ऐसी अक्षरे रसिके: मराठी भाषेविषयी माहितीपूर्ण लेख

‘आज पगाराचा दिवस. कमाईचा हा दिवस काही औरच हवा घेऊन येतो. विदुला झटकन् उठली. लोणी-पाव असा नाश्ता करता करता हातात कागद घेऊन ती काहीतरी लिहीत होती. दूरवर एका इमारतीमधे एक इसम पिस्तूल साफ करीत होता.’ – कथेचा वा कादंबरीचा भाग म्हणून सहज खपून जाईल, पण, मराठी लेखनाचा हा एक नमुना आहे.

आज आपण आपल्या मराठी भाषेविषयी थोडी जास्त माहिती घेऊयात. मराठी प्रामुख्याने बोलली जाते, ती महाराष्ट्र राज्यामधे. मराठी ही महाराष्ट्राची ‘राजभाषा’ आहे. मराठीच्या आजूबाजूचे भाषिक चित्र कसे आहे? उत्तरेला गुजराती, राजस्थानी, भिल्ली व हिंदी, पूर्वेला हिंदी व तेलुगू तर मराठीच्या दक्षिणेला कन्नड व कोकाणी या भाषा तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारत देशातील किती लोक कोणती भाषा बोलतात, याचा जरा अंदाज घेतल्यास, मराठी ही भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. तिच्या आधी हिंदी, तेलुगू व बंगाली यांचा नंबर येतो.

भाषाशास्त्रीय वर्गवारीनुसार, मराठी ही ‘इंडो युरोपियन’ कुळातील भाषा आहे. कुठलीही भाषा म्हटली की, सहसा तिच्यामधे ध्वनी असतात. ‘कमळ’ असे म्हटल्यावर मराठी माणसाला ठराविक फुलाचा अर्थबोध होतो. हेच जर अक्षरांची उलटापालट केली तर, – ‘ळमक’ म्हटले तर – कुठलाच अर्थ त्यातून समजणार नाही. म्हणजे भाषा हा एक संकेत असतो. एकमेकांमधील करार असतो, की, अमूक ध्वनी म्हटले की, अमूक एक वस्तू. समजा एक सुंदर स्त्री आपण पाहातोय. हिरवी साडी नेसून हातात हिरवा चूडा, भांगात कुंकू, कपाळी कुंकू, गळयात मंगळसूत्र. (त्यातही त्या मंगळसूत्राच्या वाटया उलट आहेत.) तिला पाहिल्यावर, कोणताही मराठी माणूस लगेच ओळखेल की ही नुकतेच लग्न झालेली महाराष्ट्रीय तरूणी आहे. पण यावरून एखादया जपानी माणसाला काहीच खास असा अर्थ समजणार नाही. भाषा व तो भाषा बोलणारा समाज यांच्यात असे अतूट बंध निर्माण झालेले असतात, त्याचे कारण त्यांना जोडणारी भाषा असते.

संरचनावादी भाषाशास्त्रज्ञांच्या मतानुसार, भाषा ही चिन्हांची किंवा संकेतांची बनलेली असते. ध्वनी, त्या ध्वनींची अर्थपूर्ण जुळणी करून मग शब्द येतात. हया शब्दांच्या आधारे वाक्य बनते, आणि वाक्यांचा ठराविक क्रम साधला की त्यातून न्यास किंवा एक गोषवारा देणारा आशय मिळतो.

जी बोलली जाते ती भाषा अशी भाषेची व्याख्या तज्ञांनी केली आहे. आपण जे बोलतो ते हवेत विरून जाते. काळावर मात करून जे बोलले गेले, त्याची नोंद करण्याच्या माणसाच्या प्रयत्नांतून लिपीचा उदय झाला. मराठी भाषा ही ‘देवनागरी लिपी‘ मधे लिहीली जाते. ही आर्यांची लिपी. हीलाच ‘बालबोध लिपी‘ असे देखील म्हणतात. भारतात आलेले आर्य हे इथल्या मूळच्या द्रविड लोकांपेक्षा वर्णाने गोरे होते. म्हणून त्यांना ‘देव’ म्हणत. हे आर्य शहरात म्हणजे नगरात राहात म्हणून ते नागरी, व त्यांच्या लिपीला ‘देवनागरी लिपी’ असे नाव पडले. ही लिपी जलद लिहीता यावी, म्हणून त्यातल्या काही अक्षरांना मुरड घालून लिहीण्याचा प्रघात काही काळ प्रचारात होता. या लिहीण्याच्या पध्दतीला ‘मोडी लिपी‘ असे म्हणत असत.

भाषेचा अभ्यास हा रसाळ, सखोल, तसेच अनेक बाजू असणारा गहन विषय आहे. मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, नुसते मराठीतील शब्द देखील किती विविध मार्गांनी मराठीमधे आले आहेत ते, पाहा. बरेचसे मराठीतील शब्द हे संस्कृत मधून आले आहेत. संस्कृत-प्राकृत-मराठी असा शब्दांचा प्रवास ढोबळमानाने दाखविता येतो. पर्ण-पण्ण-पान, किंवा सप्त-हप्त-सात अशी शब्दांची मराठीमधे ‘एन्ट्री’ झालेली दिसून येते. अगदी प्रारंभापासून ऑस्ट्रिक व द्रविड भाषांतील शब्दांची भर मराठीमधे पडली आहे. पुढील संस्कृत व मराठी शब्दांच्या जोडया पाहा. शब्द-साद, क्षेत्र-शेत, रात्र-रात, कर्म-काम, दिवस-दिस, ज्ञान-जाण, आज्ञा-आण, राजा-राव — या शब्दांवरून हे दिसून येते की, मूळ संस्कृत शब्दावरून मराठीमधे शब्द आला, तसेच दैनंदिन व्यवहारात शब्दांच्या नव्या मराठी रूपांबरोबरच संस्कृत रूपे देखील वापरात राहिली. या लेखाच्या सुरवातीला एक उतारा दिला आहे. तो नीट वाचला असल्यास यापुढील माहिती अधिक रंगतदार होईल. जमीन, हवा, महसूल, कागद, फौजदार, जिल्हा, तालुका, तमाशा, हुकूम, पुलाव, बिर्यानी, दारू, दाद, अखेर – हे शब्द फार्सी-अरबी भाषेमधून मराठीत आले आहेत. तर, पगार, जुगार, चावी, पाव, खमीस, रोटी, काडतूस, पलटण, पिस्तुल, मेज आणि मिस्त्री हे शब्द फ्रेंच-पोर्तुगीज यांच्या प्रभावामुळे मराठी भाषेमधे रूढ झाले. टेबल, पेन्सील, पेन, बस, सिग्नल, स्टेशन ही ‘गोऱ्या सायबाची’ जाता जाता राहून गेलेली मालमत्ता, आता आपण आपलीशी केली आहे. मराठीचे उदंड शब्दवैभव हे असे चारही बाजूंनी विस्तारलेले, नटलेले व भरभराटीचे असे आहे.

मराठीची फैलाव दूरदूरवर झालेला दिसून येतो. मराठी पोटभाषा बोलणारे काही लोक मॉरिशस बेटात राहतात. मराठीची थोरवी म्हणजे तिचा पहिलाच कवी, संत ज्ञानेश्वर, – असामान्य प्रतिभा लाभलेला तिचा महाकवी निघाला. मराठीविषयीच्या प्रेमाने भारून त्यांनी लिहीलेल्या ओळींनी समारोप करूयात.

माझ्या म-हाठीचिये बोल कवतिके।
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसि अक्षरे रसिके। मेळवीन॥
– संत ज्ञानेश्वर

अशी आहे मराठी भाषा. रांगडी तशीच सुंदर, अर्थवाही तशीच आधुनिक. गोडव्यामधे खरोखरीच अमृताला देखील हरवेल, अशी.

संदर्भग्रंथ –
कोर्स इन् लिंग्विस्टिक्स (फेर्दिनां-दे-सोस्यूर),
सुगम मराठी व्याकरण लेखन (कै. मो. रा. वाळिंबे),
मराठी विश्वकोश