माणूस वाचतांना

मृणाल मराठे आणि माझी ओळख जवळजवळ २५ वर्षांपासूनची आहे. रोज न भेटता ही ऋणानुबंध जुळले ते आमच्या दोघींच्या सामाजिक कामाबद्दलच्या बांधिलकीमुळे. मृणाल शांत, संयमी, समजूतदार अशी गुणी समुपदेशक कार्यकर्ती आहे. आम्ही रोज भेटणं नाही, एकमेकींना मेसेजेस करत नाही तरीही आपलेपणा वाटतं राहातो हीच मृणालची खरी ओळख. सहजपणे माणसे जोडत रहाणे हाच तिचा स्वभाव आहे. तिच्या कामाबद्दल मला नेहमीच आदर आणि उत्सुकता असते. तिच्या सामाजिक कामाच्या प्रवासात आलेल्या कामावर आधारित कथा लिहिल्या आहेत. मृणालने तिच्या डोळस नजरेने टिपलेले समाजातील वास्तव, त्यावरची तिची मते, विचार, अनुभव याकथासंग्रहाच्या रूपाने सर्वां समोर येत आहेत. ह्याचा मला तिच्या इतकाच आनंद होत आहे.

या कथासंग्रहात, कुमारीमाता, प्रौढकुमारिका, घटस्फोटित अशा विविध टप्प्यातील स्त्रियांच्या कहाण्या आहेत. तसेच आपले मूल दत्तक देण्यासाठी संस्थेत जाणारी आई आहे. मूल हरवल्याने कासावीस होणारी आई आहे, मोठ्या वयात दत्तक जाताना मुलाच्या मनाची भांबावलेली अवस्था आहे. दत्तक गेलेल्या मुलीला आपल्या स्वओळखीचे पडलेले प्रश्न आहेत. एकाच प्रश्नाचे किती पैलू असतात हे या कथांमधून आपल्यासमोर येते. कॅन्सर हॉस्पिटल, किंवा बालभावनसारख्या वास्तूंमध्ये किती कहाण्या दडल्या आहेत ह्याचीही जाणीव होते.

प्रवास या कथेत गरिबीमुळे कुटुंबाची जवाबदारी अंगावर आलेल्या, कल्पनेतला संसार आणि काल्पनिक गरोदरपणात चोरटे सुख शोधणाऱ्या, अर्धवट विणलेला मोजा पुन्हापुन्हा उसवत – विणणाऱ्या प्रौढकुमारिकेची करुण कहाणी आहे. ‘स्वयंसिद्धा ‘ या कथेमध्ये मूल न झाल्याने घटस्फोट दिल्यावर स्वतःच्या पायावर उभी रहाते. येथे लहान मुलांच्या सामाजिक संस्थेत काम करत वेगळ्या प्रकारचे मातृत्व निभावते. ‘आई’ या कथेमध्ये अर्धवट वयात आंधळेपणाने प्रेमात पडून नंतर गरोदर राहिल्यावर ते मूल दत्तक देण्यासाठी संस्थेत येतांना कुमारी मातेच्या मनाची तगमग आपल्याला अंतर्मुख करते. ‘आशा’ या कथेमध्ये साडेचारवर्षांचा मुलगा हरवून अनेक वर्ष झाली तरीही तो कधीतरी सापडेल ह्या आशेवर जगणारी आशावादी आई आपल्याला हळवं करून जाते.

‘माणूसवाचताना’ या कथेमध्ये रेल्वे प्रवासात पाच वर्षांच्या बबलूचा आणि आईचा हात सुटल्यानंतर (कि सोडल्यानंतर) अनेक महिने संस्थेत राहून दत्तक जातांना बबलूच्या मनातल्या भावना वाचतांना आपलंही मन हेलावून जाते. ‘नाळ’ या कथेतील लहान वयातच दत्तक गेलेली मिता वैद्यकीय शिक्षण घेत असते. दत्तक आई-वडील आणि नातेवाईक सगळ्यांचीच लाडकी असते. वेगवेगळ्या वयात आपल्या दत्तक असण्याबद्दल तिला प्रश्न पडत असतात. त्यातलाच एक प्रश्न तिला अस्वस्थ करत असतो. “मी कोणासारखी आहे?” जन्मदात्यांकडून रंगरूप मिळते पण आपल्या व्यक्तिमत्वावर दत्तक आईबाबांच्या संस्कारांचा प्रभाव आहे, आपण त्यांचे गुण घेतले आहेत, आपण त्यांच्यासारखे आहोत ह्याची अनुभूती आलेल्या मिताला एक परिपूर्ण ओळख मिळाल्याची जाणीव होते. दत्तक कुटुंबातल्या मुलांच्या अशा भावनिक आंदोलनांना लेखिकेने अतिशय संवेदनशीलतेने आणि सक्षमतेने हाताळले आहे.

प्रत्येक कथेतल्या व्यक्तीशी लेखिकेचा जवळून संबंध आला असावा असे वाटले. सर्व कथा वाचतांना असे जाणवते कि, लेखिकेने आपले विचार अत्यंत समतोल पद्धतीने व संयतपणे मांडले आहेत. अशा अनेक कहाण्या वाचतांना आपण त्यात गुंगून जातो आणि आपलंही वैचारिक जग विस्तारत जाते.

मृणाल मराठे ह्या माझ्या लेखिका मैत्रिणीला पुढील प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा

वर्षा पवार-तावडे
समुपदेशक

पुस्तक प्रतीसाठी mrunals_17@yahoo.co.in येथे संपर्क करा