नागनाथ संतराम इनामदार (जन्म:२३ नोव्हेंबर १९२३, मृत्यू १६ ऑक्टोबर २००२)

ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची कायमची ओळख मराठी वाचकाला राहिलं. कादंबरीमधे काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही.

ऐतिहासिक वास्तवातून वर्तमानाचे परिक्षण करणारे, ते थोर कादंबरीकार होते. एकीकडे काय घडले याचे तपशील गोळा करणे, उपलब्ध माहितीतून जरूरी तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधणे, इतिहासाचा आदर करणे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दृष्टिला दिसलेला, भावलेला इतिहास उभा करणे, ही दुहेरी तारेवरची कसरत ऐतिहासिक कादंबरीकाराला करावी लागते आणि इनामदारांनी ती लीलया किती सहजपणे साधली होती हे त्यांच्या लेखनातून दिसून येते.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली ‘बंड’ ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची ‘शिकस्त’ केली. त्यांची ही ‘झेप’ मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली.

भूमापनाचे शासकीय खात्यातील त्यांचे काम देखील त्यांना संशोधनाच्या दृष्टिने पूरक ठरले. ‘भूमीतरंग’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. कथा लेखनाने त्याच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङमयीन लेखन १९४५ मध्ये ‘अनिल’ साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘किर्लोस्कर’, ‘साप्ताहिक स्वराज्य’ वगैरे नियतकालिकांतून लेखन केले.

मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तींचा मागोवा त्यांनी घेतला. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि अतिशय निकोप होती. नोकरीच्या निमित्ताने हिंडत असताना ऐतिहासिक दस्तावेजांचे संशोधन करण्याचा छंदच त्यांना लागला होता.

त्रिंबकजी डेंगळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्यानी लिहीलेल्या ‘झेप’ या कादंबरीच्या एकंदर १० आवृत्त्या निघाल्या. या त्यांच्या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर १९६६ साली आलेल्या त्यांच्या ‘झुंज’ या कादंबरीने पुन्हा एकवार राज्य शासनाचा पुरस्कार पटकाविला. मल्हारराव होळकर यांची सून अहिल्याबाई होळकर. त्यांच्या मुलाचे निधन झाल्यावर होळकर घराण्यातील तुकोजी होळकर याने सारी सुभेदारी सांभाळली. ‘यशवंतराव होळकर’ हे तुकोजी होळकरांचे अनौरस पुत्र. यशवंतराव होळकरांना पुणे जाळणारा पेशव्यांचा सरदार म्हणून सारेच ओळखतात. जुन्या मराठी माणसांनी प्रात:काळी ज्यांची नावे उच्चारू नयेत अशा त्रयीत यशवंतरावांची गणना केली. पण मराठी वाचकांना परिचित नसलेला यशवंतराव होळकर ‘झुंज’ मधे ना. सं. इनामदारांनी पेश केला आहे.

दुस-या बाजीरावावरील ‘मंत्रावेगळा’ ही त्यांची कादंबरी जशी वाचकप्रिय झाली, तशीच औरंगजेबाच्या जीवनावरील नाटय उलगडून दाखविणारी ‘शहेनशहा’ ही कादंबरीही गाजली. त्यांनी शहेनशहा ही कादंबरी लिहीण्यास घेतली तेंव्हा विख्यात कादंबरीकार वि. स. खांडेकर यांनी, “त्यांनी हा विषय निवडूनच निम्मे अधिक यश मिळवले आहे”, ते या विषयाचे सोने करू शकतात. असे गौरवोद्गार काढले. ही कादंबरी अचूक व्हावी म्हणून तिची प्रुफे महोपाध्याय श्री. सेतुमाधवराव पगडी तपासत असत. श्री. पगडी यांनी, “ही कादंबरी मराठीतच काय, भारतीय वाङमयात इतिहास करेल” असा अभिप्रायही व्यक्त केला.

श्री. विश्वास पाटील यांच्या सांगण्यानुसार जदुनाथ सरकार यांच्या साहित्याने प्रेरित होऊन ना. सं. इनामदारांनी, ‘शहेनशहा’ ही कादंबरी लिहीली. पार्वतीबाईसाहेब पेशवे यांच्या जीवनावरील ‘शिकस्त’ मधे पानिपत युध्दात धारातिर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नीच्या वेदना त्यांनी मांडल्या. ‘राऊ’ मधे, थोरल्या बाजीरावांचा पराक्रम, मस्तानी प्रकरण, या प्रकरणाचे बाजीरावांना बसलेले चटके, यांचा मागोवा घेतला आहे. दुसरा बाजीराव त्यांनी मंत्रावेगळा कादंबरीतून उभा केला. राजेश्री या कादंबरीमधे शिवचरित्राचा उत्तर भाग येतो.

झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंब-यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची ‘घातचक्र’ ही कादंबरी देखील प्रकाशित झाली आहे. मंत्रावेगळा, झुंज आणि झेप या तिन्ही कादंब-यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. १९९७ येथे झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष होते.

‘त्या स्वप्नांच्या आठवणी’ मधे शासकीय सेवेतील आठवणी सांगितल्या आहेत. ‘चांदराती रंगल्या’ मधे वाङमयीन व ‘वाळल्या फुला’त मध्ये वैयक्तिक जीवनातील आठवणी त्यांनी कथन केल्या आहेत. या आत्मकथानातून महाराष्ट्राचा ६०-७० वर्षांचा आलेख प्रकट होतो. विविध व्यक्ति व संस्था यांचे त्यांच्यावर झालेले संस्कार, त्याच्या निष्ठा, जीवनदृष्टी व कठोर वास्तवाला शांतपणे सामोरे जाण्याची तयारी त्यातून प्रकट होते.

फिरतीच्या नोकरीत लिहीण्यासाठी आवश्यक ते स्वास्थ्य मिळत नसल्यामुळे, कादंब-या ध्वनीफितीवर ऐकवून त्यांनी त्या पूर्ण केल्या. त्यामुळे कादंबरीच्या कथनातील प्रवाहीपणा व संवादातील स्वाभाविकपणा या प्रयोगामुळे साधला असे त्यांचे मत होते

मराठी वर्ल्ड डॉट कॉमने ना. सं. इनामदारांच्या नावे हा घातलेला ‘येळकोट’. माय मराठीच्या या जाणकार दर्दी आणि प्रतिभावान सुपुत्रास आमचा हा मानाचा मुजरा.