काव्यसुमने

kavyasumane काव्यसुमने हा विविध प्रकारच्या रंगांच्या आणि गंधांच्या सुमनांचा काव्यगुच्छ आहे.
अशोक बा. दातार यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहात ८६ कविता आहेत. गझल, भावगीते, कणिका असे विविध रचना प्रकार कवीने हाताळले आहेत. निसर्ग हा कवि मनाला उस्फुर्त करणारा विषय आहे. रिमझिमणारा घन कवीचे मन हिरवळून टाकतो. त्याच वेळी दूरस्थ प्रिय व्यक्तीच्या स्मृतीने मन गलबलून जाते. नभ गरजे, पाऊस पडे, अषाढाचा ओघ, आली वर्षा राणी, वर्षागीत, इ. कवितांतून सृष्टीत दाटलेल्या आनंदाचे, हुरहुरीचे, सृष्टीच्या यौवनाचे मनात झुलते गात शब्दबध्द झाले आहे. गेयता हा या कवितांचा विशेष आहे.

मायभूमी ही वीरभूमी, तीची थोर संस्कृती, तिच्यासाठी प्राणार्पण करणारे वीराग्रणी, पावन जावनगाथा असलेले संतसज्जन इ. विषय कविमनाला लय तालबध्दतेने, उस्फूर्ततेने गायला लावणारे विषय आहेत. देवभूमी रक्षूया, गौरवगान, अमुचा मंगल देश ह्या कविता उत्तरसीमेवरील वास्तवाच्या काळात कवीला स्फुरलेल्या दिसतात.

धर्म-समाज हे कवीच्या चिंतनाचे विषय आहेत. परंतु कवि रूढ धर्मसंकल्पनांच्या आहारी गेलेला नाही. राष्ट्रवंदन, मातृवंदन हा कवीचा धर्म आहे. विश्व हा त्यांचा परिवार आहे. मनात साऱ्या विश्वाविषयी मंगल भावना हीच कवीची धार्मिकता आहे. माणुसकी, उदारता, सर्वसमभाव, शांती ही कवी स्वप्नशिल्पे आहेत. निराश्रित, तृषित, उपेक्षित हे त्याच्या सह-अनुभूतीचे विषय आहेत. आजच्या तिमिरातूनच उद्याच्या स्वप्नांची पहाट फुलेल हा कवीचा आशावद आहे. चराचरावर ईशकृपा व्हावी, भक्ती रुजून ही अवनी सुंदर व्हावी, अशी कवीच्या श्रध्दायुक्त मनाची पंढरीनाथाजवळ मागणी आहे. सारे वर्णभेद, वर्गभेद, जातिभेद नष्ट होऊन गीतेत माधवाने सांगितलेल्या उपदेशाची प्रतीती यावी, ही कवीची उत्कट इच्छा आहे. तीर्थ क्षेत्र भ्रष्ट करणाऱ्या दांभिक कर्मठांना कवि आव्हान देतो. देवदर्शनाचा लिलाव मांडणाऱ्या धर्मवेडया संधीसाधूंना, खोटे अध्यात्म करणाऱ्या आणि दुबळयांच्या दुर्बलतेचा फायदा घेणाऱ्या दांभिकांच्या लबाडीचा कवीने यथायोग्य समाचार घेतला आहे. दानवदलविनाशिनी, सिंहवाहिनी, प्रज्ञारूप देवीमातेजवळ समस्यांनी मन चिंतीत झालेले असताना जीवनाच्या लढयासाठी शक्तीची मागणी करणारे कविमन सत्य संकल्प सुटू न देण्याचीही विनंती करताना दिसते. त्याहीपुढे जाऊन त्या रहस्मयी, दिव्य आंतरिक प्रेरणा, अंतश्चेतना जागृत होण्याची तीव्र इच्छा व्यक्त करते.
प्रेमनिराशा, जगाच्या विपरीत रीत, उपेक्षा, अपेक्षाभंग, अपयश अशा कितीतरी वेदनादायक अनुभवांनी आयुष्य अवघड होते. उलगडायला कठीण होते. भग्न मनोरथांची मालिका आयुष्याचा डाव उधळून लावते. या साऱ्या व्यापक, क्लेषदायक अनुभवांची स्पंदने कविमनात उमटतात, कधी हादरवून टाकतात. ‘वेढून वादकाने आयुष्य नाव माझी#मुदार्ड माणसांनी काढून शीड नेले, ज्योतीस फुंकरीने विझवून सर्व गेले’ असा कटू अनुभव माणसामाणसातल्या नातेसंबंधाची कठोर वास्तवता सांगून जातो. ‘जगता जगता मरायचे, मरता मरता जगायचे, मरून पुन्हा जगायचे असते ‘ अशी जीवनरीती कवि मनाला शिकवत राहतो. ‘यावेस’, ‘प्रीत’, ‘चाहूल’, ‘फितूर’, ‘विरह’, ‘हलकेच’, ‘प्रतारणा’, ‘अतूट नाती’ अशा भावगीतांमधून कवीने कधी अस्वस्थ, अपूर्ण, खिन्न, तर कधी हुरहुरीने बेचैन झालेल्या मनाचे, त्यातील भावरंगांचे काव्यमय वर्णन केले आहे. येथे ‘गझल’ या काव्य प्रकाराचा कवीने आधार घेतला आहे. दोन दोन पंक्तींच्या काव्य खंडातून, भावनांची अभिव्यक्ती करताना त्यात सहजपणे गेयता आली आहे. ‘विरहार्तता’, ‘जीवनाच्या निखळ सत्यांचा दाहक अनुभव’, ‘कधी न शांत होणारी दाहकता’, गझलच्या अंतरंगाची खोली वाढवितांत. ‘चटका लावून जाणारा अनुभव’ तितक्याच दाहक शब्दात मांडणे ही एक किमया आहे. वैयक्तिक लौकिक प्रेमापासून निराकाराच्या जन्मजन्मांतरीच्या उत्कट प्रेमापर्यंत गझलचा दीर्घ प्रवास आहे. कविमन हया क्षेत्राची मुशाफरी यापुढे अधिक प्रगल्भतेने करेल, अशा खुणा कवितांमधून सांपडतात.

अजून मजला आयुष्याचे। कोडे पुरते उलगले नाही।
अजून मजला जगण्यामागे। अर्थ पुरेसे कळले नाही।
या पंक्तीत व्यक्त झालेली बोच यथार्थ आहे. जीवनाचा शोध संपणारा नाही. रत्नाकराच्या उदरातील रत्नांसारखी जीवनाची माणिक मोती शोधताना, आशा निराशेच्या हिंदोल्यावर झुलताना कधी गवसल्याचे सुख तर कधी हरवल्याचे दु:ख अनुभवताना, कवीला अजून प्रदीर्घ प्रवास करायचा आहे. नवनव्या जीवन पडसादांतून अंतीम सत्याचे सूर शोधायचे आहेत.

प्रत्येक मराठी काव्य रसिकाने संग्रही ठेवण्यासारखा हा काव्यसंग्रह आहे यात शंका नाही.

पुस्तककाव्यसुमने
लेखक – अशोक बा. दातार
प्रकाशक – घरकुल प्रकाशन
किंमत – रु. १०० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.