एक शून्य शून्य

जादू बंगालीबाबांची!

जादू बंगालीबाबांची! (भाग १)
गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून, दहा पोलीसांच्या मदतीने पो.ठाणे हद्दीत घडणारे खून, खूनाचे प्रयत्न, दरोडे, जबरी चो-या, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणे हे माझ्यावर सोपविलेले विशेष काम होते. त्या दिवशी सकाळी मी न्यायालयांत सादर करण्याच्या अहवालाचे काम करीत असतांना मला वरिष्ठ पो. निरीक्षकांनी बोलावले. मी त्यांच्यासमोर बसताच त्यांनी बोलायला सुरूवात केली. ”सहाय्यक आयुक्तांच्या, परिचयाच्या एका डॉक्टर महिलेला काही त्रास झाला आहे व प्रकरण अतिशय नाजूक हाताळणे आवश्यक आहे. ते एखाद्या विशेष अधिका-याच्या हातांत सोपवावे. बाकी माहिती त्या डॉक्टर स्वत:च देतील. तेव्हा तू त्यांना भेटून पुढील आवश्यक ती कारवाई कर”. थोडयाच वेळात डॉक्टर मॅडम आल्यावर, वरिष्ठ निरीक्षकांनी मला बोलावले.

प्राथमिक परिचयानंतर सदर डॉक्टर महिलेने अतिशय अडखळत पतीकडे कटाक्ष टाकीत निवेदनाला सुरूवात केली. ”मी ठाण्यात वैद्यकीय व्यवसाय करते. एका परिचित महिलेकडून, सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तू खरेदी करीत असे. कारण तिच्याकडे परदेशी वस्तू सहजपणे उपलब्ध होत असत. बिलाबद्दल विचारले असता, बेफिकीरीने नंतर हिशोब करू असे म्हणत. एकदा मी बीलाबद्दल फारच आग्रह धरल्यावर, त्यांनी जी रक्कम सांगितली तेव्हा मला माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पंरतू त्या वस्तू वापरायला सुरूवात केली असल्याने मला त्या महिलेने सांगितलेली रक्कम देण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. संध्याकाळी पतीनेही ”तुझ्यासारख्या सुक्षिशित बाईने तरी फसवले जायला नको होते”. असे म्हटल्यावर अधिकच मन:स्ताप झाला!

दुस-या दिवशी पती व्यवसायानिमित्त व मुलगा बालवाडीत गेल्यावर अस्वस्थपणे त्यांनी स्थानिक वृत्तपत्र चाळायला सुरूवात केली. अचानक त्यांची नजर एका जाहिरातीवर खिळली. बाबा नवरत्न बंगाली ह्या तांत्रिकाची जाहिरात त्यांना विचारात पाडून गेली. एकतर्फी प्रेम साकार होण्यासाठी, फसवणूक झाल्यावर नुकसान भरून काढण्यासाठी आणि अशा अनेक कारणांसाठी बाबाची बंगाली जादू ‘अक्सिर इलाज’ ठरणार होती. प्रचिती न आल्यास पैसे परत देण्याची हमी दिली होती. त्यांनी लगेच फोनवर संपर्क साधला. बाबांनी त्यांच्या फसवणूकीची माहिती घेतली. फसवणूक झालेली रक्कम रू १०,०००/ च्या घरात असल्याचे समजल्यानंतर बाबांनी सांगितले की केवळ एक पूजा करावी लागेल. फसवणूक करणारी व्यक्ती आपणहून जास्त घेतलेली रक्कम परत करेल. पूजेला साधारण रू.१२००/- खर्च येईल.

डॉक्टर मॅडमनी रू.१२००/- देऊन पूजा करून घ्यायचे ठरविले आणि बाबांच्या ऑफिसमध्ये रक्कम जमा केली. संपर्कासाठी आपला नंबर दिला. तिस-या दिवशी फोन आला. थोडयाशा भेदरलेल्या बाबांनी सांगितले की त्यांनी नियोजित पूजा केली. परंतू समोरची व्यक्ती कल्पनेपेक्षा जास्त प्रभावी असल्याने, त्यांची पूजा त्यांच्यावरच उलटली आहे. तेव्हा कार्यालयात येऊन भेटावे.

उलटलेल्या जादूचा मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्यावर काही परिणाम होणार आहे हे पडताळण्यासाठी, कागदात थोडे तांदूळ बांधून पुडी दिली व ती कपाटात उघडयावर ठेवावी. दोन दिवसानंतर ती पहावी. मधेच उघडू नये असे सांगितले. दोन दिवसानंतर पुडीचा कागद करपलेला आढळल्यावर, डॉक्टर हादरल्या व त्यांनी बाबांकडे धाव घेतली. बाबा विचारात पडला व त्याने आणखी एक पूजा करायला सांगितली. त्यासाठी लागणारी रू २०५०/- ची रक्कम निमूटपणे समोर ठेवली. पंरतु दुस-या दिवशी बाबांनी मॅडमना समोर बसवले. कार्यालयातील मुख्य दिवा बंद करून एक लाल दिवा लावला.

जमिनीवर काही आकृती काढून, त्यात एक गोल तळाचे छोटे मडके ठेवले व पूजा सुरू झाली. पूजेनंतर त्यांनी डॉक्टर मॅडमना सांगितले की त्यांच्या कुटूंबामागे लागलेल्या वाईट शक्ती त्या मडक्यात एकत्रित झाल्या आहेत. त्यांना काही प्रश्न विचारावे. होकारार्थी उत्तरासाठी मडके हलेल व नकारार्थी उत्तरासाठी स्थिर राहील.

”माझ्या कुटुंबियांना काही त्रास आहे का?” मॅडमने विचारले आणि तत्काळ मडके हलू लागले. ”तुम्ही शांत रहावे. मी तुम्हाला कळकळीची विनंती केल्यास तुम्ही मान्य कराल कां?” मडके स्थिर राहीले. ”यावर काही उपाय आहे कां?” प्रश्नासरशी मडके हलू लागले. त्यावर बाबांचा चेहरा उजळला व त्यांनी मॅडमना धीर दिला व तिस-या पूजेचा उपाय सूचवला. मात्र त्यासाठी खर्च रू.५०००/- येणार होता.

ह्यानंतर त्याच स्वरूपाच्या घटना होत राहिल्या, मॅडम पूजांसाठी पैसे खर्च करीत राहिल्या. बाबांनी दिलेल्या ताकीदीप्रमाणे डॉक्टर ज्यांना ह्या प्रकाराबद्दल सांगतील ती व्यक्ती मरणार असल्याने त्यांना ह्याबाबत पतीलाही सांगण्याची हिमंत होत नव्हती. अशाच एका प्रसंगी आपल्या छोटया मुलाला तर काही त्रास होणार नाही ना ह्या शंकेने भेडसावल्यावर बाबांच्या आसनाजवळील काळया कापडाची बाहुली नाचून, त्यांना मुलाची शाश्वती नसल्याची प्रचिती देऊन गेली. त्या दिवशी प्रथमच मॅडमनी, पतीच्या कपाटात व्यापाराच्या व्यवहारासाठी ठेवलेली रक्कम बाबांकडे सुपूर्द केली! त्यानंतर एकदा बाबांनी मॅडम पुढे पूजा करतांना हवेत हात फिरवून मॅडमच्या भोवती घोटाळणा-या शक्तींना दूर ढकलले व पार्टीशनच्या दारावर कोणीतरी आपटल्याचा आवाज झाला. त्या दिवशी घरातील दागिने गहाण ठेवण्यास सुरूवात केली.

अशाच एका दिवशी बाबा नवरत्न बंगालीने, त्यांच्या कार्यालयात आलेले दुसरे गुरू बाबा मलीकजी ह्यांची ओळख करून देऊन ते महाज्ञानी असल्याचे व त्यांचे कार्यालय सायन येथे असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात घरातील पैसे व दागिने नाहिसे होत असल्याने चिंतातूर झालेल्या पतीने, पोलिसांत तक्रार करायला पत्नी विरोध करते त्यामुळे पत्नीवरच संशय घेण्यास सुरूवात केली. शेवटी एक दिवस पत्नीच्या माहेरी चुनाभट्टी येथे तिला नेऊन सोडले व पैसे आणि दागिने ह्यांचे काय झाले हे सांगितल्याशिवाय घरी न येण्याची ताकीद दिली….

जादू बंगालीबाबांची! (भाग २)
अचानक मॅडमना सायन येथील बाबा मलीकजींची आठवण झाली. त्या बाबांच्या कार्यालयात गेल्या. मलीकजींनी ध्यानधारणेनंतर त्यांच्या पतीच्या मनावर वाईट शक्तींनी कब्जा केल्याचे सांगितले व पुन्हा एक पूजा करण्यास सांगितले. खर्च केवळ रू. १०००/- असल्याने ती पूजाही पार पडली. परंतू त्याचा काही परिणाम दिसेना. एका भेटीत मलिकजींनी वाईट शक्तींना थोपविण्यास हवेत हात उभा धरला तेंव्हा त्यांच्या हातावर रक्ताच्या दोन रेषा दिसल्या. त्या दिवशी पूजेसाठी बाबांनी रू. ४०,०००/- ची मागणी केली. हिरमुसल्या होऊन मॅडम परतल्या. निघतांना बाबांनी त्यांना घरातील व्यक्तींना जपण्याचा सल्ला दिला व सर्वांनाच धोका असल्याचे सांगितले. रू. ४०,०००/- ची व्यवस्था कशी करावी हयाच विवंचनेत मॅडम घरी पोहोचल्या.

विवाहीत मुलीला जावयाने घरी आणून सोडल्याने व धाकटी मुलगी लग्नाची असल्याने, सेवानिवृत्त शिक्षक असलेले मॅडमचे वडील त्याकाळात सतत विवंचनेत असत. दोन दिवसांनंतर ते असेच विचारमग्न अवस्थेत चालत असतांना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व रूग्णालयात नेईपर्यंत त्यांचा अंत झाला. मॅडमना बाबा मलीकजींनी दिलेला सावधानतेचा इशारा आठवला. त्यांनी बाबांना फोन केला असतांना, बाबांनी वडीलांच्या मृत्यूबाबत, मॅडमनाच दोष देऊन यानंतर त्यांच्या मुलाचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवली. ते ऐकल्यावर मात्र मॅडमचा धीर सुटला. त्यांना, त्यांच्या एका मैत्रिणीचे वडील सहाय्यक आयुक्त असल्याचे आठवले. लागलीच त्या त्यांच्या मैत्रिणीकडे पोहोचल्या. तेव्हा त्यांना धारावी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला मिळाला.

ही सर्व चित्तथरारक हकीगत ऐकल्यावर, मी पुढील कामांची मनाशीच आखणी करून मॅडमना फिर्याद देण्याबद्दल सुचवले. परंतु त्या स्थितीत मॅडमच्या मनाची तयारी होईना. तेव्हा त्या समस्येचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन फिर्याद दिल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही असे मॅडमना समजावून सांगितले व त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. बाबा मलीकजींशी फोनवरून संपर्क साधून पैशांची व्यवस्था झाल्याचे सांगण्यास मॅडमना सांगताच, बाबांनी ”मॅडमच्या मागे लागलेल्या, सर्व शक्ती, त्यांच्या खोलीत एकवटलेल्या आहेत व मॅडमनी दरवाजा उघडताच त्या त्यांच्यावर झडप घालतील” असे सांगून सायन स्टेशनच्या बुकींग ऑफिसजवळ त्यांचा सहाय्यक पाठवतील त्याच्याकडे पैसे द्यावे असे सांगितले.

त्यानंतर मी रू. १०० च्या नोटांच्या आकाराच्या को-या कागदाची बंडले, बाजूच्या प्रेसमधून कटिंग करून घेऊन, त्या बंडलांच्या वर व खाली रू.१०० च्या ख-या नोटा लावल्या. दोन साक्षीदारांना बोलावून नोटांच्या खालच्या कागदावर त्यांच्या सहया घेतल्या व अशी चार बंडले तयार केली व ती एका प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून साक्षीदारांसमक्ष मॅडमकडे सोपविली. त्यानंतर मॅडम पुढे व त्यांच्या आजूबाजूला मी व माझा स्टाफ, साध्या कपडयात, आणि दोन साक्षीदारांना घेऊन सायन स्टेशन परिसरात पोहोचलो आणि मॅडमकडून पैशांचे बंडल घेणा-या बाबांच्या सहाय्यकास ताब्यात घेतले.

तेथून आमचा लवाजमा बाबांच्या कार्यालयात पोहोचला. बाबा मलीकजी आणि त्यांच्या सोबत असणारा त्यांचा साथीदार व ठाण्यामध्ये मॅडमकडून तब्बल रू.९६,०००/- उकळणारा बाबा नवरत्न बंगाली ह्यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या ऑफिसची झडती घेतली असता बाबांच्या व्यवसायाची आयुधे सापडली. बाबा बंगालीचा धुर्तपणाचे व नागरिकांच्या अंधश्रध्दाळूपणाचे नवल आणि दु:ख वाटले. त्या सर्व साहित्याचा वापर कसा केला जातो हे बाबांच्या तोंडून ऐकल्यावर फिर्यादी डॉक्टर मॅडमही हतबध्द झाल्या होत्या.

सदर तीन आरोपींच्या जबाबातून उघड झालेली माहिती मी थोडक्यात वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.
१. त्यावेळी ह्या बाबा बंगालीसारखे २१ बाबा मुंबईत धंदा करीत होते.

२. ह्यांच्यापैकी कोणीही बंगालशी संबंधित नाहीत हे सर्व मेरठ आणि आजूबाजूच्या गावांमधील आहेत व त्यांचे एकमेकांबरोबर लागेबांधे असतात.

३. प्रत्येक बाबा गावी गेला की गावातील उनाड नातेवाईक मुलांना मुंबईत आणतो. काही दिवस बाबाकडे उमेदवारी केल्यावर तो स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतो.

४. त्यांना रसायन शास्त्राचे जुजबी ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे कागदात हातचलाखीने तांदुळाच्या जागी तांदुळाएवढेच पिवळया फॉस्फरसचे दाणे बांधून दिल्यावर कागद दोन दिवसात करपतो.
५. पर्गोगोलॅक्सच्या (जुलाबाच्या गोळया) गोळयांत फिनॉलथॅलिन असते. त्या गोळया पाण्यात विरघळवून ते पाणी हातवर लावले व नखात थोडा चुना ठेवला की रक्तासारखी लाल रेघ उमटविणे सहज शक्य होते.
६. लालदिव्याच्या प्रकाशात मडक्याच्या गळयात बांधलेला काळा रेशमी दोरा, ग्राहकांना दिसत नाही व बाबाला मडके हलवणे (दो-यामुळे) सहज शक्य होते.
७. ग्राहकाला पुरेसे लुटून झाल्यावर, त्याला बोलावून एका मडक्यांत थोडे पाणी ठेऊन त्यात फुले व फळांसोबत, ग्राहकांच्या नकळत सोडियम धातूचे काही छोटे तुकडे टाकले जातात व सोडियमचा पाण्याशी सयोग झाल्यावर फटाका फुटल्यासारखा आवाज होतो व ग्राहकांना वाईट शक्तीचा अंत झाल्याचे समाधान मिळते.

बाबांच्या कार्यालयात मिळालेल्या अनेक वस्तूंमध्ये कॉलेजच्या पिकनिकच्या ग्रुप फोटोमधील एखाद्या मुलीचा फोटो कापून वेगळा केलेला फोटोचा तुकडा होता, असे असंख्य तुकडे आढळले, काही परीक्षांची हॉल तिकिटस् सापडली. या वस्तू मुलीवर एकतर्फी प्रेम करणा-या मुलांनी वशीकरणासाठी तसेच विविध परीक्षेत दैवी शक्तीच्या सहाय्याने पास होण्यासाठी दिलेल्या होत्या!

विशेष बाब म्हणजे हे बाबा बंगाली आमच्या कोठडीत असतांना काही बारबाला त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत असत. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे बाबा बंगाली रोज संध्याकाळी डान्सबारमध्ये ‘ध्यानधारणा’ करीत असत व नडलेल्या भोळया भाबडया लोकांकडून उकळलेले पैसे बारमधील अप्सरांवर उधळीत असत. पैसे खर्च करणारी ग्राहक असल्याने त्या बारबाला पोलीस कोठडीत त्यांच्यासाठी नियमित जेवण आणीत असत.

ह्या गुन्ह्याच्या तपासावेळी प्रकर्षाने जाणवलेली उणीव म्हणजे अशा भोंदू व्यक्तीविरूध्द कारवाई करता येईल असा कोणताही परिणामकारक कायदा नाही. जादूच्या सहाय्याने उपचार करून काही ठराविक आजार बरे करण्याचा दावा करणा-या ‘आक्षेपार्ह’ जाहिराती दिल्यासच लागू होणारा विशेष कायदा आहे. त्यामुळे अंध्दश्रध्दा निर्मूलनासाठी कायदा असणे, खरोखरच आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हे नोंदवितांना किंवा दोषारोप पत्र सादर करतांना मला भारतीय दंड सहितेच्या खंडणी विरोधी कलमांसह कलम ५०८ (दैवी प्रकोपाची भिती दाखवून एखाद्या व्यक्तीस काही करण्यास भाग पाडणे) ह्याच कलमाचा आधार घ्यावा लागला.

ह्या घटनेनंतर ब-याच वाचकांना सदर महिला उच्च शिक्षित असूनही ह्या दडपणाला बळी कशी पडली? हा प्रश्न पडेल. पण ह्या सुशिक्षित महिलेने एका गाफील क्षणी सदर जाहिरात वाचून बाबांशी संपर्क साधण्याची चूक केली होती. पण त्यानंतर बाबा बंगालीच्या वाईट शक्तीच्या दडपणाला बळी पडली ती डॉक्टर महिला नाही तर एक भारतीय पत्नी व माता एवढीच तिची ओळख होती! प्रेक्षकांनी/वाचकांनी स्वत:च्या नीरक्षिर विवेक – तारतम्य राखून प्रचाराकडे दुर्लक्ष करणे ही काळाची गरज आहे. सुशिक्षित असल्याचे गमक आहे.

– सुहास गोखले