न्यूझीलंड – दक्षिण गोलार्धातील नंदनवन

new-zealand गेल्या काही वर्षात जागतिकीकरणानंतर एकूणच मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही विस्तारला. ‘वडिली जे निर्माण केले। ते पाहिले पाहिजे।’ सा समर्थवचनाला अनुसरून देश आणि जग पाहण्याची, त्यासाठी पर्यटन करण्याची, पैसे खर्च करण्याची मानसिकता झाली.

कल्याणी गाडगीळ या गेली अनेक वर्षे न्यूझालंडमध्ये वास्तव्याला असल्यामुळे त्यांनी लिहिलेले ‘न्यूझीलंड – दक्षिण गोलार्धातील नंदनवन’ हे पुस्तक सर्वार्थाने परिपूर्ण झाले आहे. एका अभ्यासकाच्या भूमिकेतून लिहिलेले हे पुस्तक आशयातील नेमकेपणामुळे पर्यटकांसाठी जसे उपयुक्त ठरणार आहे तसेच न्यूझीलंड हा देश जाणून घेण्यासाठी उत्सुक असणार्‍या चोखंदळ वाचकांसाठीही पर्वणी ठरणार आहे. अनेक संदर्भांनी समृध्द असणारे हे पुस्तक न्यूझीलंडची समग्र ओळख करून देणारे आहे.

या पुस्तकाचा वापर करून पर्यटकाला स्वतंत्रपणे हा देश कसा पाहता येईल यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन मौलिक आहे. न्यूझीलंडमधील कस्टमचे नियम, तिथल्या राहण्याच्या सोयी, तिथल्या राहण्याच्या सोयी, तिथला प्रातिनिधिक प्रवास आराखडा याविषयी केलेले लेखन बहुमोल आहे. या पुस्तकात त्यांनी न्यूझीलंड या देशाची माहिती दिली आहे. तिथल्या दैनंदिन जीवनातले विविध पैलू वाचकांसमोर ठेवले आहेत.

न्यूझीलंड हा जगातला सर्वात कमी भष्ट्राचार असणारा देश आहे. या देशात निर्सगाचा आदर केला जातो. प्राण्यांना सहेतूक त्रास देणार्‍यांना, छळणार्‍यांना किंवा त्यांना मारून टाकणार्‍यांना तुरूंगवासाची शिक्षा आणि दंड होतो. तेथे वाहतूक नियम काटेकोरपणे पाळले जातात. अधिकारी सौजन्याने वागतात. शब्द पाळण्यात सामान्य माणसे काटेकोर असतात. तिथे स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जाते. तिथली माणसे क्रीडाप्रेमी आहेत. त्यामुळे वृत्तीने खिलाडू आहेत. हे सारे वाचतांना नवल वाटते.

लेखिका कल्याणी गाडगीळ यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, त्यांचा दांडगा अभ्यास, व्यासंगीवृत्ती लेखनातली सहजताआणि नेमकेपणा, भाषेतला प्रवाहीपणा, वाचकांना समृध्द करणार्‍या संदर्भाची रेलचेल त्यामुळे हे पुस्तक हातातून सोडवत नाही. दक्षिण गोलार्धातील नंदनवनाची सफर अनुभवण्यासाठी वाचक या पुस्तकाचे निश्चित स्वागत करतील.

पुस्तकन्यूझीलंड – दक्षिण गोलार्धातील नंदनवन
लेखक – कल्याणी गाडगीळ
प्रकाशक – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत – रु २८०/-