अरूपडै वीडू

arupaidu नाशिक येथील लेखन, वाचन आणि शास्त्रीय संगीताची आवड असणा-या संवेदनशील व्यक्तिमत्व लाभलेल्या लेखिका सौ. अरुंधती जोगळेकर यांनी साहित्यातील एका वेगळया, प्रवास वर्णनाच्या प्रांतात यशस्वीरित्या मुशाफिरी केली आहे. साहित्यातील अनेक नामवंतांनी प्रवास वर्णन हा प्रांत हाताळला पण त्यातील सगळेच त्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत. सौ. अरुंधतीबाईचे पुस्तक पुस्तकाच्या नावापासूनच वाचकांचे चित्त आकर्षून घेते. पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचे नावही अरुपडै वीडू असे आहे. व त्याचा खुलासा लेखिकेने पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात केला आहे. बारा ज्योतिर्लिंगे, महाराष्ट्रातील अष्टविनायक, समर्थांचे अकरा मारूती तशीच तामिळनाडूतील मुरूगनाची म्हणजे कार्तिकेयाची सहा सुप्रसिध्द पवित्र क्षेत्रे. पुस्तकावर सुरेख मुखपृष्ठ आहे. पुस्तकात प्रवास वर्णन असल्याने नकाशाचा वापर, तसेच प्रत्येक ठिकाणाचे स्थानमहात्म्य, तिथल्या देवालयांचा इतिहास, व काही मनोरंजक अनुभव लेखिकेने दिला आहे. प्रत्येक प्रकरणानंतर शेवटी सहलीचा काळ लेखिकेने नमूद केला आहे.

वेगवेगळा प्रवास केलेल्या ठिकाणांमध्ये वैविध्य असल्याने, प्रवासवर्णन असूनही पुस्तक कंटाळवाणे झालेले नाही. पुस्तकात सजलेली अरण्ये, हिरवे डोंगर, खोल द-या, शुभ्र धवल हिमशिखरे, धबधबे, शांत सरोवर, धरणे, कालवे, भव्य मंदिरे, पान फुले, पक्षी, प्राणि, शेतभाते, फळझाडे, उद्यान, मैदाने, आदिवासींच्या झोपडया, श्रीमंतांचे प्रासाद, संस्थानिकांचे राजवाडे, साधूसंतांचे आश्रम, कलादालने, नाटयगृह, हॉटेल इत्यादींचे मनोज्ञ वर्णने आहेत. यात माणसाने तयार केलेला तसाच ईश्वराचा कृपाप्रसाद अशा दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यांचे वर्णन आहे. भ्रमण भ्रमंतीत, भटकंतीला अतिदुर्लभ असा आत्मसाक्षात्कार भटक्याला होतो व त्याचे नेमके वर्णन लेखिकेने केले आहे. पुस्तकात भेटलेल्या अनेक व्यक्तींची रुपेही लेखिकेने स्थळ वर्णनाबरोबरच साकार केलेली आहेत. सहलीतील अनुभवाने मनुष्य कृतार्थ व संपन्न होतो व खूप काहीतरी घेऊन घरी येतो. त्याचबरोबर आणकी खूप काही आणले म्हणजे मातृभूमीचा अनुभव प्रसाद तो कुठे ठेवताच येत नाही. व संपतही नाही केव्हाही त्याची आठवण करावी आणि पुन्हा पुन्हा मनमुराद सेवन करावा व ते करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे काम या पुस्तकाच्या रूपाने लेखिकेने केले आहे. त्यामुळे लेखिकेची या साहित्यातील आगळयावेगळया क्षेत्रातली मुशाफिरी यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल.

– प्रमोद रानडे

पुस्तकअरूपडै वीडू – एक चित्तवेधक प्रवासवर्णन
लेखक – सौ. अरुंधती जोगळेकर
प्रकाशक – अरुंधती प्रकाशन, नाशिक
किंमत – रु.१५०/-

टिप – ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.