भाताचे प्रकार


साखरभात

sakhar-bhaat साहित्य -३ वाटया तांदूळ, ३ वाटया साखर, ४-५ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, २ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, ७-८ वेलदोडयाची पूड, अर्धा चमचा मीठ, २ लिंबे, थोडेसे केशर, केशरी रंग व तूप.

कृती – तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावेत. २ टेबलस्पून तूप, लवंगा, दालचिनी, वेलदोडै घालून फोडणी करावी. त्यावर धुतलेले तांदूळ घालून परतावेत. नंतर त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी व मीठ मोदक पात्रात पातेले ठेऊन नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यावा. (४०-४५ मिनीटे) भाताची वाफ जिरली की तो परातीत उपसून ठेवावा. भात गार झाला त्यावर लिंबाचा रस, केशरी रंग, केशराची पूड घालून अलगद हाताने कालवावे.

जरा मोठया पातेल्यात साखर व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करावा. पाक गोळीबंद झाला पाहिजे. ताटात थोडा पाक टाकून पहावा. गोळी वळली गेली पाहिजे. गोळीचा खणकन आवाज आला पाहिजे. म्हणजे पाक झाला असे समजवावे. त्यात बेदाणे, वेलदोडयाची पूड व उपसलेला भात घालून ढवळावे. प्रथम भात जरा पातळ होईल नंतर घट्ट होईल. बाजूने साजूक तूप घालावे. हा भात गरम चांगला लागतो.

गोळा भात

gola-bhaat साहित्य – ४ वाटया तांदूळ, २ वाटया चणादाळ, चवीनुसार तिखट-मीठ, धने-जिरे पूड २-२ चहाचे चमचे, २ चहाचे चमचे गरम मसाला, दोन मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी २ मोठे डाव गोडेतेल, मोहरी, हिंग व हळद प्रत्येकी १ चहाचा चमचा व ४-५ सुक्या लाल मिरच्या.

कृती – रात्री हरभर्‍याची डाळ पाण्यात भिजत घालावी. सकाळी ती वाटून घ्यावी. नंतर त्यात कोथिंबीर तिखट, मीठ, धने-जिरे पूड गरम मसाला घालावा. सर्व मिश्रण चांगले कालवून सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करावेत व प्रेशरकुकरमध्ये चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावेत. नेहमीप्रमाणे साधा भात करून घ्यावा. प्रत्येकाला पानावर भात वाढला की त्यावर हे २-४ गोळे घालावेत. गोळे भातात कुसकरून घ्यावेत. नंतर जास्त तेलाची हिंग-मोहरीची फोडणी करावी. फोडणीत सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. नंतर ही फोडणी प्रत्येकाच्या भातावर चमच्याने वाढावी.

टीप – ह्या भाताबरोबर दुसर्‍या कुठल्याही तोंडीलावण्याची जरूर भासत नाही. हरभर्‍याची डाळ जरा रवाळ दळून आणल्यास त्या पिठाचे गोळे करून भात करता येतो.

मोड आलेल्या मेथींची खिचडी

methi-khichdi साहित्य – १ वाटी मेथी, ३ वाटया तांदुळ, कांदा, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण, गोडा मसाला, तेल, मीठ, हिंग, हळद, तिखट, ओले खोबरे, चवीपुरती साखर

कृती – मेथीत भिजत टाका. रात्रभर भिजल्यावर सकाळी ती उपसावी व फडक्यात बांधून ठेवावी. त्याला मोड येऊन द्यावेत. तांदूळ धुवून उपसून ठेवावेत. उपसलेले तांदूळ बदामी रंगावर भाजून घ्यावेत. कांदा बारीक चिरून थोडया तेलावर भाजून घ्यावा. या कांद्यामध्ये मोड आलेली मेथी घालून चांगली परतून घ्यावी. कांदा व मेथीच्या मिश्रणात कोथिंबीर, मिरची, आले, लसूण याचे वाटण लावून पुन्हा परतून घ्यावे. मिश्रण चांगले परतल्यावर त्यात पाणी घालावे. साधारणपणे चार वाटी जिन्नसाला ६ ते ८ वाटया पाणी लागते. गॅसवर हे मिश्रण शिजत असताना त्यात गोडा मसाला, हिंग, हळद, तिखट, मीठ तसेच चवीला साखर घालावी. पाण्याला चांगली उकळी फुटल्यावर त्यात भाजलेले तांदूळ हलकेच सोडावेत. खिचडी शिजल्यावर खायला देतांना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर पसरून द्यावी.

टीप – हिवाळयात ही खिचडी खावी. पोटाचे विकार दूर होतात. अत्यंत पौष्टिक व रुचकर असा हा पदार्थ आहे. बाळंतिणीकरिता एक चांगला आहार आहे.