देवराई

devraiदेवराई म्हणजे देवांसाठी राखलेली वनश्री!

स्क्रिझोफ्रेनिया या विचित्र मनस्कतेत वावरणारा शेष (अतुल कुलकर्णी) च्या भोवती देवराईची कथा गुंफली आहे. त्याला कोकणात वाडीजवळच्या देवराईच भयंकर वेड. बहिण सीना(सोनाली कुलकर्णी) व मामेबहिण कल्याणी (देवीका दफ्तरदार) याच्या सोबत तो देवराईतच लहानाचा मोठा झालाय. या कुटूंबाची चाकरी करणारी पार्वती आणि तिचा नवरा शंभू राजेंद्र मोरे ही सारी पात्रे एकमेकांना अनुरूप आहेत.

कुमार वयात शेषचा स्वभाव तापट, एकलकोंडा होतो. त्याचा परिणाम सहाजिकच शेषच्या शिक्षणावर होऊ लागतो. त्यात त्याची कल्याणीशी जवळीक आईला खटकते, ती कल्याणीला वाडी सोडायला लावते. सुदेश (तुषार दळवी) शी सीनाचे लग्न त्यानंतर आईचा शेवट, देवराईमधुन रस्ता होणार ह्या घटनांमुळे शेष आक्रोशू लागतो. परंतु येथे त्याचा आक्रोश हा एक मानसिक आजाराचा (स्किझोफ्रेनियाचा) उद्रेक आहे.

स्किझोफ्रेनिया झाल्यावर तो सगळया घटनांचा, प्रतिमांचा धागा देवराईशी जोडू लागतो. देवराईला मानवी मुखवटा देऊन खऱ्या खोटयात गल्लत करू लागतो व आपणच निर्माण केलेल्या या घनदाट देवराईत वाट चुकतो. या आजाराची लक्षणे शेषच्या बहिणीच्या-सीना गोरेच्या व डॉक्टरांच्या संवादातून आपल्यासमोर येतात.

शेषला येणारे भास-अभास म्हणजे दृष्टीभ्रम व संवादभ्रम, त्याचे काल्पनिक विश्व व खरे वास्तव यांची गल्लत, प्रतिकांची सरमिसळ, शब्द भावना अभिव्यक्ती अडचण, हातापायांच्या थरथरीने सुटलेले नियंत्रण, अगतीकता, असहायता, चिडचिड, एकटेपणा, भीती, राग यांचे होणारे उद्रेक वगैरे अशी स्किझोफ्रेनियाची अनेक लक्षणे चित्रपटात ओघाने येत राहतात.

मेंदूतील विद्युत रासायनिक बदल स्किझोफ्रेनियाला प्रामुख्याने जबाबदार असतात. त्याचबरोबर कमकुवत व्यक्तिमत्व, जेनेटिक्स, संस्कार, पूरक घटनाही महत्वाच्या ठरतात. याचाच अर्थ एखादा माणूस स्किझो/ेनिक असल्यास तो केवळ आजारी असतो. त्यामुळे त्यास लपवून ठेवण्याचे अथवा दूर ढकलण्याचे कारणच नाही. किंबहूना त्याच्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. अन् हा चित्रपट असा अभिप्रेत असलेला ‘डोळसपणा’ अधोरेखित करते. संपूर्ण चित्रपट असाच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन चित्रित केलाय.

त्यात कुठेही गंडे-दोरे, भीती, लाज याचा पाठपुरावा नाही किंवा कोणते रहस्यही नाही. तसेच मानसिकदृष्टया आजारी असलेला माणूस समजुन घेणारी, त्याच्या नातेवाईकांना किती सहन करावं लागतं ही दाखवणारी परंतु सहानुभूतीची, कणवेची अजिबात अपेक्षा न ठेवणारीही, ‘देवराई’ ची गोष्ट आहे. देवराईत शेषच्या बहिणी-सीना व कल्याणी ही जबाबदारी पार पाडतांना दिसतात. प्रथम अत्यंत अलीप्तता दाखवणारा मेव्हणा सुदेश, प्रबोधनानंतर त्याची काळजी करणारा बनतो, हे विशेष! या चित्रपटात सर्वजण शेषला मदत करू इच्छितात व ते तशी करतातही, हे त्यांचे भाग्यच पण शेषच्या भावजीवनात कल्याणीला एक विशेष स्थान आहे. ती मामेबहीण-सखी-प्रेयसी-आई या नात्यांनी उलगडत जाते. महत्वाचे म्हणजे ती शेषला ‘स्वीकारते’.

देवराईची कथा, पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन, दिग्दर्शन, संकलन हे सुमित्रा भावेंनी शिवधनुष्यासारखे पेलले आहे. त्यांना दिग्दर्शनात साथ सुनील सुकथनकरांची आहे. कथेचे बीज छोटेसे आहे. पण प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. चपखल-साधे संवाद, लहान-लहान घटनांमधून भोवतालच्या व्यक्तींचे चित्रण! अगदी फ्लॅशबॅकही कथा पुढे नेण्यास अपवाद नाही. या गीताने सिनेमा संपल्यावर, काही काळ आपण खुर्चीलाच खिळून राहतो, अशब्द! अतुल कुलकर्णींच्या सकस अभिनयाचा उल्लेख करावाच लागेल. बारकाव्यांसह मुद्राभिनय, डोळयांचा सुयोग्य वापर, बोलकी देहबोली, शब्दफेकीची अचुकता यांमुळे त्यांनी स्किझो/ेनिक शेष जिवंत केलाय. सोनाली कुलकर्णी तुषार दळवी, देविका दफ्तरदार, डॉ. मोहन आगाशे, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, अश्विन चितळे यांचीही मेहेनत वाखाणण्याजोगीच!

देवराईत रुढार्थाने पार्श्वसंगीत नाही, आहेत पूरक ध्वनी अन् कविता! समुद्राची गाज, झाडांची सळसळ यांचा सुंदर वापर केलाय. चित्रपटाशेवटी येणारी अतुल कुलकर्णींची कविता म्हणजे चित्रपटाचे सारच! त्यातील कल्लोळ, पारधी, एकटे, जंगल या शब्दांचे पुनर्वापर म्हणजे एकामागून एक येणाऱ्या लाटा, अलगद शब्दांपलिकडे घेऊन जाणाऱ्या! देबू देवधरांचा कॅमेरा विविध कोनातून कथेचे ते अलवार पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवतो. काही क्लोज-अप तर शब्दात सांगता येणे कठीण. कोकणचा निसर्ग मनावर गारूड करून टाकतो.

देवराईची निर्मिती स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान, धुळे’ यांनी केली आहे. समाजजागृतीसाठी त्यांनी निर्माण केलेला देवराई, उद्दीष्ट सफल करतो.

दिग्दर्शकद्वय
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीबद्दल वेगळं सांगायला नको. चित्रपट ‘दोघी’ आठवा. ‘दहावी फ’ आणि ‘वास्तपुरुष’ तर नुकतेच येऊन गेले आहेत. अनेक बक्षिसं देशात आणि बाहेर – मिळवणारी दिग्दर्शकांची टीम. नवे विषय घेणारी. हळुवारपणे हाताळणारी. वेगळं काहीतरी सांगणारी. त्यांनी या देवराई फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. काम अवघड. देवराई दाखवायची माणसाचं मन दाखवायचं. सगळयांचे एकमेकांवरील अवलंब दाखवायचे. रोकड तर सांगायचं पण कला हरवता कामा नये. शास्त्रीय सत्य तर दाखवायचं, पण ‘डॉक्युमेंटरी’ होता कामा नये. ब्ल्यू प्रिंट आणि चित्र या दोघांनाही रेषा काढण्याचे नियम पाळावेच लागतात. पण एक होतं कोरडं आरेखन. दुसरी होते कलाकृती. आरेखनाचे नियम पाळूनही दिग्दर्शक द्वयीने एक कलाकृती निर्माण केली आहे हे खास.

निर्मात्याबद्दल
स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन पुणे आणि के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट धुळे या दोन स्वयंसेवी संस्थांनी हा चित्रपट निर्मिलेला आहे. स्किझोफ्रेनिया उर्फ छिन्नमनस्कता या मानसिक त्रासाबद्दल सामान्य माणसाची जाण वाढावी यासाठी ही संस्था कार्य करते. छिन्नमनस्कता अनुभवणारी माणसे आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी पुणे, नाशिक, नागपूर, आणि अहमदनगर येथे स्वमदत गट संस्थेतर्फे चालवले जातात. पुण्याहून ‘एकलव्य न्यूजलेटर’ नावाचे एक नियतकालिक प्रसिध्द केले जाते. छिन्नमनस्कतेबद्दल शास्त्रीय माहिती सोप्या मराठीत देणारे ‘स्किझोफ्रेनिया-नवी जाणीव’ हे सुंदर पुस्तक संस्थने प्रकाशित केले आहे. स्किझोफ्रेनियाबद्दल सोप्या इंग्रजी भाषेत उपयुक्त माहिती देणारे चाळीस लेख निरनिराळया तज्ञांकडून लिहून घेतले आहेत. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल.

के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट, धुळे, या संस्थेतर्फे प्रगत मराठी अभ्यास संस्था, कमलिनी वाणी आरोग्य सेवा संस्था, एक छपाईप्रेस, मुलांसाठी विज्ञान विहार, स्त्रियांसाठी सबलीकरण उपक्रम असे बरेच कार्य खान्देशात केले जाते.
अशा दोन संस्थांनी मिळून देवराई आणि छिन्नमनस्कता याची जाण वाढवणारी कलात्मक फीचर फिल्म निर्माण करावी हे त्या संस्थांच्या उद्दीष्टास आणि ख्यातीस शोभेसं आहे.

उपसंहार
फिल्मचे चित्रीकरण चालू असतांना सेटवर अतुल कुलकर्णी यांना एक कविता सुचली. तीन कडव्याची. इतकी सुंदर, की तिचा सामावेश खुद्द चित्रपटामध्ये केला गेला. त्या कवितेचे पहिले कडवे हेच या सर्व चित्रपटाचे सार आहे. ते कडवे पुढीलप्रमाणे-

नाही हाकारा पण उठले रान
घरटे समोर सापडेना वाट
बेभान पाखरु समजेना कोणा
का कल्लोळ … कल्लोळ…

कलाकार

कलाकार
भाषा – मराठी
दिग्दर्शक – सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर
निर्मिती – स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन व के. एस. वाणी मेमेरीयल ट्रस्ट, धुळे
कथा, पटकथा, संवाद, वेशभुषा  – सुमित्रा भावे
संकलन  – सुमित्रा भावे, विरेंद्र वालसंगकर
छायाचित्रण  – देबू देवधर
संगीत  – श्रीरंग उमराणी
ध्वनी  – अनिता कुशवाह,
कलाकार – अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, देवीका दफ्तरदार, अमृता सुभाष, राजेश मोरे, डॉ. मोहन आगाशे
काव्यरचना  – अतुल कुलकर्णी

छायाचित्रे

सहकार्य

प्रसिध्दी –
चित्रपट व्हिसीडी – रुद्रा होम व्हिडिओ
ऑनलाईन पार्टनर – मराठीवर्ल्ड.कॉम
पार्टनर – मुंबई टाईम्स, गांवकरी
प्रसिध्दी सहकार्य – लोकसत्ता

पारितोषिके – देवराई

१) आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतुल कुलकर्णीच्या अविस्मरणीय अभिनयामुळे पारितोषिक विजेता.
२) आतंरराष्ट्रीय ज्युरी पॅनेलमध्ये तांत्रिक वैशिष्टयांबद्दल अभिनेता अतुल कुलकर्णी यास पुरस्कार प्राप्त.
३) स्टार स्क्रिन ऍवार्ड 2005 या पारितोषिक वितरण सोहळयात मराठी चित्रपटांपैकी उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार प्राप्त.
४) अल्फा गौरव पुरस्कार 2005 या पारितोषिक वितरण सोहळयात उत्कृष्ट कथानक व सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पारितोषिक विजेता चित्रपट.
५) म. टा. सन्मान पुरस्कार – उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन-सुमित्रा भावे, उत्कृष्ट अभिनेता-अतुल कुलकर्णी, उत्कृष्ट छायाचित्रण-देबू देवधर
६) पर्यावरण संवर्धनविषयक उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार 2005

संपर्क – देवराई

ग्रुप बुकींग व शो स्पॉन्सर करण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधा
सुभाष छेडा – 98202 22776,
डॉ. कैलासनाथ कोप्पीकर – 98200 34213