श्री. रा. ग. जाधव

ज्येष्ठ समिक्षक आणि ललित लेखक श्री. रा. ग. जाधव यांची मुलाखत

नाशिक येथे २८,२९, ३० जानेवारी २००५ ला झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने मावळते संमेलनाध्यक्ष श्री. रा. ग. जाधव यांची श्री. राहुल सुदामे यांनी घेतलेली मुलाखत

प्रा. रा. ग. जाधव यांच्याविषयी -R. G. jadhavजेष्ठ समिक्षक व लेखक. ७७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. ३७ काव्यसंग्रहाचे त्यांनी परिक्षण लिहीले आहे. १८५० ते २००० काळातील मराठी नवकवितांवरील प्रयोग ह्यावर परिसंवाद.

काही दलित साहित्यावर प्रकाश
R G Jadhav परिषदेला अमेरिका व रशिया यांनी त्यांना खास आमंत्रित म्हणुन प्राचारण केले होते. गांधीजीनी त्यांची आपले हिदुधर्मशास्त्राचे सल्लागार म्हणुन नेमणुक केली होती. ह्या ठिकाणी असलेले ३७००० अत्यंत दुर्मीळ अशा संदर्भ ग्रंथानी समृध्द ग्रंथालय व छापखाना हे याचे वैशिष्ट आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेनंतर श्री. र.ग. जाधव विश्वकोशाचे प्रमुख म्हणून काम पहात होते आणि आता ते या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मराठी भाषेचा विकासाचा वेग व अन्य भाषांचा विकासाचा वेग अन्य भाषांशी तुलना करता पुरेसा आहे का? भाषेमधील प्रगती, विकास, संपन्नता पुरेशी आहे का?

मराठी भाषेचा विकास व अन्य भाषांचा विकास याची तुलना करण्यासाठी अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मोघम मत व्यक्त करण्याचे दिवस आता संपले आहेत. तमिळ, मल्याळम, बंगाली, गुजराथी या भाषांमध्ये प्रकाशित होणारी पुस्तके त्यांची संख्या-वर्गवारी, त्यांचा खप, तरुणांचं स्त्रियांचं योगदान अशा वेगवेगळया विभागांचा विचार करुन सर्वेक्षण (Statistical Survey) केलं जाणं आवश्यक आहे. बंगाली भाषेमध्ये सर्वसामान्य रसिकांचे योगदान, पुस्तकांचा खप जास्त असल्याचे जाणवते. याउलट मराठी भाषिकांची अनेक कोटींची संख्या बघता खप कमी आहे. याबाबत सरकार, महाराष्ट्र साहित्य महामंडळ यांनी अभ्यास करुन तरुणांच्या सहाय्याने हे प्रश्न सोडवीले पाहीजेत. भाषा आणि साहित्य हा सुध्दा एक उद्योग (व्यवसाय) आहे. त्यामुळे नवीन उद्योग करण्यापूर्वी जसे व्यवसाय क्षेत्रात सर्वेक्षण केले जाते तसेच भाषेबाबतही करणे आवश्यक आहे.

भाषांची तुलना करतांना दोन, पातळयांचा विचार केला पाहीजे, एक राष्ट्रीय व दुसरी आंतरराष्ट्रीय वेगवेगळया भाषांमध्ये सुसंवाद वाढला पाहीजे. त्यासाठी एकत्र परिसंवाद आयोजित करता येतील तसेच समन्वयक भाषेचाही (link language) विकास करता येईल. परंतू त्यासाठी आपल्याला भाषेबद्दलचे पूर्वग्रह – दुराग्रह – अपग्रह दुर करावे लागतील.

भाषेची केवळ संख्यात्मक वाढ होणे पुरेसे नाही प्रत्येक भाषेच्या वाढीचा एक नैसर्गिक वेग असतो. परंतू त्या नैसर्गिक, भौतीक वाढीबरोबरच गुणवत्तेतही वाढ होणे अपेक्षित आहे. मराठीत चांगले पुस्तकच चालेल असा समाजाचा दबाव निर्माण होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राबाहेर अथवा देशाबाहेर मोठया प्रमाणावर पसरणा-या मराठी भाषिकांच्या संख्येचा सकारात्मक परिणाम होतो आहे का? असे परदेशी मराठी बांधव मराठीच्या विकासात योगदान कसे देऊ शकतात?

भारताबाहेर व महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास गेलेल्या मराठी भाषिक पिढीच्या विस्तारामुळे बृहन्महाराष्ट्राची संकल्पना पुढे येत आहे. अशा परदेशवासीयांचा (डायस्पोरा) इतिहास आता वाढतो आहे, त्यांची व्याप्ती वाढते आहे. महाराष्ट्राबाहेर कलकत्ता, इंदूर या महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या घटक संस्था अनेक वर्षे कार्यरत आहेत. काही वर्षापूर्वी परदेशस्थ मराठी लेखकांच्या कथांचा एक संग्रह (कुंपणापलिकडील शेत) प्रसिध्द झाला होता. असे साहित्य सातत्याने प्रकाशित होत आले आहे. या साहित्याला येथील मराठी वाचकांकडून योग्य प्रतिसाद देणे आवश्यक आहे. परदेशस्थ मराठी साहित्यीकांमध्ये आपलेपणाची भावना वाढली पाहीजे. त्यासाठी दोन्ही कडून सुसंवाद वाढायला हवा. त्यांचा मुख्य भूमीवरील परंपरेत सहभाग, वाढायला हवा. यासाठी साहित्य संमेलनामध्ये बृहन्महाराष्ट्राचा खास विभाग निर्माण करता येईल. त्यांचे सांस्कृतिक व सामाजिक प्रश्न, त्यांची कालची आजची व उद्याची स्थिती याविषयी चर्चा व्हायला हवी. आणि या चर्चेला प्रसार माध्यमांनी सुध्दा पुरेश्या गांभिर्याने महत्त्व दिले पाहिजे. बेलगाव – इंदूर यांचा स्वतंत्र विभागसुध्दा साहित्य संमेलनात निर्माण करता येईल. याचबरोबर अन्य भाषिक अल्पसंख्य गटांचीसुध्दा योग्य दखल घेतली पाहीजे. संवादाचे एक माध्यम निर्माण व्हायला हवे आणि, त्यासाठी विकसनक्षम प्रयत्न व्हायला हवेत.

मराठी भाषेला एक मानाचे स्थान आहे, ८०० वर्षांची समर्थ परंपरा आहे हे आपण लक्षात ठेवले पाहीजे. शिवाजी महाराज, संत तुकाराम अशा अनेकांनी ही भाषा गौरवलेली आहे. आपली मराठी भाषा ही राज्यकर्त्यांची भाषा आहे हे आत्मभान आपल्याला आले पाहीजे. आपल्याला आपली सांस्कृतिक संपन्नता जाणवली पाहीजे. त्यासाठी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत वाङ्मयींन चर्चा, परिसंवाद व्हायला हवेत आपले समृध्द नाटयवाङ्मय, विनोद, सौंदर्यशाखा यांची परंपरा सर्वांसमोर सादर केली पाहिजे.

आपल्याकडे अनेक द्वैभाषिक साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य तसेच अन्य भाषांतील साहित्य आपल्यात आणायला हवे. अन्य भाषांसोबत एकत्रीत संमेलने भरवायला हवीत. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर सुध्दा कोणाला एकत्र संमेलने भरवायची असतील तर त्यांना साहित्य महामंडळ नियोजनासाठी निश्चितच सहकार्य व मार्गदर्शन करेल.

भारताबाहेरील मराठीप्रेमी दोन भिन्न भाषा-संस्कृतीमध्ये संपर्कवाहिनीचे काम करु शकतील. परदेशात भाषाशिक्षणासाठी, भाषाभिवृध्दिसाठी काय प्रयत्न केले जातात. तेथे संमेलने कशी होतात, तिथे कथा-कादंबरीकार किती आहेत, प्रकाशनसंस्था व खप यांचे प्रमाण, मानधन, वृत्तपत्र संस्कृती, कोषवाङ्मय, वाचनालये यांचा परिचय वाढवला पाहिजे यातून मराठी भाषा व कलावाङ्मय यांच्याकडे पाहण्याचा तौलनिक दृष्टीकोन प्राप्त होईल. अनेक आधुनिक सुविधांचा वापर करुन जास्तीत जास्त सकारात्मक व रसिकांना उपयोग होईल असे उपक्रम राबवता येईल.

मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि युवावर्गामध्ये भाषेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील?

मराठीच्या विकासासाठी दोन पातळयांवरती प्रयत्न करायला हवेत. घरात आणि शाळेत बालभारती कुमारभारती यांच्याबरोबरच मराठी पाठयपुस्तकांची मोठी परंपरा आहे. मन्वंतर, नवयुग वाचनमाला यांचे सुध्दा यात योगदान आहे. या सर्व संपन्न साहित्यसंपदेचा वापर करुन शिक्षकांनी मराठी भाषा नीट शिकवायला हवी. भाषेची आवड विद्यार्थ्यांमध्ये वाढेल, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी वाढेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. मराठी ही मातृभाषा असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, त्याबाबतीत औदासिन्य असू नये. शिक्षकांनी त्यांची सर्व कौशल्य वापरुन, पुस्तके व अन्य साधनं वापरुन शिकवायला हवे. एखाद्या विषयाला शिक्षक जसे असतात तशीच गोडी विद्यार्थ्यांना त्या विषयात निर्माण होते. त्यामुळेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांची त्या विषयात गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी साने गुरुजींच्या गोड गोष्टी, शिवाजीच्या गोष्टी अशा स्वरुपाच्या पूरक वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे ही शिक्षक व पालकांची जबाबदारी आहे.

भाषा ही त्यातील प्रतिभावंतांमुळे नाही तर त्या भाषेतील सर्वसामान्यांमुळेच टिकते सर्वसामान्य समाज ज्या भाषेत व्यवहार करतो, ज्या भाषेत जगतो तिच खरी त्या काळाची भाषा असते हेच सत्य आहे आणि ही भाषा टिकविण्यासाठी लोहार, चांभार, सोनार यांच्या वापरातील शब्दांचा शब्दकोष तयार करायला हवा. नुसती संस्कृती मंडळे स्थापन करुन पुरस्कार देऊन भाषा टिकणार नाही. त्यासाठी दलित, ग्रामीण साहित्य टिकवलं पाहिजे वाक्यप्रचार, समानार्थी, विरुध्दार्थी शब्द यांचे संकलन व्हायला हवे त्यासाठी भाषेबद्दलची आत्मवंचना प्रवंचना टाळायला हवी. जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. कारण ज्ञानोपासना हाच भाषा-साहित्याचा कणा आहे.

भाषेची समृध्दी कायम ठेवण्यासाठी बोली भाषेचे सुध्दा शब्दकोष निर्माण व्हायला हवे. अगदी भाजीवालीच्या भाषेपासून शायरी, पंडिती वाङ्मय, ओव्या, स्त्रीयांचे वाङ्मय, यांचे शब्दकोष निर्माण व्हायला हवेत शब्दकोषामध्ये शब्दाच्या अर्थासोबतच समानार्थी, विरुध्दार्थी शब्द, संकल्पना, त्या शब्दाचा मुळ अर्थ असे नोंदवले जायला हवे. ‘विश्वकोषासारखी’ रचना ज्यामध्ये शब्दाच्या अर्थासोबत अनुरुप चित्र सुध्दा देण्यात आली आहेत. अशा उपक्रमांची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करुन दिली पाहिजे. हे सर्व प्रयत्न नव्या जमान्याच्या नव्या परिभाषेत केले पाहीजे शिक्षकांनी त्यासाठी नाविन्य ठेवले पाहीजे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वाङ्मयनिर्मिती बद्दल तसेच काय वाचावे, कुठे वाचावे याची माहिती दयावी. आता जर कविता, छोटया कथा, पत्र, बातम्या कशा लिहाव्या, शब्दसंग्रह कसा वाढवावा यासाठी जर एखादी कार्यशाळा आयोजित केली तर त्याला युवा वर्गाचा निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. वाङ्मय हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी साहित्याची दारं खुली करायला पाहिजे. त्यामध्ये विशेष वर्ग (priviledged class) निमार्ण होऊ नये तसेच भाषेकडे केवळ मनोरंजन अथवा विरंगुळा म्हणून बघितले जाऊ नये.

मराठीचा इतिहास मराठी भाषेतील सर्व प्रवाहांची येग्य दखल घेतो आहे का?

महाराष्ट्राचा साहित्यिक इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासात सर्व वेगवेगळे प्रवाह समर्थपणे नोंदवले गेले आहेत सहिष्णूता हेच मराठी साहित्याचे अधिष्ठान आहे. मराठी भाषेची इंग्रजी, संस्कृत, फारशी या भाषांची तुलना केल्यास सर्वधर्मसमभाव तिच्या हाडातच आहे हे जाणवेल. अर्थात असे असले तरीही ज्ञानसत्ता, कर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वर्गाच्या हातात आहे त्यांचे विचारही प्रकर्षाने मांडले गेल्याचेही जाणवते.

जागतिक साहित्यात मराठीचे स्थान

संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यावरती आता व्यापक संशोधन चालू आहे. परंतू विश्वसाहित्य हे सुध्दा एक मिथक आहे कोणतेच साहित्य हे मुळात विश्वसाहित्य असेल असे नाही प्रत्येक लेखक हा त्याच्या लोकांसाठी, समुदायासाठी लिहित असतो. परंतू जेव्हा साहित्यात वैश्विक जाणीव प्रकर्षाने सामोरी येते तेव्हा ते सर्वांनाच भावते. म्हणूनच हॅम्लेटची शोकांतिका, त्यातील व्यक्तिमत्त्वातील सखोल संघर्ष आपल्याला हेलावून टाकतो. म्हणूनच शिवाजीची महानता कळण्यासाठी जगातील महान लोकांचीसुध्दा माहिती हवी त्यासाठी ज्युलिअस सिझर, बॅबिलियॉन पासून अशोक, विजयनगर साम्राज्यापर्यंतचा बदल तत्कालीन परिस्थिती यांची जाणीव होण्याइतकी याचा अभ्यास करण्याइतकी प्रतिभा हवी अर्थात याचबरोबर आंतरभाषिक संपर्क सुध्दा मोठया प्रमाणावर व्हायला हवा कारण गटे पर्यंत जेव्हा शाकुंतल पोहोचले तेव्हाचे तो डोक्यावर घेऊन नाचला ना?

मराठी कवितांमध्ये तंत्रशुध्दपणा, लय, गेयता येण्यासाठी काय प्रयत्न करता येतील?

मराठी कवितेमध्ये काही प्रमाणात आवर्त आलेले आहे हे सत्य आहे कवितेचे मोजमाप करण्यासाठी किमान व कमाल गुणवत्तेदरम्यानची उंची मोजायला हवी. सुदैवाने मराठीत सामान्य कवितेची सुध्दा गुणवत्ता कमी नाहीये मुक्त छंद गझल हे या काळाचे आवडीचे काव्यप्रकार आहेत. त्या त्या काळानुसार दलित, आत्मचरीत्र हे मान्यताप्राप्त झाले होते मर्ढेकरांच्या कवितांपर्यंत कवितेची राजसत्ता होती, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ या कादंबरीनंतर कादंबरी जास्त रुढ होत गेलेली दिसते कवितेमध्ये गेयता येण्यासाठी रचना तशी असायला हवी ती गेयता जगण्यातसुध्दा असायला हवी. कवी विठ्ठल वाघ, ग्रेस जे बोलायचे ते सुध्दा गेयच होते अनेकदा कवी गवयाप्रमाणे कवितेची स्वरांतच सुरुवात करतो. कवितेच्या गेयतेचा तिच्या गुणवत्तेशीसुध्दा संबंध आहे.

कवितेमध्ये गेयता, वंगशुध्दपणा वाढण्यासाठी वेगवेगळी वृत्त आणि अलंकार यांची माहिती करुन देणारी पुस्तके निघायला हवीत. शार्दूलविक्रीडीत, भुजंगप्रयाग यासारखी अलंकार तसेच जातीवृत्त, अक्षर वृत्त याची माहीती करुन दिली पाहीजे. नव्या पिढीला साहित्याची आवड असते परंतू त्याच्या परिपोषणासाठी साधने हवी कवितेच्या निर्मितीमध्ये १% प्रतिभा आणि ९९% अभ्यास असावा लागतो. मला जर समोरच्या पिंपल माझ्याशी बोलतोय असे वाटलं आणि त्यावर कविता लिहायची असेल तर त्यासाठी ९९% अभ्यास कामगिरी (crafting) हवी.

असा अभ्यास आणि क्राफ्टींग गदिमा व शांताबाई यांना उत्तम जमला. त्यामुळे कवितेतले लोकांचे आकर्षण वाढले. त्यांना सुधीर फडक्यांची सुध्दा मोलाची साथ लाभली, कवितेतला सांगितीक अर्थ वाचकांपर्यत पोहचल्यास त्याचा प्रतिसाद आणखी वाढतो. आमची पिढी चित्रपटांमुळे घडली परंतू साहित्यात त्यांचे पुरेसे प्रतिबिंब दिसत नाही यासाठी आपल्याला आपले सांस्कृतिक गंड सोडायला हवेत.

भागीय-प्रांतीय संमेलने, समाज घटकांची संमेलने, व्यवसायिकांची संमेलने, विद्रोही, बंधुता हे नवे प्रवाह आता रुढ होत आहेत याबाबत आपले मत?

हल्ली उद्योजक, इंजिनिअर्स, व्यावसायिक स्त्रिया, दलित यांचीसुध्दा संमेलने होत आहेत. त्याने साहित्यातील व्यापक हित जपले जात आहेत. आता दरवर्षी साधारण १० ते १५ संमेलने होतात. त्यामुळे माझी अशी सूचना आहे की, मराठीतील प्रतिनिधीक अ.भा. साहित्य संमेलन दर ५ वर्षांनी भरविण्यात यावे. त्यामुळे त्यातील चर्चा उपेक्षित रहाणार नाही. मधल्या काळात विभागीय संमेलने तसेच विद्यापीठ, महाविद्यालये यांमधून चर्चा करत राहता येईल. परंतू या सर्वाचा समन्वय हवा. साहित्य संमेलनापूर्वी २-३ आठवडे वृत्तांत चर्चा वृतपत्र, साप्ताहीकं, पाक्षीकं यामधून यायला हवा. मराठी पत्रकारीता अन्य सर्व प्रवांहाचे यौग्य कौतुकच करीत आली आहे. फक्त हे काम उत्तरदायीत्वाच्या भावनेतून व्हायला हवे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरचा अनुभव कसा होता?

साहित्यसंमेलनाध्यक्ष हे पद हाच एक मोठा मान आहे, एक स्वयंसिध्द अधिकार आहे त्यामुळे या पदाला एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी जोडले जाऊ नये त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा कमी होईल. संमेलनाध्यक्ष पद हे सर्वसामान्य व प्रतिनिधीक आहे. मराठी भाषेसारखे अन्य भाषांमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर साहित्य संमेलन होत नाही. त्यातील अनाठायी खर्च व भपका कमी करायला हवा परंतू सारखं साधेपणाचाही आग्रह कौतूक करु नये.

आपण आपल्या ७७ व्या अ. भा. म. संमेलनाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीबद्दल समाधानी आहात का?

हे पद मिळण्यापूर्वी मी जसा होतो तसाच आजही आहे आणि नंतरही तसाच राहीन अर्थात या काळात मला सामाजीकतेचं व्यापक भान आलं. कॉमन मॅन हा माझा आदर्श समिक्षक आहे. भाषा हे स्वयंसिध्दपणे शस्त्र आहे त्यामुळे ते अत्यंत जबाबदारीने, सौम्य भाषेत वापरायला हवं. लेखणीला यापूर्वीही पर्याय नव्हता आणि नसेल हेच शाश्वत आहे.

मुलाखत व शब्दांकन – राहुल सुदामे, पुणे