नेटवरची मराठी साहित्य संपदा

मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे. १९व्या शतकापासून हिंदी, उर्दू आणि इंग्रजीशी देवाणघेवाण वाढल्यामुळे मराठी भाषाही बदलत गेली. तो प्रवाह आपल्याला मराठी साहित्यातही प्रतित झालेला आढळतो. अगदी ज्ञानेश्वरी पासून ते आताच्या नवोदीत लेखकांपर्यंत. आजच्या संगणक युगात मराठी नवीन तंत्रज्ञानाच्या बरोबरीने वाटचाल करते आहे त्यामुळे आजची पिढी ‘मिंग्लीश’ (मराठीत इंग्रजीची सरमिसळ) भाषा अधिक वापरते. इंटरनेटवर तरुणांचे ब्लॉग वाचल्यावर, त्यांचे संभाषण ऐकल्यावर आपल्याला हे लक्षात येते. गुगलवर मराठी साहित्याचा शोध घेतल्यास अनेक साईटस पुढे येतात. परंतु कसदार साहित्य पुरवणा-या साईटस किती आहेत ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

संत वाड्मय हा मराठी साहित्याचा प्राण आहे. ज्ञानेश्वरांनी जिच्या द्वारे अमृताशी पैजा जिंकायची भाषा केली अश्या आपल्या मराठीतले संत साहित्य नवीन पिढीसाठी इंटरनेटवर थोडेफार उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरांचे अभंग दुर्दैवाने नेटवर फारसे उपलब्ध नाही त्यातल्यात्यात http://www.marathiworld.com/abhanga/ साईटवर आपल्याला काही अभंग वाचायला मिळतात. संत तुकारामांना वाहिलेली साईट www.tukaram.com/ माहितीपूर्णतर आहेच परंतु इतर भारतीय आणि काही परदेशी भाषेतही वाचकांसाठी उपलब्ध आहे. तुकारामांबद्दल इतर माहिती बरोबरच त्यांची अभंगगाथा व त्यातले ४२०० श्लोक आपल्याला डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहेत.

काही मराठी साहितीकांच्या स्वतःच्या साईटस अतिशय माहितीपूर्ण आहेत. ज्येष्ठ लेखक जी ए कुलकर्णींची www.gakulkarni.info ही त्यातलीच एक. धारवाडसारख्या गावात राहूनही त्याकाळात जीएंचा इंग्रजी साहित्याचा व्यासंग मोठा होता. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल ते फारसे बोलत नसत परंतु त्यांच्या कथा अत्यंत तरल आणि मनाचा ठाव घेणा-या असत. त्यांच्या ‘काजळमाया’ ह्या कथा संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या काही गाजलेल्या ‘ऑर्फियस’, ‘स्वामी’, ‘भेट’, ‘विदूषक’ ह्या कथा आपल्याला वेबसाईटवर वाचायला मिळतात. ह्या साईटवर जीएंनी माधव आचवल, हतकंगलेकर ह्यांना लिहीलेली पत्रेही वाचायला मिळतात. जीएंच्या कथांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि कानडीत झाला आहे. त्याही लवकरच नेटवर उपलब्ध झाल्यातर आजच्या ग्लोबल पिढीला दर्जेदार साहित्य वाचनाचा आनंद मिळेल.

प्रख्यात लेखक गो.नि.दांडेकर अर्थात महाराष्ट्राचे लाडके ‘आप्पा’ आपल्याला भेटतात www.goneeda.com वर. ह्या साईटवर गोनिदांचा जीवन प्रवास वाचायला मिळतो तसेच त्यांची संपूर्ण साहित्यसपंदा सुची पुस्तकांच्या मुखपृष्ठासह वाचायला मिळते. गोनिदांना फिरणे, फोटोग्राफी, गडावर चढायला जाणे असे विविध छंद होते. त्याबद्दलचे लेख, छायाचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला साईटवर गोनिदांची काही भाषणे, मुलाखती त्यांच्याच आवाजात ऎकायला मिळतात. साईटच्या निमित्ताने गोनिदा नवीन पिढीतही स्मरले जातील ह्यात शंकाच नाही.

गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा हे कथा लेखक, कांदबरीकार, पटकथा, कविता, गाणी आणि संवाद लेखक म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच मराठी साहित्यात नावाजले गेले. http://www.gadima.com ही त्यांना वाहिलेली साईट माहितीपूर्ण आणि फ्लॅश तंत्र वापरुन केलेली आहे. त्यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ पासून ते अगदी ‘रामा रघूनंदना’ पर्यंत भावगीते, भक्तीगीते, बालगीते, लावण्या तसेच गीतरामायणातली गीते आपल्याला ऐकायला मिळतात. मात्र ‘आधुनिक वाल्मिकींच्या’ साईटवरुन मुशाफिरी करतांना साईटचे ‘नॅव्हीगेशन’ आणि रंगसंगती अधिक ‘प्रोफेशनल’ हवी होती असे प्रकर्षाने वाटत राहते.

गदिमांसारखा थोरला भाऊ असून सुध्दा स्वतःची वेगळी ओळख व्यकंटेश माडगूळकरांनी निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या लाडक्या तात्यांनी ‘माणदेशची माणसं’, ‘बनगरवाडी’, ‘वावटळ’ अश्या कादंब-यांनी आणि इतर अनेक कथा, निबंधांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले. वाचना बरोबरच त्यांची स्वतः काढलेली चित्रे पाहणे ही सुध्दा ही कलाप्रेमींना मेजवानीच आहे. ही मेजवानी चाखायची असल्यास www.tatya.org ह्या अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय साईटला भेट द्यायला हवी. साईट इंग्रजीत असून अत्यंत नेटकी डिझाईन केली आहे. साईटवर आपल्याला त्यांच्या काही लघूकथा, निबंध, आणि कादंब-यांचे इंग्रजी अनुवाद वाचायला मिळतात. हे अनुवाद अतिशय दर्जेदार असून नवीन पिढीलाही खिळवून ठेवतील असे आहेत. ‘इमेज गॅलरीत’ त्यांची चित्रे आपल्याला पाहायला मिळतात.

महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडे आपल्या अनेक साईटस, ब्लॉग्स आणि ‘फॉरवड मेल्स’ मधून सतत भेटतात. http://www.puladeshpande.net/ ह्या साईटवर आपल्याला पुलंचे लेख, भाषणे आणि त्यांच्या साहित्य वाचनाचा आनंद आपल्याला घेता येतो. ह्या साईटच्या http://www.puladeshpande.net/abhyas.php ह्या लिंकवर पुलंनी ‘अभ्यास एक छंद!’ हे रेडिओवरचे भाषण वाचायला मिळते. भाषण पूर्वी केलेले असले तरी आजच्या पिढीलाही ते अचूक लागू होते. पुल विद्यार्थांना म्हणतात , ” परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरु होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खुप हौसेनं देतो आहे, अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरु होणार नाही. ” पुलंचे किस्से आणि विनोदही पुढील ब्लॉग्स आणि साईटवर आपल्याला वाचायला मिळतात –
www.geocities.com/artononline/vinod.htm ,

काही रसिकांनी पुलंच्या ऑडीओ आणि व्हिडीओ फाईल्सही नेटवर उपलब्ध करुन दिल्या आहेत
https://www.youtube.com/watch?पु. ल. देशपांडे कथाकथन,
www.metacafe.com/watch/606234/,
http://www.geocities.com/pldeshpande/

कुसूमाग्रजांचे साहित्य आपल्याला विविध साईटसअवर वाचायला मिळते. कुसूमाग्रज प्रतिष्ठानच्या www.kusumagraj.org ह्या साईटवर कुसूमाग्रजांचे विशेष साहित्य उपलब्ध नाही. कुसूमाग्रजांना श्रध्दांजली म्हणून त्यांचे साहित्य, गीते अनेक साईटसवर आणि ब्लॉग्सवर आपल्याला तुकडया तुकडयात वाचायला मिळते. http://www.geetmanjusha.com/marathi/lyricswriter/49.html,
www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Kusumagraj.htm, www.kusumaavali.org, www.blogadda.com/tags/kusumagraj/, musicandnoise.blogspot.com/2007/08/making-of-chaphyache-shimpan_2391.html

चार दिवस प्रेमाचे, घर तिघांच, जावई माझा भला, निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या-गलबत्या… ही यादी लांबणारीच आहे. ह्या सर्व नाटकांमागे असलेला समान धागा रत्नाकर मतकरी आपल्याला भेटतात http://www.ratnakarmatkari.com/index.asp ह्या त्यांच्या साईटवर. साईटवर आपल्याला त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक, चित्रकार म्हणूनही ओळख होते. शांता शेळके, विजय तेंडूलकर, पुल देशपांडे ह्यांनी मतकरींची करुन दिलेली ओळखही वाचनीय आहे. मतकरींची चित्रे असणारे ‘कमल नमन कर’ हे लहान मुलांचे पुस्तक त्यांनी डाऊनलोडसाठीही उपलब्ध करुन दिले आहे. काळया पार्श्वभूमीवर असणारी ही साईट अत्यंत आकर्षक दिसते.

मराठी साहित्य संपदा समृध्द असूनही इंटरनेटवर सर्फ करतांना गत काळातल्या ज्येष्ठ लेखकांचे साहित्य फारसे उपलब्ध नाही. नवीन पिढीसाठी काही अंशी तरी उपलब्ध व्हावे असे प्रकर्षाने वाटते. ह्यातल्या ब-याच लेखकांची माहिती आपल्याला विकीपिडीया साईटवर वाचायला मिळते परंतु त्यांचे साहित्य उपलब्ध नाही. साहित्या बरोबरच मराठी विश्वकोषही ऑनलाईन उपलब्ध झाल्यास मराठीचा अचूक वापर नवीन पिढीला करण्यास सोयीचे होईल. आजच्या नवीन साहितीकांच्याही विशेष साईट्स नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. मराठी साहित्याचा सर्च केल्यावर प्रेमकविता, मैत्री, विरह, लग्न अश्या विषयात अडकलेले ब्लॉग्स, डिस्कशन बोर्डस, मेल्स वाचायचा उबग येतो. अश्या परिस्थितीत दर्जेदार आणि शाश्वत असे साहित्य उपलब्ध करुन देणा-या साईट्सकडे चोखंदळ वाचकांचे डोळे लागलेले आहेत.

– भाग्यश्री केंगे