सखी

महिला विषयक

९ ते ५ व्यावसायिक लग्नाचा जोडीदार ‘ऑफिस स्पाऊस’

आय.टी., बी.पी.ओ, कॉल सेंटर्स, पत्रकारिता, वैद्यकीय, एन्टरटेन्मॆट इंन्डस्ट्री अश्या अनेक क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने असतो. ह्या सगळ्या क्षेत्रात कामाचे तास अधिक काळ असल्याने ओघाने स्त्री व पुरुष एकत्रितपणे काम करतात. भिन्नलिंगी माणसांनी एकत्र काम करणे ही काही नवलाईची बाब नाही. तीस वर्षांपूर्वीही बॅंक, पोस्ट, विद्यालय, सरकारी खात्यातून एकत्र काम करणारे स्त्री-पुरुष ‘कलीग्ज’ आपण पाहात आलेलो आहोत. परंतु त्या वेळेला अपवाद वगळता बहुतेकांचे आपल्या सहका-यांशी संबंध हे कामापुरते असत. त्यात व्यक्तीगत बाबींना फारसा वाव नसायचा. आजच्या लाईफस्टाईल आणि कामाच्या वाढलेल्या वेळेनुसार ही (लक्ष्मण) रेषा अधिक धुसर होतांना दिसते.

सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट लिडर असणा-या नीताच्या आवडीनिवडी तिचा रिर्पोटींग बॉस आणि प्रोजेक्ट मॅनेजर अनिरुध्दला नीट माहिती आहेत. आठवडयाचे पाच दिवस, दिवसाला बारा तासापेक्षाही जास्त एकत्र काम करत असल्यामुळे आपाआपल्या जोडीदारांपेक्षा ही दोघेजण अधिक काळ एकत्र असतात. त्यामुळे अनिरुध्दला नीताचा आवडीचा पदार्थ, रंग, कपडे, गाणी तर माहिती आहेतच पण तिच्या व्यक्तीगत सुखदुःखाचाही तो वाटेकरी आहे. तश्याच प्रकारे डॉ. मनिषाला डॉ. सुदीपच्या कामाच्या वेळा, पध्दत, आवड तसेच त्याच्या वैवाहीक आयुष्याबद्दल संपूर्णपणे माहिती असते. आजकाल अश्या प्रकारची उदाहरणे आपण आपल्या कार्यालयात बघतो, त्याबद्दल गरम चर्चाही होत असते. वरील दोन्ही उदाहरणात हे भिन्न लिंगी लोक एकमेकांचे लग्नाचे जोडीदार नाहीत, ते आहेत एकमेकांचे ‘ऑफिस स्पाऊस’ (Office Spouse). पूर्वी सेक्रेटरी हे पद कार्यालयात असायचे. आजही आहेच. सेक्रेटरी ही बहुदा स्त्रीच असायची. आपल्या वरिष्ठांच्या कार्यालयीन कामाबरोबरच कधीतरी व्यक्तीगत कामांचीही काळजी ही सेक्रेटरी घ्यायची. ह्या पदाला थोडीशी दुय्यमपणाची झाक होती. परंतु ऑफिस स्पाऊस मध्ये बहुतेक वेळा दोन्ही व्यक्ती समान पातळीवर काम करतांना आढळतात.

‘ऑफिस स्पाऊस’ ही संकल्पना मूळ अमेरिकेची. तेथे स्त्री-पुरुषांनी अधिक काळ एकत्र काम करणे, तुलनेने मोकळे वातावरण आणि बहुतेक वेळेला विवाहीत जोडीदाराशी तणावपूर्ण असणा-या संबंधांमुळे ‘ऑफिस स्पाऊस’ ह्या नात्याचा जन्म झाला. तुम्ही विवाहीत किंवा अविवाहीत असाल पण कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची, बौध्दीक, मानसिक आणि भावनिक काळजी घेणारा तुमचा सहकारी हा तुमचा ‘ऑफिस स्पाऊस’ असतो. ऑफिस स्पाऊस हा सम किंवा भिन्न लिंगी जोडीदारही असू शकतो. परंतु जास्त चर्चा होते ती स्त्री आणि पुरुष ‘ऑफिस स्पाऊस’ असण्याबद्दलची. विशेषता विवाहीत स्त्री- पुरुषांसाठी ही रेषा अत्यंत धुसर असते. आपल्या सहकारीणी बरोबर व्यवसायिक आणि व्यक्तिगत संबंध व्यवस्थित जपणं हे अत्यंत कौशल्याचे आहे. ऑफिस स्पाऊस ह्या संबंधात व्यावसायिक संबंधांबरोबर मैत्रीचे संबंधही गृहीत धरले जातात. स्त्री-पुरुष मैत्री हा फार पूर्वी पासून वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. ऑफिस स्पाऊस बरोबर केवळ निखळ मैत्री अपेक्षित असून ह्या शारिरीक संबंधाला स्थान नाही. परंतु ही पायवाट अत्यंत निसरडी आहे. आपल्या जोडीदारापेक्षाही जास्त वेळ ज्याच्या/जिच्या सोबत घालवले जातात, सतत बाहेरगावचा-परदेश प्रवास, एकत्र खाणे-पिणे, काम करणे ह्या मुळे सतत सहवास असतो. अश्या वेळेला आकर्षण वाटून विवाहबाह्य संबंध किंवा शारिरीक जवळीकीची शक्यता नाकारता येत नाही. पुढील लिंक्सवर ऑफिस स्पाऊस विषयी आपल्याला माहिती वाचायला मिळते –
http://awomanvisible.blogspot.com/2006/02/do-you-have-office-spouse.html,
http://www.tribuneindia.com/2008/20080213/jobs1.htm, http://www.webmd.com/sex-relationships/features/the-office-spouse-rules-…
ब्लॉगर म्हणतो महिला ऑफिस स्पाऊस असल्यास पतीला तिची ‘मॅनेजरीयल स्कील्स’ ऑफिसमध्ये ठळकपणे दिसतात. प्रोजेक्ट कौशल्याने हाताळणे, संवाद साधणे, कामाचा झपाटा, आवाका तसेच स्वतःला टापटीप ठेवणे ह्या गुणांमुळे ऑफिस स्पाऊस उजवी वाटू शकते. ऑफिस स्पाऊसमुळे कामाचा दर्जा आणि आवाका वाढण्यास मदत होते असे म्हटले आहे. ऑफिस स्पाऊसमुळे ऑफिसला रोज उत्साहाने सकाळी यावेसे वाटते. कामासंबंधी चर्चा, अडचणी आल्यास, प्रकल्प पूर्ण करण्यास, विश्वासाने व्यावसायिक गोष्टी वाटून घेण्यासाठी ऑफिस स्पाऊसचा मानसिक आणि भावनिक आधार वाटू शकतो. त्या उलट आपली ‘होम मेकर’ पत्नी फक्त घर कामात अडकलेली, मुलांच्या संगोपनात गुंतलेली आणि स्वतःकडे फारसे लक्ष नसलेली त्यामुळे तिची बाजू डावी होऊ शकते.

कीम म्हणते स्पाऊस हा शब्द कामाच्या ठिकाणी सरसकटपणे वापरणे हा लग्नाच्या नात्याचा अपमान करण्यासारखे आहे. लग्न ही संस्था अत्यंत पवित्र आणि दोन व्यक्तींची व्यक्तीगत बाब आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकारयाची मदत होत असल्यास तो तुमचा (व्यावसायिक का होईना) जोडीदार होऊ शकत नाही पण चांगला मित्र आणि साथीदार होऊ शकतो. कीम स्वतःचे अनुभव मोकळेपणाने सांगते की तिचे तिच्या बॉसची चांगले संबंध होते, त्याच्या ऑफिसच्या कामाबरोबर कित्येकवेळा बाहेरुन जेवण मागवण्याचे कामही तिने केले आहे परंतु ह्या सगळ्यामधे दोघांमधेही विशिष्ट अंतर कायम असायचे, आपाआपल्या लग्नाच्या जोडीदाराबरोबरच्या वागण्या बोलण्यातही पारदर्शकता होती. त्यामुळे त्यांचे आपाआपल्या जोडीदारांशी नाते टिकून राहिले. ह्या नात्याच्या गुंतागुंतीमुळे कीमला स्वतःला तिच्या बॉसचा स्पाऊस म्हटलेले आवडत नाही.

बरेच वेळा काही कारणांमुळे विवाहीत असूनही आपल्या ऑफिस स्पाऊस मध्ये भावनिक आणि शारिरीकरित्या गुंतल्यास लग्न कोलमडण्याची शक्यता असते. मुले असल्यास त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. न्यूयॉर्कच्या रुथ होस्टन ह्या विवाह सल्लागार महिलेने ऑफिस स्पाऊस असल्याचे दुषपरिणाम http://infidelitynewsandviews.blogspot.com/2007/08/14-problems-work-spou… ह्या लिकंवर अधोरेखित केले आहेत. रुथ म्हणते ऑफिस स्पाऊसला मिळत असलेल्या खास वागणुकीमुळे, बढतीमुळे, वाढलेल्या पगारामुळे कार्यालयातील इतर कर्मचा-यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ऑफिस स्पाऊस असणारया दोघांच्याही कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामधे वयक्तीक जोडीदाराबरोबरही तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता वाढते. ऑफिस स्पाऊस मधील एकाची कार्यक्षमता कमी झाल्यास, मतभेद वाढल्यास बरोबर काम करण्याची इच्छाही कमी होते.

आपले व्यावसायिक आणि व्यक्तीगत आयुष्य सुखद होण्यासाठी
http://www.webmd.com/sex-relationships/features/the-office-spouse-rules-…
ह्या साईटवर ऑफिस स्पाऊसेसना सांगितलेले नियम वाचण्यासारखे आहेत :
१) आपल्या वैवाहीक आणि व्यक्तीगत आयुष्याबद्दल व्यवसायाच्या ठिकाणी बोलणे नको. इतर सहकारी व्यक्तीगत बोलण्यास उत्सुक असल्यास आपली नापसंती त्यांना चांगल्या शब्दात दर्शवून द्या. बोलणे झाल्यास आपल्या लग्नाच्या जोडीदारालाही त्या बाबत सांगा.
२) कधीतरी खाजगी आयुष्याबद्दल बोलायची वेळ आल्यास आपल्या जोडीदाराबरोबरचे आपले वैयक्तीक मतभेद सांगू नका, गारहाणी करु नका. सहज म्हणून केलेली ही गारहाणी समोरच्याला ‘वेगळा’च संदेश पोहोचवू शकतात.
३) भिन्न लिंगी स्पाऊस बरोबर एकटे राहू नका. शक्यतो एकटयाने प्रवास टाळावा. मनोरंजक गोष्टी एकत्र केल्यास एकमेकांच्या आकर्षणाची शक्यता वाढते त्यामुळे फक्त दोघांनीच बाहेर खाणे, फिरणे, सिनेमा पाहणे, पार्ट्यांना जाणे, मद्यपान करणे टाळलेले बरे.
४) आपल्या जोडीदाराला ऑफिस स्पाऊसची ओळख करुन द्या. त्यांच्यातही तुमच्या इतकीच मोकळेपणाने चर्चा होईल ह्यासाठी प्रयत्नशील रहा. त्यामुळे नात्यामध्ये पारदर्शकता येते.
५) हल्ली संपर्क अतिशय जलद आणि सुलभ झाला आहे. मोबाईल, ईमेल, चॅटमुळे इतर कोणालाही न कळता २४ तास ऑफिस स्पाऊसना संपर्कात राहता येते. त्यामुळे कामाव्यतिरीक्त इतर विषय ओघाने येतात. ह्या विषयी आपल्या जोडीदारालाही माहिती करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे जोडीदाराला आपल्याला एकटे आणि वेगळे टाकल्याची भावना येणार नाही.
६) बोलण्यात, वागण्यात, फोनवर किंवा ई-मेल लिहीतांना सैल भाषा (slang languague) वापरणे टाळावे. आपल्या भाषेतून वेगळा संदेश जाणारा नाही ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

वेबवर ऑफिस स्पाऊसबाबत वाचन करतांना अनेक उलटसुलट मत वाचायला मिळाली. ऑफिस स्पाऊसचे प्रमाण सध्यातरी आपल्यापेक्षा परदेशातच जास्त आहे, भारतातही हे लवकरच पसरेल ह्यात शंकाच नाही. दूरचा विचार करता ऑफिस स्पाऊसपेक्षाही ‘रियल’ स्पाऊसला महत्त्व देणे अधिक शहाणपणाचे आहे. प्रत्येकाने आपली व्यावसायिकता आणि मनाचा संयम जपत ऑफिस स्पाऊसचे नाते फुलवले तर त्यांना व्यावसायिक उन्नती मिळेल ह्यात शंकाच नाही.

– भाग्यश्री केंगे