शितपेये


कोकमाचे टिकाऊ सरबत

kokam sharbat साहित्य – १ किलो कोकम, चविनुसार मीठ, दोन फुलपात्री भरून साखर.

कृती – कोकमाची वरची साले बारीक चिरून घ्यावीत. त्यात साखर व मीठ घालून ठेवावे. या मिश्रणाला १-२ दिवसात खूप रस सुटेल, तो गाळून घ्यावा. गाळलेला रस बरणीमध्ये भरून ठेवावा. सरबत प्यायला देताना ग्लासभर थंड पाण्यात ४-५ चमचे गाळलेला कोकमाचा रस घालून, थोडेसे मीठ घालून ढवळून व बर्फ घालून सरबत द्यावे.

तात्पुरते कोकम सरबत

साहित्य – ताजी कोकमफळे, चवीनुसार मीठ, साखर, जिरेपूड.

कृती – कोकमे स्वच्छ धुवून फोडावीत व आतला गर काढून पाण्यात टाकावा. गर चांगला कुस्करून घ्यावा, नंतर त्यात चवीनुसार साखर, मीठ व जिरेपूड घालावी. साखर विरघळली की पाणी गाळून घ्यावे नंतर त्यात बर्फ घालून सरबत पिण्यास द्यावे.

कलिंगडाचे सरबत

kalingad sarbat साहित्य – १ मध्यम आकाराचे लाल कलिंगड, १ पॅक व्हॅनिला आईस्क्रिम, २-३ चमचे रोझ सिरप.

कृती – कलिंगडाच्या बिया काढून त्याचे तुकडे करावेत (फक्त लाल भागाचे) नंतर ते मिक्सरमधून काढावेत व त्याचा छानसा रस गाळून घ्यावा. त्यात आईस्क्रिम घालून ठेवावे. रस छान गोड नसेल तर त्यात रोझ सिरप घालावे. हे सिरप फक्त गोडव्यासाठी व रंगासाठी वापरावे. जास्त घालू नये, कलिंगडाच्या चवीला ते मारक ठरू नये, इतकेच घालावे. लोकांना देतांना नीट ढवळून द्यावे. आईस्क्रिम व कलिंगडाचा रस एकजीव करून मग ते प्रत्येकाला द्यावे.

कैरीचे पन्हे

kairi panhe साहित्य – ४-५ मोठया कैर्‍या, चवीनुसार मीठ, ५ वाटया गूळ, वेलचीपूड.

कृती – कैरीची साले काढून फोडी कराव्यात, त्या कुकरमध्ये स्टीलच्या भांडयात ठेवून वाफवून घ्याव्यात. नंतर ह्या फोडी पुरणयंत्रातून किंवा गाळण्यातून गाळून घ्याव्यात, त्यात मीठ व गूळ घालून मिश्रण सारखे करावे. वेलचीपूड घालावी, पन्ह्याचा गर आता आता तयार झाला. प्यायला देतेवेळी ४-५ गर घेऊन त्यात थंडगार पाणी घालून, व चवीपूरते मीठ घालून सर्व नीट हलवून द्यावे.

कच्च्या कैरीचे पन्हे

साहित्य – ४-५ मोठया कैर्‍या, चवीनुसार मीठ, ३ वाटया साखर, वेलचीपूड.

कृती – कैर्‍यांची साले काढून त्या स्टीनलेसस्टीलच्या किसणीवर किसून घ्याव्यात. नंतर थंडगार पाण्यात हा कीस टाकून, कुस्करून घ्यावा म्हणजे कैरीचा आंबटपणा पाण्यात उतरतो. त्यात अंदाजे मीठ व साखर घालावी व साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळावे. नंतर गाळण्यातून गाळून घ्यावे व वेलचीपूड टाकून पिण्यास द्यावे.

टीप – कैर्‍यांचा आंबटपणा कैरीच्या जातीवर अवलंबून असतो. त्यानुसार साखरेचे प्रमाण बदलावे लागेल.

थंडाई

thundai साहित्य – १०० ग्रॅम खसखस, २०० ग्रॅम बदाम, १ चमचा बडीशेप, २ चहाचे चमचे सुंटपूड, १ चहाचा चमचा मिरपूड, २५० ग्रॅम साखर, १ लिटर दूध. १ लिटर थंड पाणी, वेलचीपूड, १०० ग्रॅम संकलेल्या गुलाबपाकळया.

कृती – बदाम, बडीशेप, खसखस, मिरपूड, गुलाबपाकळया, सुंठ, साखर व वेलचीपूड हे सर्व जिन्नस पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. थंडाई करतेवेळी दूध व पाणी समप्रमाणात घेऊन त्यात साखर विरघळून घ्यावी. चार-पाच चमचे थंडाई घालून सारखे करून पिण्यास द्यावे.