वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाहीत तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्णतया जबाबदारी संपादकाची असते. ‘फॅक्ट्स आर सेक्रेड बट कॉमेंट्स आर फ्रि’ या पॉल स्कॉट यांच्या सुप्रसिध्द वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते. म्हणूनच वृत्तपत्रात अग्रलेखाचे महत्त्व वादातील मानले जाते.
अग्रलेखांचा सम्यक् परिचय वृत्तविद्याकलेच्या विद्यार्थ्यांना करुन देणारा ‘अग्रलेख : एक संवाद माध्यम’ हा डॉ. विनिता परांजपे लिखित ग्रंथ त्यांच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे. तो पुण्याच्या मानसन्मान प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी दैनिकातील ग्रंथाच्या रुपाने प्रकाशित झालेल्या अग्रलेखांचा अभ्यास करुन त्यांवरील महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी मांडले आहेत. संशोधनात आचार्य अत्रे, अनंत भालेराव, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, निळकंठ खाडिलकर यासारख्या नामवंत संपादकांच्या अग्रलेखांचा समावेश आहे व एक संवाद माध्यम म्हणून या अग्रलेखांची चिकित्सा त्यांनी केली आहे.
या काळात ग्रंथबध्द झालेल्याच अग्रलेखांचा परामर्श लेखिकेने या ग्रंथात घेतला असल्याने पां. वा. गाडगीळ, ह. र. महाजनी, प्रभाकर पाध्ये, ग. त्र्यं. माडखोलकर, वालचंद कोठारी असे अनेक नामवंत संपादक या परामर्शातून आपोआपच बाद झाले आहेत. तशात लेखिकेने पुणे, मुंबई, औरंगाबादच्याच प्रमुख संपादकांपुरता अभ्यास सीमित राखल्यामुळे, विदर्भ प्रांतातील नागपूरहून निघणाऱ्या तरुण भारतचे तेव्हाचे संपादक मा. गो. वैद्य यांच्या अग्रलेखांचाही परामर्श यात नाही.
तरीही वृत्तपत्रविद्येच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त वाटेल. मराठी वृत्तपत्रांतील अग्रलेखांचे संज्ञापन कितपत प्रभावी असते, त्यांतील संदेश कितपत प्रभावीपणे पोचतो, या संवादप्रक्रियेत कोणकोणत्या प्रकारचे विषय हाताळले जातात, इत्यादि पैलूंचा परामर्श लेखिकेने या पुस्तकात उत्तम घेतला आहे. अरुण साधू यांची प्रस्तावनाही मननीय आहे.
मूलमंत्र –
फोकस ऑन ऍप्लीकेशन
नाते विश्वासाचे (Management By Trust)
आंतरिक प्रेरणा (motivation from within)
एकमेकां साह्य करु (Power of Collaboration)
कर्मचारी मूल्यविधान
कारकीर्दीय उन्नती
सकारात्मक आमनासामना (Constructive confrontation)
स्वत:च स्वत:चा स्पर्धक बना. (Competing with self)
गुणवृध्दीचा परीसस्पर्श (Adding Value)
पुस्तक – अग्रलेख – एक संवाद माध्यम
लेखक – डॉ. विनिता परांजपे
प्रकाशक – मानसन्मान प्रकाशन
किंमत – रु. १०० रुपये
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
‘नकळत सारे घडले’ या माझ्या नाटकाचा प्रयोग ठाण्यामध्ये, गडकरी रंगायतनमध्ये दुपारी. प्रयोग सुरु व्हायला चाळीस – पंचेचाळीस मिनिटांचा अवधी. इतक्यात एक अतिशय साधा तरुण माझ्या पुढयात येवून उभा. हातात एक पुस्तक. माझ्यासमोर शांतपणे धरत म्हणतो, ‘सर हे पुस्तक ! मी लिहीलंय ! तुम्हाला भेट द्यायला आलोय ! माझी एकच इच्छा आहे. ती आत पहिल्या पानावर लिहीलीए.’
मी पुस्तक घेतो, नांव वाचतो. नांव असतं…………..
माझा (नकोसा झालेला) देश.
खटकन कसलं तरी ‘बटन’ माझ्या मेंदुत ऑन होतं. आमचे स्नेही श्री. रामदास फुटाणे यांची आठवण होते. या लेखकाचं त्या लेखकाशी वैचारिक असं काही नातं असावं, असं वाटायला लागतं.
क्षणभरच. पण वाटतं.
मी पुस्तक उघडतो. आदरयुक्त भाषेत पुस्तक मला भेट दिल्याचा नेहमीचा मजकुर दिसतो. तारीख असते आणि वाचून अभिप्राय लिहावा, अशी प्रेमळ विनंती असते. खाली सही, फोन नंबर्स वगैरे. तो निरोप घेतो. खात्रीनं की मी अभिप्राय देईनच!
दोन – तीन दिवसांनी त्याचा फोन. ‘सर वाचलंत ?’ मला एकदम आठवण होते. पुस्तक माझ्या टेबलवर गेले २-३ दिवस समोरच. पण मी कामाच्या व्यस्ततेत हातही लावू शकलेलो नसतो मला माझी शरम वाटते. पण मी त्याला खोटं सांगत नाही. नाही वाचलं अजून, पण वाचतो आणि लिहीतो असं सांगून मी फोन ठेवतो. थोडया वेळाने आहे, तरी काय बघू या, म्हणून मी पुस्तक उघडतो. काही मजकुर वाचतो आणि मी जरा सावध होतो. वाचताना अचानक मनात येतं, फुटाणे आणि मनिष जवळ जवळ एकाच ‘नाळेचे’ असावेत. पण त्यावेळी फोन खणखणत असतात, दिवसाचा जगातल कोलाहल माझ्या कानावर आदळत असतो आणि मनात विचार येतो, आत्ता नाही, पण रात्री ! कितीही उशीर झाला तरी आज रात्री वाचायचं. त्या शांततेतच वाचूया.
त्या रात्री अडीच वाजता मी घरी येतो. सर्व आवरुन मी पुस्तक उघडतो आणि त्या नीरव शांततेतही माझ्या डोक्यात घंटानाद सुरु होतो. प्रत्येक पानागणिक कुठून तरी घणाचे घाव डोक्यावर, मनावर, बधीरतेवर बसताहेत असा भास व्हायला लागतो.
लक्षात येतं मनिषची लेखणी आक्रमक नसली, मृदू असली, तरी माझ्यात खूप आंत आंत टोचणारी आहे. काही वेळानं पानागणिक हे टोचणं असह्य होत असतं तरी अधिकाधिक टोचून घ्यावंसं वाटायला लागतं.
त्या दुखण्यांत एक आत्मियता वाटायला लागते. कारण ही लेखणी कुणाला दोष देत नाही, कुणावर आसुड ओढत नाही, स्वत:बद्दलचे गोडवे गात नाही. वैचारिक सिध्दांत मांडत नाही. ती फक्त विचारते. स्वत:ला आणि वाचकाला ! आणि मग संवेदनशील, वाचकही स्वत:ला मनातल्या मनात का होईना विचारायला सुरुवात करतो. मी माझे मलाच प्रश्न विचारणं सुरु केलेलं आहे हे मलाही आत्तापर्यंत समजायला लागलेलं असतं.
हे सगळं कशाने झालेलं असतं ? असं काय मोठं असतं त्या पुस्तकात ? तर ती असते एक रीऍसेस्मेंट. लेखकाची, वाचकाची, पुस्तकात लेखकाशी संवाद साधलेल्या ख-याखु-या व्यक्तिमत्वांची, गावाकडल्या १०-१२ वय असलेल्या मुलांची, स्टेशनवरच्या हमालाची, शहरातल्या प्रतिष्ठित अशा डॉक्टर्सची, एखाद्या नातवाची, एखाद्या आजोबांची, शिक्षकांची, मागास विद्यार्थ्यांची, साधूची, रस्त्यावरचे कागद गोळा करणा-या भिकारी मुलांची, व्याख्यात्यांची, प्रोटेक्टेड आयुष्य जगणा-या पांढरपेशांची, ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याची फक्त चाल ऐकणा-यांची, शिवाजीराजे, आंबेडकरांचे पुतळे बनविणा-या कलावंतांची, गुंडांची, पोलिसांची, राजकारण्यांची, शंकराची पिंड दुभंगू नये म्हणून जखमी होणा-या अस्लमची, शाळेतल्या शहाण्या भाबडया मुलांची, ‘भारत देश माझा आहे’ म्हणणा-यांची, गर्दीत मरुन पडलेल्या प्लॅटफॉर्मवरील प्रेताची आणि क्रिकेटची मॅच बघतांना धुंद होऊन ते प्रेत पायाखाली अजाणतेपणी का होईना तुडविणा-या गर्दीची ! सगळया सगळयांची रीऍसेस्मेंट म्हणजे मनिष गुंजाळ या सत्शिल, तरुण आणि भाबडया अशा लेखकाचं हे पुस्तक ! वाचता वाचता आपण स्वत: अंतर्मुख होवून जातो. स्वत:च स्वत:ला विचारलेल्या प्रश्नांमध्ये बुडून जातो.
पुस्तक संपल्यावर एक रुदन सुरु होतं आपलं आतल्या आंत ! असं वाटतं अजुनही वेळ गेलेली नाहीए. होईल तितकं करायला हवं. केवळ स्वत:साठी नाही तर इतरांसाठी जगायला हवं. शिकता आलं पाहिजे इतरांसाठी जगणं ! मग समाज आणि देशाकरता जगणं म्हणजे काय ते प्रत्येकाला समजत जाईल.
त्या जगण्याचा आदर्श म्हणजे या देशाचा, कोणत्याही जाती धर्माचा-वर्ग-वर्णाचा-भाषेचा असला तरी सीमेवर उभा असलेला सैनिक.
पुस्तक – माझा (नकोसा झालेला) देश
लेखक – मनिष गुंजाळ
प्रस्तावना – विक्रम गोखले
प्रकशक – विदिशा प्रकाशन
किंमत – रु. १५० (अभिवाचनाच्या ऑडीओ सी.डी. सह)
टिप : ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.