हास्यरंग

hsayaranga हास्यरंग अशोक दातार यांनी केलेली चौफेर विनोदी टोलेबाजी मूळचे कवि असलेले आणि लहान मुलांच्या गोष्टी सातत्याने लिहून प्रसिध्दीस आलेले श्री. अशोक दातार यांच्या छोटया विनोदी लेखांचा हा विनोदी संग्रह आहे. विनोद ही एक संजीवंनी आहे आणि त्यामुळे शरीरातील रसायन, हास्याचा परिणाम झाल्यामूळे सळसळू लागते व प्रसन्नतेची जाणिव प्रकर्षाने होते. श्री. दातार यांच्या लेखनाने नेमके हे साध्य झाले आहे. ‘खुर्ची रक्षक लसी’ या लेखाचे मूळ, तशा करूण परिस्थितीमध्ये आहे. तो प्रसंग म्हणजे वारंवार लोकसभा किंवा विधानसभा या भंग होतात किंवा मृत्यू पावतात. प्रत्येक रोगांवर जशी प्रतिबंधक लस असते, तसे लोकसभा भंग या रोगावरही श्री. दातार यांनी अफाट कल्पना लढवून लस शोधून काढली आहे. निवडून आलेल्या मंत्र्यांना किंवा आमदार, खासदारांना कोणकोणते रोग होतात त्याची माहिती मिळवून, त्यांचा कसा प्रतिबंध करायला पाहिजे, हे वाचून हसता हसता पुरेवाट होते.

मराठीमध्ये विनोदी लेख लिहिणारे अनेक आहेत, परंतु इंग्रजी वृत्तपत्राप्रमाणे गंभीर संपादकीय पृष्ठावर त्यांना क्वचितच स्थान मिळते. जगभरातील अनेक इंग्रजी वर्तमानपत्रे तो छापतात, आणि तो वाचून दिवसाची सुरूवात स्मितहास्यांच्या लाटेवर आरूढ होऊन करतात. त्यातील उपरोक्ष, मिस्कीलपणा आणि निरागसपणाचा मुखवटा आपल्याला गुदगुल्या करत राहतो.
‘पोलिसांचा सद्भावना सप्ताह’, या लेखामध्ये पोलिसांची, हासत राहणे, गोड बोलणे, पैसे न खाणे (केवळ त्या सौजन्य सप्ताहापुरते) हे करताना कशी त्रेधा उडते हे अतिशय मनोरंजकपणे लिहिले आहे. ‘या आठवडयात आम्ही काहीही घेऊ शकत नाही. पुन्हा केव्हातरी आम्हाला तशी संधी द्या, पण आज कायद्याचे पालन करा’ अशी अजीजीने विनंती करणारे पांडू हवालदार बघून हसावे की रडावे हेच कळत नाही. पण खूप हसू फुटते हे निश्चित.

‘फिल्मी’ पित्याचे दु:ख या चटकदार लेखामध्ये नायक नायिका जेव्हा चित्रपटाची गाडी पुढे ओढू शकत नाहीत तेव्हा फिल्मी पिता चित्रपटात आणणे आवश्यक असते, हे दातार यांनी रोचकपणे मांडले आहे.
अवतीभोवती घडणाऱ्या सर्व गोष्टीचे अशोक दातार यांचे सूक्ष्म निरीक्षण असते. त्यामुळे क्रिकेटची मॅच असो, अथवा आधुनिक मुलाखतींची वेगळी तंत्रे, त्यानुषंगाने येणारी वशिलेबाजी असो, दातार त्यातला विनोद हुडकून काढण्यात तरबेज आहेत. ‘लाईन मारण्यापूर्वी’ या मिस्कील लेखांत अशोक दातार यांनी तरूण पिढीला अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. आपण प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे की आपल्या सुखसुविधांसाठी आपण लग्न करत असतो. त्याचे प्रेमाशी काही देणे-घेणे नसते. प्रेम जमत नाही म्हणून लोक लग्न करू इच्छितात.

‘हास्यरंग’ या पुस्तकातील विनोद नर्म आणि खुशखुशीत आहे, त्यामुळे वाचक काही ठिकाणी गालातल्या गालात हंसतील. तसेच ‘वाढदिवस’ कथा वाचून अंतर्मुख झाल्यावाचूनही राहणार नाहीत. ‘एका दौपदीची कथा’ या कथेत आजच्या आधुनिक संस्थानिकांचे म्हणजे राजकारण्यांरचे, त्यांच्या पुत्राच्या अधिकारामुळे केलेले उपद्व्याप वाचून वाचकांना एका विदारक सत्याचे दर्शन घडेल. याशिवाय इतरही सर्व कथा खिळवून ठेवणाऱ्या व पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या आहेत.

अशोक दातार यांचा जीवनविषयक दृष्टीकोन हा उदार मतवादी आहे. अवतीभोवती जे घडते ते आनंदाने बघावे, त्यातले बरेवाईट क्षण टिपावे, जमेल तेथे रोमँटिक चिमटे काढावे. आपण काही फार मोठे ढुढाचार्य लागून गेलेलो नाही, जग वगैरे बदलण्याची हौस किंवा जिद्द आपल्यात नाही असे ते मानत असावेत.

त्यांनी आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये भरघोस योगदान केले आहे. पाच बालकथा संग्रह, २ बालकविता संग्रह, २ मोठयांसाठी कविता संग्रह, या खेरीज गणपतीच्या ११ गाण्यांची कॅसेट त्यांच्या नावावर आहे. याशिवाय आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांची अनेक गीते तसेच मराठी व हिंदी कथा अनेकदा प्रसारीत झाल्यामुळे ते सर्वत्र परिचित आहेत.

पुस्तकहास्यरंग
लेखक – अशोक बा. दातार
किंमत – रु. ७५ रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.

यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र

जागतिक दर्जाचे उद्योजकीय सल्लागार म्हणून डॉ. गिरीश जाखोटिया यांचे नाव ‘उद्योगविश्वात ‘ प्रसिध्द आहे. ‘यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र’ हे डॉ. गिरीश जाखोटिया यांचे पुस्तक अलिकडेच प्रसिध्द झाले आहे.

उद्योजक व्हावे, संपत्तीची निर्मिती करावी, नाव कमवावे अशी दुर्दम्य इच्छा अनेकांच्या मनामध्ये असते. मात्र ‘मोठा व यशस्वी ‘उद्योजक होण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची जशी गरज असते तशीच ‘उद्योजकीय मानसिकता’ ही असावी लागते. एखादा मारवाडी छोटया उद्योगातून मोठा व यशस्वी उद्योजक कसा होतो, हे उद्योजकीय चैतन्य कोठून येते? अशा उद्योगाबद्दलच्या विविध पैलूंचा, विविध धारणांचा डोळसपणे अभ्यास करून आपले अनुभवसिध्द मत आणि कसब यांतून या पुस्तकातील ३६ लेखांची निर्मिती झाली.

‘उद्योगाची ध्येयनिश्चिती, उद्योजकांचे कुटुंब-रचना व नियंत्रण पध्दती, उद्योजकीय मानसशास्त्र, उद्योजकीय प्रशिक्षण, खर्चावरील मापदंड, उद्योग आणि अध्यात्म….’ अशा शीर्षकांच्या लेखांमधून, समाजशास्त्रीय अभ्यासातून ‘उद्योजक’-तोही ‘यशस्वी उद्योजक’ घडविला जाईल, अशी खात्री वाटते.

आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात, १० ते ५ कार्यालयीन नोकरी हे ढोबळ चित्र बदलले असून संपत्ती मिळविण्यासाठी, आपली कार्यक्षमता आणि कर्तबगारी दाखविण्याची मानसिकता, हल्लीच्या तरुणपिढीकडे दिसते. त्यामुळे या उद्योजकीय ३६ मंत्रांचा डोळसपणे अभ्यास केला तर मारवाडी उद्योजकांच्या यशाची गुपिते आणि गणिते कळतील.

‘नव-उद्योजकच नव्हे तर मोठा आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी हे ३६ मंत्र परत परत पठण करावेत’ असा सल्ला, या पुस्तकाच्या बाबतीत ‘कॅम्लिन’चे संचालक श्री. श्रीराम दांडेकर यांनी आवर्जून दिला आहे.

‘उद्योगा’सारख्या तुलनेने रूक्ष विषयावरचे हे लेख विलक्षण रसाळ आहेत.

पुस्तकयशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र
लेखक – डॉ. गिरीश जाखोटिया
प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत – रु. १०० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.