धन्य ती गायनॅक कला

ganyackala डॉ. मीना नेरुरकर यांनी लिहीलेले व अनुबंध प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले ‘धन्य ती गायनॅक कला’ हे पुस्तक अनेक दृष्टीने वाचनीय झाले आहे. डॉ. मीना नेरुरकर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नाटकामुळे मराठी रसिकांना परिचीत आहेतच त्यांच्या ह्या पुस्तकामुळे वाटचालीचा परिचय आपणास होतो.

आपला गायनॅकॉलॉजीशी संबंध आईच्या पोटात असल्यापासून होता व अभीमन्यूसारखे आपण आपल्या गायनॅकॉलॉजीस्ट आईकडून ज्ञान मिळवले असे त्यांनी लिहीले आहे. शाळा, कॉलेजात चांगली प्रगती होत असतानाच त्यांना नृत्याचे धडे मिळाले. गायनॅकॉलॉजीस्ट झाल्यावर त्यांचा विवाह अनिल नेरुरकर यांच्याशी झाला. त्यांनी आपल्या – जीवनाचं चित्र आपल्या समोर खूपच प्रभावीपणे मांडलं आहे.

इंग्लंडमधील वास्तव्य व त्यानंतर अमेरिकेत प्रॅक्टीस सुरु करतांना त्यांनी घेतलेले कष्ट याबद्दल त्यांनी विस्तृतपणे लिहीलं आहे. अमेरिकेतील निसर्ग, तेथील समाजजीवन व तेथील माणसांच्या जीवन पध्दती हे सर्व आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. सहकारी डॉक्टर्स, पेशंटस्, नर्सेस व बॉस यांच्या आठवणीही त्यांनी पुस्तकात लिहील्या आहेत.

तेथे डॉक्टरांच्या क्लिनीकला ऑफीस म्हणतात. प्रत्येक डॉक्टरला एका हॉस्पीटलशी संलग्न असावे लागते. तेथे डिलीव्हरीज् डॉक्टरांनाच कराव्या लागतात. तेथील ऑपरेशन रूमच्या भिंतीवर सुविचार लिहीलेले कागद चिकटवतात. हे सर्व वाचतांना अमेरिकेची ओळख आपणास होते.

एखाद्या नाटकाला असतो तसा या पुस्तकाला मध्यंतर आहे. अमेरिकेत कष्ट करणारी व सतत नव्याचा शोध घेणारी माणसं भेटली. अमेरिका का आवडली हे त्यांनी लिहीलं आहे. आपल्या अनेक पेशंटसच्या बद्दल त्यांनी मध्यंतरानंतरच्या भागात लिहीलंय पेशंटसच्या कथांमध्ये जाणवते ती डॉ. मीना यांच्यावरचा विश्वास दर्शवणारी पेशटंसची वागणूक. ‘प्रत्येक डॉक्टर श्रध्दाळू असतो. मग तो भारतातला असो वा अमेरिकेतला, तो भारतीय असो वा अमेरिकन. आपण कितीही कष्ट केले तरी बरं करणं हे देवाच्या हातात आहे असं आम्ही मानतो’ – डॉक्टरांबद्दलचं हे अनुभवातून तयार झालेलं मत त्यांनी मांडलंय जगातल्या सर्व स्त्रीया आतून सारख्याच आहेत. त्यांच्याजवळ प्रेमाचा साठा आहे. असं लिहीत असतांनाच स्वत: एक स्त्री म्हणून समाधानी असल्याचं त्यांनी आवर्जून लिहीलं आहे.

– सुनील कुलकर्णी

पुस्तकधन्य ती गायनॅक कला
लेखक – डॉ. मीना नेरुरकर
प्रकाशक – अनुबंध प्रकाशन
किंमत – रु. २२५ रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.

श्रीलंकेतील श्री सीता ईलिया – जगातील एकमेव सीता मंदिर

कोलंबोपासून ३०० कि.मी. अंतरावर नुवार ईलिया असून त्याच्या जवळ सीता ईलिया आहे. तेथे श्री सीतामातेचे मंदिर आहे. सीतामातेच्या बंदीवासातील वास्तव्यामुळे रावणाची लंका पवित्र झाली. अशोक वनात सीतामाई बसली होती ते स्थान, हनुमानाची पदचिन्हे, मंदिर, आतील सीतामातेची मूर्ती या साऱ्यांचे संक्षिप्त, सचित्र वर्णन श्री. प्रबोध हळदे यांच्या ‘श्रीलंकेतील श्री सीता ईलिया-जगातील एकमेव सीता मंदिर’ या २४ पानी छोटेखानी पुस्तिकेत केले आहे. लेखक तंत्रविज्ञानाचे जाणकार, पण पुस्तक वाचतांना त्यांची गुरूवरील श्रध्दा व त्यांच्या प्रेरणेने झालेले हे लेखन व त्याबद्दलची कृतज्ञता प्रत्ययास आल्याशिवाय रहात नाही. आपल्याच देशात श्रीरामजन्मभूमी अजून मुक्त नाही पण परमुलखातले रक्षिले गेलेले हे शक्तीपीठ, लेखकाला जी मन:शांती देउन जातं ती वाचकांना सुध्दां अनुभवता येईल असे सुरेख लेखन झाले आहे. याबरोबर श्रीलंकेतील इतर स्थळांची माहिती पण अत्यंत उपयुक्त आहे. पुस्तक वाचतांना लेखकाचा हा पहिला प्रयत्न आहे हे वाचून आश्र्चर्य वाटते. स्रग्वी प्रकाशनचे रु. १० किमतीचे हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे.