गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा अल्प-परिचय

goni dandekar मराठी साहित्यातील ‘कलंदर फकीर’: गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा अल्प-परिचय

गोपाल नीलकंठ दांडेकर, एक कलंदर फकिरी जगणे. अवघे जीवनच भटकणे झालेले. सहयाद्रीच्या कडेकपाऱ्या, गड-किल्ले यांच्या कुशीत रमलेले, पूर्णेपासून नर्मदेपर्यंत अवघ्या मुलखाचे पाणी चाखलेले, शिवबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेक गडावरची धूळ मस्तकी धारण करणारेव्यक्तिमत्त्व. शिवरायांचे पदचिन्ह, हाताचा ठसा व अस्थिशेष आपल्यापाशी आहे, याची श्रीमंती बाळगणारा हा अस्सल मराठी मातीतला माणूस.या साऱ्या भटकण्याचेच अनुभव झाले. या अनुभवांतूनच साहित्य प्रसवले. त्यातून मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या, छत्रपतींच्या काळात नेणाऱ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अखंड भ्रमंतीतून आलेले आगळेवेगळे अनुभवच शब्दरूप घेऊन आले.

गोनीदां ऊर्फ अप्पांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;’ असे गोनीदां म्हणत

नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले. या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.

‘आमचे राष्ट्रगुरू’ ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. ‘साभार परत’ हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. ‘बिंदूची कथा’ ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी ‘माचीवरला बुधा’, ‘पूर्णामायेची लेकरं’ (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),’आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘मृण्मयी’ अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

‘मृण्मयी’ अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. ‘पवनाकाठचा धोंडी’ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘शितू’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’ या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.

‘मोगरा फुलला’ कादंबरीची हकीकत थोडी वेगळी. ज्ञानदेवांचे वडील विट्ठलपंत यांच्या संन्यासी वृत्तीचे गोनीदांना खूप आकर्षण होते. ज्या माणसाचा पुत्र साक्षात ज्ञानेश्वर आहे, त्यात तेज:पुंज असे काही असणारच, या विचाराने त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यातील निम्मा भाग त्यांनी विट्ठलपंतांच्या जीवनातील संघर्षाचे, ताणतणावांचे चित्रण करण्यात खर्च केला आहे. या कादंबरीचे १९७७ मध्ये प्रथम गोनीदांनीच जाहीर वाचन केले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला; पण तेंव्हा हा प्रकार रूजला नाही. आता गोनीदांची कन्या प्रा. वीणा देव, व जामात डॉ विजय देव आपल्या मुलींसह गोनीदांच्या सहा कादंबऱ्यांचे अभिवाचन करीत आहेत.

गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला होता.

गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी’, तसेच ‘श्री रामायण’, ‘भक्तिमार्गदीप’, ‘कर्णायन’, ‘कृष्णायन’, ‘दास डोंगरी राहतो’, ‘तुका आकाशाएवढा’ ही पुस्तके लिहिली.

साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘काका माणसात येतो’, ‘वनराज सावध होतात’, ‘कुऱ्हाडीचा दांडा’, ‘संगीत राधामाई’, ही नाटके त्यांनी लिहिली. ‘छंद माझा वेगळा’ हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, ‘पाच संगीतिका’ हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.

त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘स्मरणगाथा’ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने’नगरभूषण’, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘साहित्य वाचस्पती’ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ‘नानासाहेब नारळकर’ पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ‘दुर्गप्रेमी’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. १९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान. मालतीबाई बेडेकर यांना दहा मतांनी हरवून गोनीदा अध्यक्ष झाले. आपल्या वऱ्हाड प्रांतात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला; पण नंतर ‘आदरणीय मालती बेडेकरांविरूध्द मित्रमंडळींच्या आग्रहास्तव उभा राहिलो. ते सर्व वर्ष कटू गेले. साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो हे विसरून जायचे आहे.’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. ‘जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.’, अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी ‘सकाळ’ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.

गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.

मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे’ अशी त्यांची मराठी आहे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा ‘मृण्मयी पुरस्कार’ सुरू केला. १९९८ सालात, स. प. महाविद्यालयाच्या ‘प्राचार्य सोनोपंत दांडेकर’ अध्यासनाला हा पुरस्कार लाभला. त्याआधी

मारूती चित्तमपल्ली, विलास मनोहर, शुभदा गोगटे, तळेगावचे साहित्य संस्कृती मंडळ, आळंदीचे वारकरी शिक्षण मंडळ, यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ”माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.’ या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा? गोनीदांचे मायमराठीवर असेच प्रेम होते. ‘मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,’ अशी खंत ते व्यक्त करीत.

‘सर्वथा अनलंकृत लिहिता यावे, हीच आता तीव्र इच्छा आहे,’ असे त्यांनी सोळा वर्षांपूर्वी म्हटले होते. एवढे लिखाण केल्यावरही त्यांना साधेसोपे लिहीणे हे अवघड आहे याची जाणीव होती. या दांडेकराला लालित्यासाठी तडजोड करावी लागत नाही, लालित्य हा त्याच्या लिखाणाचा अंगभूत गुण आहे, असे ते आत्मविश्वासाने म्हणू शकत असत.

अतिशय सूक्ष्म अवलोकन, गड-किल्ल्यांचा मुखोद्गत इतिहास, तेथील रेतीरेतीविषयी मनात दाटलेला अभिमान, मुलखाचे फकिरी व्यक्तिमत्त्व, प्रचंड अनुभवातून उतरलेले ताकदवान साहित्य, मायबोलीविषयी वाटणारी उत्कट तळमळ, हे गोनीदांच्या अवघ्या जीवनाचे सार आहे.