पोळी-भाकरी

गोल पराठा

साहित्य – मैदा, कणिक, तूप, मीठ.

कृती – चवीपुरते मीठ टाकून नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घ्या. फुलक्याच्या आकाराची पोळी लाटून तूप व मैदा भुरभुरवून मोदकाप्रमाणे बाजूने कळ्या पाडत आकार द्या व वरचे टोक आले की तसेच दाबून टाका व पुन्हा जाडसर पराठा लाटा. नेहमीप्रमाणे तूप टाकून लाटा.

जिलेबी पराठा

jalebi-paratha साहित्य – कणिक, पाणी, मीठ.

कृती – चवीला मीठ घालून नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घ्या. गोल लहान पोळी लाटून ती मध्यापासून दुमडून गोल कोन तयार करा. हा कोन अलगद दाबा. जिलेबीप्रमाणे गोळा तयार होईल. तो लाटा व तूप सोडून खमंग भाजा.

लच्छेदार पराठा

lachedar-paratha साहित्य – मैदा, तूप, कणिक, मीठ.

कृती – चवीला मीठ घालून नेहमीप्रमाणे कणिक हवी तेवढी भिजवा. प्रथम एक गोळा घेऊन लांबट लाटा. त्याच आकारात थोडा ओढून घ्या. तूप व मैदा भुरभुरवा. लांबीच्या आकारात घडी घाला व एका बाजूने गुंडाळत न्या. उभ्या आकारात हाताने दाबा व जाडसर लाटा. चक्रासारखे पदर येतील. तव्यावर तूप सोडून खुसखुशीत भाजा.

उसाच्या रसाच्या दशम्या

dashmya साहित्य -१ वाटी कणीक, २ चमचे मोहन, मीठ,अर्धी वाटी उसाचा रस, पाव कप गूळ.

कृती – गूळ चिरून उसाच्या रसात एकजीव करावा. कणकेत मीठ घालून ती उसाच्या रसाने भिजवावी. कणीक एक तास भिजल्यानंतर त्यात मोहन टाकून पुन्हा मळावी. नंतर नेहमीप्रमाणे घडीच्या पोळीसारखी लाटावी. घडीवर भरपूर तेल लावावे, किचिंत पिठी टाकून दशम्या लाटाव्यात व तव्यावर खमंग भाजाव्यात.

उकड काढून केलेली भाकरी

ukdichibhakari साहित्य – बाजरीचे पीठ, मीठ व तेल.

कृती – २ वाटया बाजरीचे पीठ असेल तर एक किंवा दीड वाटी पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात थोडे मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात पीठ घालून उलथण्याच्या टोकाने ढवळावे. मंदाग्नीवर वाफ येऊ द्यावी. नंतर खाली उतरावे. परातीत काढून चांगले मळावे. मोहन अजिबात घालू नये. पोळपाटावर प्लॅस्टिक घालून लाटण्याने हलके लाटावे व पोळया कराव्या व तव्यावर शेकून गरमच वाढाव्या. तांदूळाच्या पीठाची, ज्वारीच्या पीठाची किंवा ज्वार बाजरी एकत्र केलेल्या पीठाची भाकरी, वरील बाजरीच्या भाकरीप्रमाणे करावी. नाचणीच्या पीठाची भाकरी करताना पीठ काढत भिजवावे, म्हणजे भाकरी थापतांना सोपे जाते. बाकी कृती बाजरीच्या भाकरीप्रमाणे करावी.