सखी

आरोग्यविषयक लेख

तिच्या जन्माची कथा

भारतीय संस्कृतीत गृहस्थाश्रमाची पूर्तता आपल्या वंशाची वृध्दी होण्यानेच होते असा समज आहे. दोघांपैकी मूल न होऊ शकणा-यास लग्न बंधनातून फारकत घेण्याची मुभा आपला भारतीय कायदा देतो. ‘इंपोटंसी’ किंवा वांझपणा असण्याची शारिरीक किंवा मानसिक अनेक कारणे असू शकतात. ही समस्या अगदी रामायण आणि महाभारताच्या काळातही होतीच. राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या निपुत्रिक होत्या म्हणून दशरथाने विष्णूची प्रार्थना केली. अलिकडच्या काळात कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकरांनी “राण्या करितील पायस भक्षण, उदरी होई वंशरोपण…” अश्या हळव्या शब्दात ह्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. महाभारतातही गांधारीच्या गर्भाचा अंश शंभर मडक्यातून सांभाळला जाऊन, जगवला गेला होता. आधुनिक तंत्रद्यानाने वंध्यत्वाच्या ह्या समस्येवर मात केली आणि २५ जूलै १९७८ साली पहिल्या टेस्ट टयूब बेबीचा जन्म झाला.

Lousie लूसी ब्राऊनलूसी ब्राऊनने IVF (In Vitro Fertilization) पध्दतीने लेस्ली आणि जॉन ह्या ब्रिटीश दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. ब्राऊन दांपत्य नऊ वर्ष मूल होण्यासाठी प्रयत्न करत होते. लेस्लीच्या गर्भ नलिका बंद होत्या. डॉ. पेट्रीक स्टेपटो आणि रॉबट एडवर्डनी IVF ह्या तंत्राचा अवलंब १० नोव्हेंबर १९७७ रोजी लेस्लीवर केला. आणि २५ जूलै १९७८ रोजी लूसीचा जन्म झाला. लूसीची धाकटी बहिण नतालीचा जन्मही हयाच पध्दतीने चार वर्षाच्या अंतराने झाला. २० डिसेंबर २००६ रोजी लूसीला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन तिने गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या लूसी ब्रिस्टॉल येथे लहान मुलांची नर्स म्हणून काम करते आहे. दर वर्षी लूसी तिचा वाढदिवस IVF बेबीज बरोबर साजरा करते. प्रसार माध्यमांपासून दूर राहणारी लूसी जगभरातून आपण पहिली IVF बाळ असल्याचा अभिमान असल्याचे आवर्जून सांगते.

वंध्यत्वावर मात करण्यासाठी कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र शोधले गेले. जेव्हा स्त्रीबीज तयार होते त्यावेळेला पुरूषाचे वीर्य स्त्रीगर्भाशयात सोडले जाते. येथे स्त्री-पुरूषाचा प्रत्यक्ष संबंध येत नसून, प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकिय तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया केली जाते. अशा रितीने सर्व काही अनुकूल झाल्यास स्त्री गरोदर रहाते. कृत्रिम बीजारोपणाचे हे तंत्र १९ व्या शतकापासून दूध आणि दूग्धजन्य उत्पादन वाढवण्याकरिता वापरात आहे.

कृत्रिम गर्भधारणा किंवा IVF चे तंत्र जेव्हा भारतात वापरले जाऊ लागले तेव्हा भारतीयांच्या विचार धारणेला प्रथमतः ते पचविणे कठीण गेले. काही ठिकाणी तर स्त्रीच्या(च) चारित्र्यावर संशय घेण्यात आले. पण काळाप्रमाणे याही गोष्टी हळूहळू भारतीय मन स्वीकारायला लागले आहे. काही वर्षांपूर्वी आलेला अमोल पालेकरांचा ‘अनाहत’ हा मराठी चित्रपट किंवा सुरेंद्र गुप्तांचा ‘सूर्यकी अंतिम किरण से, सूर्यकी पहली किरण तक’ ह्या हिंदी नाटकानी थोडयाफार प्रमाणात ह्या विषयावर प्रकाश टाकला होता. १९९८ साली असाच प्रयत्न सौमित्र रानडे ह्या हरहुन्नरी तरूण दिग्दर्शकाने त्याचा पहिला मराठी सिनेमा ‘सापत्नेकरांचे मूल’ ह्यात केला.

सौमित्र हा जे जे स्कूल ऑफ आर्टस आणि फिल्म डिव्हीजन्सचा विद्यार्थी. मध्यंतरी त्याचा आलेला ‘जजंतरम, ममंतरम’ चित्रपट रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. असा हा संवेदनशील सौमित्र, मकरंद साठेच्या ‘सापत्नेकरांचे मूल’ ह्या नाटकाने प्रभावित नसता झाला तरच नवल. सौमित्रने हा चित्रपट मूळ नाटकाच्या संहितेला धक्का न लावता १७ दिवसात चित्रित केला. नाच, गाण्यांना फाटा देऊन प्रत्येक पात्राच्या भावना प्रेक्षकापर्यंत सहज पोहोचतात.

कालिंदी आणि दिनकर पाध्ये हे मध्यमवयीन, उच्च शिक्षित, आर्थिकदृष्टया स्थिरावलेले, अपत्यहीन जोडपे. दिनकरच्या वंध्यत्वामुळे त्यांना मूल होत नाही. कालिंदीचा डॉक्टर भाऊ रघुनाथही त्यांच्यासोबत रहात असतो. रघूनाथला झोपेच्या गोळ्यांचे व्यसन असून कधीतरी देव भेटेल ह्या आशेवर जगत असतो. कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र अवलंबण्याकरिता दिनकर कालिदींला सतत मन वळवत असतो. ह्यामध्ये त्याचे मित्र डॉ. कात-यांचीही मदत त्यांना होणार असते. पंरतू भारतीय स्त्रीच्या मानसिकतेला अनुसरून कालिदींला कृत्रिम गर्भधारणेची कल्पना अजिबात रूचत नसते व त्याला तिचा ठाम नकार असतो.

Sapatnekar वास्तव जगातील हे ताणतणाव सावरण्यासाठी देव त्याचा दूत म्हणून विदूषकाला पाध्यांच्या घरी आपले आगमन होणार आहे हे सापत्नेकरांचे मूलसांगण्यास पाठवतो. नास्तिक असणारी कालिंदी प्रथम हे स्वीकारण्यास तयार होत नाही पण भूतकाळातल्या अशा काही घटनांचा उल्लेख विदूषक करतो की तिला विश्वास ठेवावाच लागतो. त्याउलट रघूनाथ मात्र वादविवादात देवाचे अस्तित्व नाकारतो. हळूहळू कालिदींचा विश्वास बसायला लागतो. मातृत्वाची ओढ असणारी कालिंदी देवा बरोबरही सवंग करायला तयार होते. देव प्रियकर होणं नाकारतो पण तिच्या पोटी जन्म घेण्याचे कबूल करतो. देव त्यासाठी कालिंदीला कृत्रिम गर्भधारणेसाठी मन वळवतो. लग्न न झालेला तरूण सापत्नेकर स्वत:चे वीर्य दान करायला तयार होतो.

दिनकर बाहेरगावी गेलेला असतांना, कालिंदी डॉ. कात-यांच्या मदतीने कृत्रिम गर्भधारणेच्या वैद्यकिय प्रक्रियेला सामोरी जाते. त्याच्या अनुपस्थितीत केल्यामुळे, दिनकर ह्या प्रकाराने नाराज होतो. कालांतराने, कालिंदी गोंडस बाळाला जन्म देते. पण बाळंतपणातच तिचा दुर्देवी मृत्यू होतो. दिनकर पत्नीच्या मृत्यूने कोसळतो. मात्र त्याचे मन बाळाला स्वीकारण्यास तयार होत नाही. त्याउलट तो बाळाचा चेहरा कुणाबरोबर जुळतो आहे का? हेच बघत असतो. रघूनाथला हे देवाचे मूल वाढवण्याची इच्छा आहे. त्याचवेळेला सापत्नेकर आपल्या वीर्यापासून झालेला हा मानवी अवतार पाहण्यासाठी तेथे येतो. आता मात्र असे गोंधळलेले वातावरण आपल्या वाढीसाठी योग्य नसल्याचे देवाला वाटते आणि विदूषकाला ह्या भूलोकावरुन बाळाला सर्वांपासून दूर घेऊन जायला सांगतो.

‘सापत्नेकरांचे मूल’ हा विषय निश्चितच कौतुकास्पद आहे. अपत्यहीन दांम्पत्याची घुमसट, वेदना आणि त्यामुळे समाजाची विशेषतः स्त्रियांना देण्यात येणारी हीन वागणूक, चित्रपट परिणामकारकरित्या दाखवतो. चित्रपट उच्चशिक्षित लोकांचा दुटप्पीपणा दाखवण्यातही यशस्वी झाला आहे. दिनकर उच्चशिक्षित आणि कृत्रिम गर्भधारणेचे ज्ञान असणारा असून सुध्दा कालिंदीवर नाराज होतो आणि पुढे मूल स्वीकारण्यास नकार देतो. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी विदूषक आणि देव हास्य आणि कोटयांचा शिडकाव करत वातावरण काहीसे सैल करतात. त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीवर केलेले मर्मभेदक भाष्य लाजबाब. गणेश यादव, सुषमा बक्षी, दिलीप जोगळेकर, गजानन पराजंपे, सतीश आळेकर आदी कलाकारांचा अभिनयही लक्षात राहण्याजोगा झाला आहे.

‘रोमन साम्राज्याची पडझड’, ‘चारशेकोटी विसरभोळे’ अशी वेगळ्या विषयांवरची नाटके लिहीणा-या मकरंद साठेंच्या ‘सापत्नेकरांचे मूल’चा पहिला प्रयोग १९८९ मध्ये आविष्कारने केला. दिग्दर्शन होते अजित भगत ह्यांचे. १९९३ मध्ये ‘सापत्नेकरांचे मूल’ हे पुस्तक मराठीत आले. १९९८ साली जयंत देशपांडे ह्यांनी इंग्रजीत अनुवाद केलेले ‘सापत्नेकर्स चाईल्ड’ पुस्तक सीगल प्रकाशन आणले. रुद्रा होम व्हिडीयोने ह्या चित्रपटाची व्हीसीडी इंग्रजी शिर्षकांसह उपलब्ध करुन दिली आहे. इंग्रजी शिर्षकांमुळे ही कलाकृती फक्त मराठी प्रेक्षकांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. काळाच्या बरोबर असणारा हा चित्रपट आपल्या संग्रही असावा असा आहे.

– भाग्यश्री केंगे