. त्याची दखल ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ घेतली.

डॉ. विजय भटकर यांची तंत्रज्ञानावरची आतापर्यंत १२ पुस्तके व ८० निबंध प्रसिद्ध असून हे साहित्य युरोप, अमेरिका व भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये अधिकृत म्हणून वापरले जाते. राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांची रचना त्यांनी केली आहे. उदा. C-DAC, ER & DC त्रिवेंद्रम येथील R&D सेंटर, पुणेयेथील I2IT, IIMV इ. डॉ. विजय भटकर यांच्या निरनिराळ्या शोध, उपक्रम व आयटी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना जागतिक इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणा-या संस्था IEEE व ACM यांनी ‘फेलो’ या अत्युच्च पदवीने पुरस्कृत केले आहे. डॉ. विजय भटकर यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोच्च नागरी महाराष्ट्र भूषण तर केंद्र शासनाने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

एक आदर्श वैज्ञानिक, तत्वाज्ञ, शिक्षणतज्ञ, समाज प्रबोधक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. विजय भटकर यांच्या व्यक्तिमत्वाला विनम्रतेची अनोखी जोड आहे. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात येणारे अनेक लोक देशकार्यासाठी प्रेरित होऊन आपापल्या क्षेत्रात उत्तुंग शिखरं गाठत आहेत.

– अजिंक्य तर्टे