बोली भाषा

अहिराणी

महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांत बोलली जाणारी ही एक भारतीय आर्य बोली आहे. तिला ‘खानदेशी’ ही म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली ग्रीअर्सन- च्या मते एक भिल्ली बोली असून, त्याने लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात इतर भिल्ली बोलींबरोबर ती दिली आहे. भारतीय जनगणनेच्या भाषाविषयक खंडातही अजूनपर्यंत हीच प्रथा पाळण्यात आलेली आहे. अहिराणीची काही वैशिष्ट्ये मराठीहून पूर्णपणे भिन्न असून काही बाबतींत ती मराठीशी व काही बाबतींत गुजरातीशी मिळती आहे. यात आश्चर्य वाटण्यासारेख काही नाही; कारण या दोन मोठ्या भाषांच्या दरम्यान पसरलेली ही एक संक्रमक बोली आहे. तिच्यात आढळणारे अनेक संस्कृतेतर शब्द खानदेशी लोक पूर्वी कोणती तरी आर्येतर (उदा – ऑस्ट्रिक वंशीय) भाषा बोलत असावेत असे दर्शवतात. अहिराणी-भाषिकांची संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ३,६७,४७२ होती. पण हा आकडा ग्राह्य मानता येत नाही, कारण घरात अहिराणी बोलणारे सुशिक्षित लोक आपली भाषा मराठी आहे असे सांगतात. त्यामुळे अहिराणी बोलणारे लोक बरेच अधिक असावेत असे वाटते.

वरील थोड्याशा वर्णनावरून अहिराणी मराठीहून किती वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे ते दिसून येईल. केवळ उच्चारापुरते पाहिल्यास मराठीत ज्या ठिकाणी ‘ळ’ असतो, तिथे अहिराणीत ‘य’ आहे (सकाय–‘सकाळ’, धुयं–‘धुळं’), ‘छ’ व ‘ण’ ही व्यंजने नाहीत. रूपविचारात मराठीतील, -ला या प्रत्ययाऐवजी –ले हा प्रत्यय आहे. याशिवाय मराठीला अपरिचित असे-से, -पाईन, -थीन, -जोडे इ. प्रत्ययही आहेत. शब्दसंग्रहात आंडोर ‘मुलगा’, झो-या ‘सतरंजी’, वडांग ‘कुंपण’ यांसारखे अनेक अपरिचित शब्द आहेत. एखाद्या बोलीच्या भाषिक वैशिष्ट्यांप्रमाणेच ती बोलणा-या लोकांच्या भावनेवरूनही तिचे वर्गीकरण करता येते. त्यामुळे अहिराणीला मराठीची बोलीच म्हणावे लागेल.

साहित्य
अहिराणीत लिखित साहित्य नाही. पण मराठीच्या इतर बोलींप्रमाणे लोकसाहित्य भरपूर आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य मंडळाने त्यातील काही प्रकाशात आणले आहे. प्रा. स. शं. माळी तिचा शब्दकोश तयार करीत असून त्यांनी अहिराणीत बरेच काव्यलेखनही केले आहे.

नमुना
यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याना शेपले मुडना काटा. तो सांगे, ‘नाइभाऊ, नाइभाऊ, मना काटा काड दे.’ ‘नै भाई,’ म्हने, ‘मी काय तुना काटा काडत नै’ म्हने. ‘नै रे भाऊ’ म्हने, ‘तसे कोठे होवाल ग्ये का’ म्हने. ‘काड त खरी काटा’ म्हने. ‘मङ’ म्हने, ‘आते हट्ट धरस. काडू दे’ म्हने,‘याना काटा काडू दे.’

भाषांतर
एक होता सरडा. तो फिरायचा कुंपणाकुंपणावर. त्याच्या शेपटीत मोडला काटा. तो म्हणायला लागला, ‘न्हावीदादा, न्हावीदादा, माझा काटा काढून दे.’ ‘नाही बाबा’ (न्हावी) म्हणाला, ‘मी काही तुझा काटा काढत नाही’ म्हणाला.‘नाही रे बाबा’ (सरडा) म्हणाला, ‘तसं कुठे झालंय का’ म्हणाला. ‘काढ तर खरं काटा’ म्हणाला.‘मग’ (न्हावी) म्हणाला, ‘आता हट्ट धरतोस. काढू दे’ म्हणाला, ‘ह्याचा काटा काढू दे.’

संदर्भ – मराठी विश्वकोश