अल्याड – पल्याड

alyad-palyad गेल्या काही वर्षात जागतिकीकरणानंतर एकूणच मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही विस्तारला. ‘वडिली जे निर्माण केले। ते पाहिले पाहिजे।’ सा समर्थवचनाला अनुसरून देश आणि जग पाहण्याची, त्यासाठी पर्यटन करण्याची, पैसे खर्च करण्याची मानसिकता झाली.

‘अल्याड-पल्याड’ हे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इग्लंड व न्यूझीलंड, युरोप इ. देशात प्रवासानिमित्त व नातेवाईक असल्यामुळे तिथे रहायला आलेल्या दैनंदिन जीवनातील अनेकविध अनुभवांवर आधारलेल्या लेखांचे संकलन आहे. लेख वेगवेगळया विषयांवरील असून त्या त्या देशातील वैशिष्टयपूर्ण चालीरीती, सामाजिक दृष्टीकोन, जीवन जगण्याच्या विविध तर्‍हा, सण, करमणूक यांचे बारकावे दर्शविणारे आहेत.

संगणकाचा प्रसार व प्रचार वाढल्यावर भारतातील अनेक राज्यांतील लोक त्या त्या क्षेत्रातील नोकरी व उद्योगधंद्याच्यानिमित्ताने प्रगत देशांना भेटी देऊ लागले प यथावकाश तिथे कायमचे स्थलांतरितही झाले. भारतात राहणार्‍या अनेक लोकांना भारतीयांनी आपला देश, संस्कृती, नातेसंबंध सोडून परदेशात स्थलांतरीत होण्याचे कारण काय याविषयी प्रश्न पडतो. बहुतांशी लोकांना ही मंडळी ‘निव्वळ डॉलर्ससाठी’ परदेशी जातात, स्थलांतरित होतात असे वाटत असते. प्रत्यक्षात मात्र या देशांमधून वास्तव्य केल्यानंतर भारतीयांना प्रगत देशांतील अनेक गोष्टींची जवळून माहिती होते. अनेक गोष्टींच्या त्या समाजातील प्रथा, प्रचलित पध्दती जवळून पहायला व अनुभवायला मिळतात. हे अनुभव घेतल्यानंतर प्रगत देशांतील सुख-सुविधा, नियमांचे पालन करणे, नोकर्‍यामधील अपरंपार संधी, श्रमाची प्रतिष्ठा, लाचलुचपतीचा अभाव, शैक्षणिक दृष्टीकोन, सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून मिळणारी वागणूक, शिस्त अशा हजारो गोष्टींचे सुरुवातीला आश्चर्य व अप्रूप वाटते. कालांतराने त्यामुळे जीवन किती सुखाने व अधिक समृध्दपणे जगता येते याची जाणिव होत. यथावकाश त्यांची सवय होऊन जाते.

या पुस्तकातील सर्व अनुभव सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातीलच आहेत् त्यांच्याशी वाचकांनी आपले अनुभव पडताळून पाहिले की जीवनातील बारीकसारीक पैलूंमुळे या देशांतील सर्वसामान्य माणूसही कितीप्रगती करू शकतो व ती का करू शकतो याची कल्पना येईल.

पुस्तकातील लेखन विविध विषयांवर असले तरी सर्वसाधारणपणे परदेशातील मंदिरे व तिथे साजरे केले जाणारे भारतीय सण, आरोग्य, नोकर्‍यांचे प्रकार, कला, तेथील सण, प्रवासाच्या सोयी, ज्येष्ठ नागरिकासाठीच्या सोयी व विविध क्षेत्रांतील सामाजिक संकल्पना या विषयांमध्ये त्यांचे वर्गीकरण करता येईल. यातील अनेक संकल्पना व धोरणे आपल्याला भारतातही राबविता येतील का, याचा विचारही जरूर व्हावयास हवा.

देशी-परदेशी असणा-या भारतीयांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकअल्याड – पल्याड
लेखक – कल्याणी गाडगीळ
प्रकाशक – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत – रु २००/-