श्री मच्छिंद्र पवार यांचा काव्यसंग्रह: ‘वेदांतपर्व’ सौंदर्य, प्रेम या गोष्टी कवी मनाला सहजी भुरळ पाडतात. आपल्या अंतरातल्या स्पंदनांनी जो इतरांच्या हृदयात कंपने जागी करतो, तोच खरा कवी होय. ‘वेदान्तपर्व’ ह्या काव्यसंग्रहामधे ब-याच ठिकाणी आपल्याला वरील अनुभव येतो. कवी मच्छिंद्र पवार यांच्या एकूण साठ कवितांचा हा काव्यसंग्रह ‘ऋतुगंध प्रकाशन’ने प्रकाशित केला आहे.
अनेक सामाजिक, वैयक्तिक, राष्ट्रीय तसेच क्रांतीचे विषय ‘वेदान्तपर्व’ च्या केंद्रस्थानी असल्याचे आढळून येतात.
‘जगणं म्हणजे जगणं म्हणजे
दुसरं तिसरं काही नसतं
हसत हसत राहणं असतं
मोग-यासारखं फुलणं असतं
नदी किनारी फिरणं असतं
झुळकेवरती शहारणं असतं
उध्वस्त होणारं घरटंसुध्दा
ओल्या वाळूत बनवणं असतं’
ओघवती भाषा, सहज सुंदर प्रतिकांची योजना यामुळे श्री. मच्छिंद्र पवार यांच्या कविता वाचनीय ठरल्या आहेत. मनातल्या श्रध्दां उध्वस्त होण्यातील वेदना, जगण्याच्या नावेचा सुकाणू मोडल्याची वेदना, उत्कट प्रेमानुभवामध्येच इतर सा-या वेदनांचा उपाय शोधण्याची धडपड हा कवी करताना दिसतो.
‘दणदणा दणाणले
खणखणा खणाणले
हिंदुस्थानचे वीर आता
विजयासाठी सरारले
कारगीलच्या भूमीवरचे
हात आता सळाळले
संसदेच्या धरणीवरचे
रक्त आता उसळले’
… ११ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या संसदेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ केलेल्या कविता देखील या काव्यसंग्रहामध्ये सापडतात
‘झोपलात काय, जागे व्हा….
आपल्यांतले भेंद आता संपुष्टात येऊ द्या’
असे सांगणा-या ह्या कवीच्या जाणीवा तरल आहेत. समाजातील भेडसावणाऱ्या समस्यांचे याला भान आहे, हे यावरून दिसून येते.
‘असा मी तसा मी
जसा आहे, तसाच मी
काल होतो शून्य
आज झालो असंख्य
काल होती आशा
आज झाली निराशा
काल होतो प्रवाहात
आज आहे सागरात
काल शून्यांत असंख्य होतो
आज असंख्यात शून्य झालो
असा मी, तसा मी…’
ह्या वरील अभिव्यक्तिची एक कवी म्हणून दिसून येणारी परिपक्वता पुढील ओळींतून दिसते.
‘सूर्याच्या उजेडात
अंधार आम्ही पितोय
माणसांच्या गणवेशात
गाढव म्हणून जगतोय’
किंवा, ‘का धराव्यात आशा
विझलेल्या विस्तवाकडून
…विस्तव पेटण्याच्या
फुललाच तो तर
धुपण्यासाठी असेल
…जळण्यासाठी नव्हे’
जाणवणे आणि मग ते शब्दबध्द करणे यातील अंतरातही काव्याची उत्कटता कमी होऊ न देण्याची हातोटी श्री. मच्ंछिद्र पवार यांना लाभली आहे. प्रेमानुभवातील स्पष्टपणा, सरळ साधेपणा हा त्यांच्या भाषाशैलीतून देखील डोकावतो.
‘तुझ्या नयनांतील माझेपण
तू माझ्यापासूनच लपवतेस
पण तुझ्या त्या निष्फळ प्रयत्त्नांत
ते अधिकच प्रकटतंय…’
‘मेहंदीच्या प्रेमात’ या कवितेमध्ये, नजरानजर झाल्यावर तिचं हसणं नजरेत भरतं आणि त्यातून होणारी एका गोष्टीचीच जणू सुरवात-
‘विश्व नित्य पडलं मागं ! मंतरलेलं जग वेगळं !
क्षणांत त्या मला भावलं, सत्य, सुंदर, मंगल सगळं !’
अशी प्रेमात पडल्याची हळुवार, काव्यात्म कबुली हा कवी देऊन टाकतो. ओघवती भाषा आणि अनुभव घेण्याची आपली अशी खास शैली या ‘वेदांतपर्व’च्या जमेच्या बाजू आहेत. विषयांच्या वैविध्याच्या दृष्टीकोनातून या कवीने आपल्या पहिल्याच काव्यसंग्रात बरीच मजल मारली आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या ह्या पहिल्या वहिल्याच काव्यसंग्रहाला ज्येष्ठ संगीतकार श्री. यशवंत देव यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. श्री. यशवंत देव श्री. मच्छिद्र पवार यांना लिहीलेल्या पत्रात म्हणतात, ‘झपाटल्यागत तुमचा हा सर्व उन्मेष आहे. त्यातून काही मंगल सृजन व्हावं आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु’ अशी तुमची इष्ट कामना आहे. हे संगळं शुभ आहे. तुमचा हा पहिलाच प्रयत्त्न आहे, आणि तो वाचकांना आश्वस्त करणारा आहे…’ अशा या नवोदित कवीस मराठीवर्ल्डकडून ही शुभेच्छा…
पुस्तक – वेदांतपर्व
लेखक – मच्छिद्र पवार