न्युझीलंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया हा शेजारी देश सर्वार्थांने जवळचा झाला. आवाक्यात आला. अनेक न्यूझीलंडर्स आयुष्यात काही वर्षांसाठी ऑस्ट्रेलियात जाऊन राहतात व न्यूझीलंडला परत येतात. अनेक भारतीय लोकही परदेशी स्थायिक होण्याच्या इराद्याने न्यूझीलंडमध्ये येतात व शेवटी अधिक पैसा कमवण्यासाठी तसेच आपापल्या क्षेत्रातील चांगली नोकरी व करियरच्या दृष्टीने पुढे ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक होतात. न्यूझीलंडहून विमानाने केवळ तीन – चार तासांच्या अंतरावर असलेल्या या देशाचे न्यूझीलंडशी असलेले नाते अनेक पदरी आहे. कारखानदारी, रग्बीच्या खेळाडूचे संघ व त्यांच्यातील अटीतटीची स्पर्धा, खाद्यपदार्थांची दोन्ही देशात आपपसात होणारी आयात – निर्यात, सुट्टीत ऑस्ट्रेलियाच्या गरम समुद्र किनार्यांची मजा लुटण्यासाठी न्यूझीलंडमधून ऑस्ट्रेलियात जायचे, तर कारखान्यांनी गजबजलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शहरांतून न्यूझीलंडच्या निसर्गसुंदर समुद्रकिनार्यांवर निवांतपणे वेळ घालविण्यासाठी ऑस्ट्रेनियनांनी न्यूझीलंडला यायचे आणि हे केवळ माणसेच करतात असे नाही. न्यूझीलंडमध्ये जन्मलेला प्रत्येक गॅनेट नावाचा पक्षी जन्मल्यानंतर कोणतेही प्रशिक्षण नसताना, सहजप्रवृत्तीला जागून, न्यूझीलंडहून ऑस्ट्रेलियाजवळील टास्मान समुद्राकडे उडत जातो. या लांबच्या प्रवासात तो जगला – वाचला तर पुन्हा उडत न्यूझीलंडला येतो आणि नंतरच जोडीदार शोधून आपली प्रजा निर्माण करतो, असे हे या दोन भूप्रदेशाचे नाते.
या सगळया गोष्टी ऐकून – वाचून साहजिकच आमची ऑस्ट्रेलियाला जाण्याची इच्छा होती. ती अगदी सहजपणे पूर्ण झाली. कोणताही नवा देश पाहायला जाण्याआधी त्याविषयी वाचन करून तिथे काय पाहायचे, त्याचे महत्त्व काय याविषयीची पूर्वतयारी करण्याची बहुतेक सर्वांचीच पध्दत असते. त्यानुसार आम्हीही ऑस्ट्रेलियाविषयी वाचन केले होते. औस्ट्रेलियात असलेल्या काही मराठी मित्र – मैत्रिणींकडून अनौपचारिकरीत्या बरीच माहिती मिळविली होती.
प्रत्यक्षात हा देश पाहतांना व अनुभवतांना आधी गोळा केलेल्या माहितीच्यापेक्षा तो अनंत पटीने सुंदर, प्रचंड विविधतेने नटलेला आहे. याची क्षणोक्षणी प्रचिती येत गेली. जसजसा हा देश पाहत व अनुभवत गेलो, त्याविषयीची अधिकाधिक माहिती वाचत गेलो तसतसे या देशाचे नैसर्गिक सनातनत्व, या देशातील विविध पशु – पक्षी – वनस्पती या देशाची भव्यता मनाला थक्क करून सोडू लागली.
ऑस्ट्रेलियात एकीकडे पराकोटीचा रूक्ष असा वाळवंटी प्रदेश आहे, तर दुसरीकडे भर दिवसा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकणार नाही अशा घनदाट जंगलाचा (रेनफॉरेस्ट) प्रदेश आहे. जगातील सर्वांत सुंदर व आसपासच्या अगदी सपाट भूभागातून, जमिनीतून आश्चर्यकारकपणे वर आलेला एकसंध, केशरी रंगाने उन्हात रसरसणारा खडक ‘उलरू’ येथे आहे. जगातील सवाधिक विषारी असलेल्या सर्पांपैकी दहा अतिविषारी सर्पांची जन्मभूमी व वस्ती येथे आहे. भयानक सर्पच नव्हे तर अतिविषारी कोळी, मरणवेदना परवडली अशा वेदना नुसत्या स्पर्शासरशी देणारे ‘बॉक्स जेलीफिश’ नावाचे जलचर, ‘ब्ल्यू रिंग्ड ऑक्टोपस’ नावाचा भयानक विषारी जलचर (जो चावला तर श्वसन अशक्य होऊन माणूस मरतो), ‘पैरालिसिस टिक्स’ नावाच्या एका प्रकारच्या पिसवा (ह्या चावल्यास अर्धांगवायू होऊ शकतो), समुद्रात किंवा तळयात पोहायला गेले असता मगरीने हल्ला चढविला किंवा मगरीमुळे मृत्यू अशा बातम्या देणारी वृत्तपत्रे… सगळेच विस्मयकारक! मुळात ब्रिटीशांनी १७८७ साली गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तुरूंग म्हणून निवडलेला हा त्यावेळचा पूर्णत: अपरिचित भूप्रदेश. या देशाची सुरूवातच ‘तुरुंग’ या बदनामीने झालेली. पण त्यानंतर या खंडाचा शोध घेणार्या धाडसी मानवांच्या थक्क करणार्या साहसी सफरी, या देशाने केलेली औद्योगिक प्रगती, हार्बर ब्रिज व सिडनी ऑपेरा हाऊस सारख्या मानवी अभियांत्रिकी व कलेचे दर्शन घडविणार्या अप्रतिम कलाकृती…
पंधरा दिवसांच्या सुट्टीत आख्खा देश पाहणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही जे प्रत्यक्षात पाहिले व अनुभवले त्या गोष्टींचे वर्णन या पुस्तकात आहे. पण त्याचबरोबर त्या त्या ठिकाणांचे महत्त्व विशद करणारी माहिती, तत्संबंधीच्या ऐतिहासिक गोष्टी, मनोरंजक किस्से, धाडसी कथा ठिकठिकाणी घातल्या आहेत. त्यामूळे या पुस्तकाचे अंतरंग बहुरंगी झाले आहे. संपूर्ण देशाची व त्यातील सर्व ठिकाणांची माहिती या पुस्तकात नाही. पण या देशाची संपूर्ण प्रातिनिधिक माहिती मात्र खचितच यात मिळेल.
या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रवास करणार्यांना अनेक थक्क करणार्या अनुभवांचे साक्षीदार होता येईल. प्रवास न करता नुसते वाचन करणार्यांना घरबसल्या ऑस्ट्रेलियाची वारी घडेल.
पुस्तक – ऑस्ट्रेलिया – एक पुढारलेला अतिप्राचीन देश
लेखक – कल्याणी गाडगीळ
प्रकाशक – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत – रु. १६०/-