पु. ल. देशपांडेचा पहिला चित्रपट – भाग्यरेखा

bhagyrekhaआजचे चित्रपट तंत्रज्ञान आणि त्यांचे विषय सर्वच बाबतीत पुढारलेले आहे. ‘कुमारी माता’ हा विषय ‘क्या कहना’, ‘सलाम नमस्ते’ सारख्या चित्रपटात ग्लॅमरसपणे मांडला जातो आणि नवीन पीढीही कौतुकाने पाहते.

१९४७ च्या काळात हाच विषय अत्यंत प्रभावीपणे ‘भाग्यरेखा’ चित्रपटात मांडण्यात आला. चित्रपटाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे श्री. पु. ल. देशपांडे ह्यांचा हा पहिलाच चित्रपट.सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचे बीज रोवणारा हा चित्रपट पुण्याच्या टापरे बंधूंनी निर्माण केला होता. टापरे बंधू हे कला क्षेत्रात रमणारे कुटुंब. पुण्यातले पहिले नाटयगृह ‘किर्लोस्कर नाटयगृह’ टापरे बंधुंचे होते. त्याच नाटयगृहाचे नंतर ‘वसंत चित्रपटगृहात’ रुपांतर झाले. पु.लं.च्या स्मृतीदिना निमित्त ‘वसंत’ चे सध्याचे संचालक श्री. विलास टापरे यांच्याशी मारलेल्या मनमोकळया गप्पा.

त्या काळात तुम्हाला वेगळया विषयावर चित्रपट निर्माण का करावासा वाटला?
१९४७ साली माझे वडिल श्री. दामोदर लक्ष्मण टापरे ह्यांना ‘कुमारी माता’ हा प्रश्न येणार्‍या वर्षांमधे गंभीर होऊ शकेल असे वाटत होते. त्याच दरम्यान नारायण हरि आपटेंची कथा वाचण्यात आली. तेव्हा त्यांनी आपले बंधू श्री. कृष्णाजी व श्री. गोपाळजी ह्यांच्या सोबत चित्रपट करण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला.

चित्रपटाचे वैशिष्टय सांगाल?
चित्रपटाची प्रमुख भूमिका त्याकाळातील गाजलेले तसेच ‘स्टार’ कलाकार म्हणजेच शांता आपटे, बाबूराव पेढारकर, मधु आपटे ह्यांनी केली होती. चित्रपट तंत्रज्ञान प्रगतशील असावे म्हणून परदेशातून ‘फिल्मस्’ मागवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आजही ह्या चित्रपटाची प्रिंट चांगल्या अवस्थेत आहे.

चित्रपटाची कथा व गीतं नारायण हरी आपटे ह्यांची होती तर संगीतकार होते केशवराव भोळे. त्यावेळचे सामाजिक संदेश देणारे गीत ‘पाहिजे पोटाला भाकरी’ तसेच ‘पाटलाच्या पोरा जरा जपून’ ही शांता आपटेंनी गायलेली गीते अतिशय गाजली होती.

आणाखी एक वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे ह्यांचा हा पहिलाच चित्रपट कथानकापासून ते कलाकारापर्यंत वैशिष्टयपूर्ण असणार्‍या ह्या चित्रपटाचा त्याकाळात खर्च होता. ८०,०००/- तोही वैशिष्टयपूर्णच!

‘पु.ल.’च्या काही आठवणी सांगाल?

bhagyrekha त्यावेळेला बाबूराव पेंढारकरांनी माझे वडिल व काका ह्यांना ‘पुरुषोत्तम’ एक मेहनती व गुणी कलाकार असून त्यास संधी देण्यात यावी म्हणून गळ घातली. नायिकेचा भाऊ म्हणून ‘पु.ल.’ ना भूमिका मिळाली.

पु.ल.देशपांडे आधी नाटकातून काम करतच होते. परंतु ‘भाग्यरेखा’ हा त्यांचा ‘डेब्यू’ चित्रपट. त्यामुळे ‘भाग्यरेखा’बद्दल पु.ल.ना विशेष जिव्हाळा होता. त्यांना हा चित्रपट दूरदर्शनवर तरी दाखविण्यात यावा असे वाटे. पण ते काही होऊ शकले नाही. पण पु.लं.ची छायाचित्रे असणार्‍या पुस्तकात मात्र ह्या चित्रपटातील फोटोंचा सामावेश आहे.

व्हीसीडी वर उपलब्ध करुन देण्यामागची भूमिका काय?

bhagyrekha सामाजिक आणि देशभक्तीचा विषय प्रभावीपणे मांडणारा ‘भाग्यरेखा’ आजच्या काळातही पाहण्याजोगा आहे. ‘निर्भयपणे जगा’ असे हा चित्रपट सांगतो. इंग्रज जरी भारत सोडून गेले तरी आजचे राजकारण आणि भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवून नवीन पीढीने निर्भयपणे जगायला हवे. असे चित्रपट सांगतो.

व्हीसीडी वर उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन म्हणजे नवीन पीढी आणि जास्तीतजास्त लोकांसमोर हा चित्रपट पोहोचवणे. हल्ली चित्रपटगृहात जुने चित्रपट चालत नाही किंवा त्यांना ‘रिपीट’ प्रेक्षक मिळत नाही त्यामुळे व्हीसीडी हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. आज ९४ व्या वर्षी माझे वडिल श्री. दामोदर टापरे ह्यांना नवीन पीढीला हा चित्रपट व्हीसीडी वर देतांना अधिक आनंद होत आहे.

चित्रपट कथानक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अगं बाई.. अरेच्या!

Agabai Arechya माणसाचे मन नेहमी चंचल असते. तोंड बंद असले तरी मनात विचारचक्र सारखं सुरूच असतं. आता दुस-याच्या मनात काय आहे, ते कसं कळणार? आणि त्यातल्या त्यात बायकांच्या मनातलं ओळखणं तर त्याहून अवघड! स्त्रियांच्या मनातलं आपल्याला कळावं असं प्रत्येक पुरूषाला वाटतं. पण हे शक्य नाही. विचार करा…की जर असं झालं तर काय धमाल येईल नाही! वास्तविक जीवनात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट केदार शिंदेने पडद्यावर धमाल रूपात पेश केलीय.

श्रीरंग, त्याचे आई – वडिल, पत्नी, बहीण, आणि आजी असं मध्यमवर्गीय कुटुंब. श्रीरंग एका टूर कंपनीत नोकरीला असतो. ऑफिसात त्याची बॉस एक महिला असते. सहकार्‍यांमध्येही महिलाचेच प्रमाण अधिक. बसस्टॉप, रस्त्यावर येताजाता त्याला सगळया स्त्रिया दिसत असतात. घरातही तोच प्रकार त्यामुळे एकूणच स्त्री वर्गाला तो कंटाळलेला.

त्याच्या गावाकडे बर्‍याच वर्षांनी जत्रेत देवीच्या उत्सवाचे यजमानपद त्याच्या घराण्याला मिळतं अन ते सगळे गावाकडे देवीच्या जत्रेसाठी जातात. तेथे त्याला ‘बगाडा’चा मान मिळतो आणि या सगळया गोष्टींमुळे वैतागलेला श्रीरंग देवीला ‘बायकांच्या मनातलं कळू दे’, असा नवस बोलतो. मग काय, जिकडे पहावं तिकडे त्याला बायकांच्या मनातले विचार ऐकू येऊ लागतात. त्यामुळे त्याच्या त्रासात आणखी भर पडते. नंतर या सगळया गोष्टीचा सकारात्मक विचार करून तो अनेक अडचणींवर मात करतो. हे सगळं करत असताना पडद्यावर जी धम्माल उडते ती इथे शब्दात सांगणे अशक्य. चित्रपटात मध्यवर्ती भूमिका संजयची असल्याने त्याने प्रत्येक शॉटमध्ये कसून मेहनत केलीय. त्याला दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, भारती आचरेकर, सुहास जोशी, शुभांगी गोखले, रसिका जोशी, वैगरे मंडळींनी सुरेख साथ दिली आहे. एकूणच सगळं टीमवर्क चांगलंच जुळून आलंय. मालिकांचा अनुभव असला तरी चित्रपटाला दिग्दर्शित करणं हे थोडं वेगळंच काम आहे. इथे तीन तासात सगळं काही संपवायचं असतं. याउलट मालिकांमध्ये वेळेचं बंधन नसतं, असं असलं तरी नाटक/मालिकांच्या अनुभवाच्या जोरावर केदारने इथे बाजी मारली आहे.

चित्रपटाची सुरूवात गंभीर होत असली तरी हळुहळू हा विषय विनोदाकडे केव्हा झुकतो हे लक्षातही येत नाही आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. सामान्य माणसाच्या साध्या अडचणी, स्त्रियांची दु:ख अतिशय कौशल्याने मांडली आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सोनाली बेंद्रे आणि भरत जाधव यांना एका ‘आयटेम’ गाण्यापुरतं घेण्यात आलंय आणि हे गाणं हिदींत आहे हे विशेष! असं असूनही एक मराठी चित्रपट म्हणून या गाण्याचा अगं बाई…..वर विपरित परिणाम होत नाही. याशिवाय ‘वेड लाऊन गेला’, ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधाने मोहरते’ आणि ‘उदे गं अंबे उदे’ ही गाणी चांगलीच जमून आली आहेत.

चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन या बाबी केदारनेच सांभाळल्या आहेत. छायांकन, गीत, संगीत, ऍक्शन वगैरे तांत्रिक बाबीही चांगल्या जमल्या आहेत. बऱ्याच दिवसांनी मराठी रसिकांनी एक चांगला विनोदी चित्रपट बघायला मिळतोय, जरूर पहा!
गावकरीच्या सौजन्याने