जीवन जगताना ते ताठ मानेने जगावे. आपले स्वत्त्व म्हणून काही असते, व ते जपायचे असते. प्रत्येकामध्ये जीवनाचा खळाळणारा झरा आहे, व एकमेकांमधील या साक्षात चैतन्याचा सन्मान ही जगताना फार गरजेची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीस हे विचार तत्त्वज्ञातील वाटतील. पण ज्याने अवहेलना, मानहानी, अपमान, हीन वागणूक, दास्य, दैन्य, गुलामी यांचा अनुभव घेतला आहे, त्यांना कदाचित या विचारांची ‘गरज’ जाणवेल.
वर विस्ताराने सांगितलेली जीवनदृष्टी देणारा, मराठी माणसाला स्वत:ची अस्मिता देणारा, त्याचे डोळे जगाच्या संदर्भात व त्याच्या स्वत:च्या संदर्भात उघडणारा एकमेवाद्वितीय राजा म्हणजे, छत्रपती शिवराय! छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत.
छत्रपती शिवरायांचे नाव आणि किर्ती तळागातील लोकांपर्यंत पोहोचली आहे, परंतु त्यांच्या कार्याची माहिती या खेडवळ लोकांना नाही. प्रसार माध्यमांचा फायदा करून घेणारे लोक देखील एकंदर लोकसंख्येचा विचार करता जास्त नसतात. खेडयातील स्त्रियांना संध्याकाळी देवळात वाचन करता यावे, त्यांना त्यात गोडी वाटावी असा रसाळ ग्रंथ म्हणजे, ‘श्री शिवछत्रपती विजय’. अलिबाग येथील सौ. विभा वा. दातार यांनी एकंदर ५ हजार ओवीं गुंफून शिवरायाचे चरित्र लिहिले आहे. कवी नारायण मोरे यांनी पहिले ओवीबध्द शिवचरित्र ‘शिवायन’ लिहिले. त्याआधी, कवी यशवंत यांनी काव्यमय शिवइतिहास मांडला आहे. ‘गीत रामायणा’च्या धर्तीवर ‘गीत शिवायन’ सादर करण्याचाही प्रयत्न झाला. पण विभा दातार यांच्या ‘श्री शिवछत्रपती विजया’ची पार्श्वभूमी वेगळी आहे. हे लोकांच्या राजाचे, लोकांच्या मागणीनुसार, लोकभाषेला जवळ जाणारे चरित्र आहे. श्रावण महिन्यात खेडयापाडयातील, शहरातील देवळांत विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन होते. राष्ट्रीय प्रेमभावना अधिक तीव्र व्हावी म्हणून शिवचरित्र लोकांच्या कानापर्यंत तसेच हृदयात नेणारा हा ग्रंथ.
‘श्री शिवछत्रपती विजय’ मधील काही सौंदर्यस्थळे:
१. शहाजीराजे जिजाबाईंना आपले मनोगत सांगतात- अध्याय २/ ओवी ४३
करितो चाकरी यवनांची। परि आवडी नसे तयाची।
ओढ मला स्वराज्याची। रात्रदिनी लागलीसे॥४३॥
हिंदवी राज्य स्थापन व्हावे। गो ब्राह्मणांचे भाग्य उजळावे।
स्वतेजाने तळपावे। महाराष्ट्र राज्य भूवरी॥४४॥
स्वप्न ऐसे माझिया मनीचे। तुम्हा सांगितले साचे।
तुम्हांविण भरवशाचे। दुजे मज कोणी नसे॥४५॥
पुणे, सुपे, परगणा। तुमच्या स्वाधीन केला जाणा।
लोकांत करणे बहाणा। तुमचा आमुचा बेबनाव॥४६॥
माणसे नेटकी गोळा करोनी। देईन तुम्हांकडे पाठवोनी।
उत्तम देवोनी शिकवणी। बाळराजा घडवावा॥४७॥
२. शहाजीराजांच्या सुटकेबाबत सईबाईंचा सल्ला- अध्याय४/ओवी ८०
महालीं बैसले च्रिंताक्रांत।सईबाई प्रवेशत।
राजियांस धीर देत। सहधर्मचारिणी॥८०॥
तीर्थरूप असती कैदेत।काय करावे नसे उमगत।
चालून जावे विजापूराप्रत। ऐसे मनी वाटतसे॥८१॥
मारावे किंवा मरोनी जावे। परि स्वस्थ न बैसावे।
शत्रूसंगे झुंजावे। प्राणपणाने ये वेळी॥८२॥
माझे ऐकावे दोन बोल। जरी ऐसे पाऊल उचलाल।
तरी तीर्थरूपांस मुकाल। त्याच क्षणीं निश्चित॥८३॥
आपुला हात दगडाखाली। सापडला असे या वेळी।
बुध्दीबळातील खेळी। येथे खेळणे योग्य असे॥८४॥
प्रत्यक्ष पाऊल न उचलणे। दुस-यांकरवी शह देणे।
शत्रूला पेचांत पकडणे। बुध्दीमंतांचे लक्षण॥८५॥
‘श्री शिवछत्रपती विजय’- काही प्रतिक्रिया:
‘प्रतिभा, प्रवाह, अभ्यास, शैली, भाषाप्रभुत्व आणि लेखणीचा कुलीन दिमाख प्रत्येक ओवीस प्रत्ययास येत आहे… अल्पशिक्षित आणि निरक्षर समाजासही रंगवून टाकावे असे सामर्थ्य या ओवीबध्द काव्यात आहे. सौ. विभा दातार यांनी खूप लिहावे, अवघा महाराष्ट्र त्यांना आशीर्वाद देईल आणि दंडवत घालेल.’ – बाबासाहेब पुरंदरे
‘जिजामाता, दादोजी, शहाजी, शिवाजी, सोयराबाई, तानाजी, येसाजी, तानाशाह, अफजलखान इ. व्यक्तिरेखा वास्तव स्वरूपात सादर केल्या आहेत. प्रमुख व्यक्तिंना पुरेसा वाव दिला आहे. गौण व्यक्तिरेखांची धावती चित्रे – डॉ. हेमन्त वि. इनामदार
‘फार उत्तम काम झाले आहे. सायंकाळी श्रोत्यांना वाचून दाखविण्यास योग्य आहे.’ – गो. नी. दांडेकर
तर असा हा आगळावेगळा ग्रंथ. मराठीवर्ल्डवरील ग्रंथ परिचय दालनास या ग्रंथाने सुरवात होत आहे. या ओवीत बांधलेल्या, शिवराजांच्या चरित्राची किंमत रू. २५० आहे. हा ग्रंथ आपल्याला नाशिक, ठाणे, पुणे येथे मराठीवर्ल्डतर्फे उपलब्ध करून दिला जाईल. कुरियरचे शुल्क अर्थातच ग्राहकांस भरावे लागेल.
पुस्तक – ॥श्री शिवछत्रपती विजय॥