नम्रता नावाप्रमाणेच नम्र आणि दुसर्यांची काळजी घेणारी होती. प्राणी, पक्षी व झाडांबद्दल तर तिला विशेष प्रेम होते. त्यांच्या बंगल्याबाहेरच्या छोटयाश्या बागेत तिच्या आईने लावलेल्या फुल – झाडांची काळजी नम्रता घ्यायची. झाडांवर येणार्या कीटकांचे, पक्षांचे ती निरीक्षण करायची. किती किती नवीन गोष्टी तिला कळायच्या. शाळेत दर आठवडयाला त्यांना पर्यावरणाचा एक नवीन प्रोजेक्ट करावा लागायचा. कधी ‘बी’तून उगवणारे झाड बघायचे, वेगवेगळया आकाराची पानेगोळा करायची, कधी जवळच्या शेतात पेरणी, कापणी पाहायला जायचे तर कधी पक्षांचे निरीक्षण करायचे. ह्या आठवडयातला त्यांचा प्रोजेक्ट अगदी वेगळा होता. पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. त्याची तयारी त्यांच्या स्वाती टीचरने मार्च महिन्यातच सुरू करायला सांगितली.
सगळया मुलांना सर्वप्रथम घरात असतील त्या प्लॅस्टीकच्या पिशव्या गोळा करायला सांगितल्या. मुलांनी त्याप्रमाणे घरातल्या पिशव्या टीचरांकडे सुपूर्त केल्या. टीचरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांनी त्यात माती भरून वेगवेगळया झाडांच्या आणि शोभेच्या झाडांच्या बिया मातीत रूजविल्या. वर्गातल्या प्रत्येक मुलाला दहा पिशव्या देण्यात आल्या. टीचरांनी सांगितले ” आता तुम्ही या दहा झाडांचे आई – बाबा आहात, तुम्ही त्यांची रोज काळजी घ्यायची”. नम्रता तर इतकी खुश झाली, तिला खरोखरचं आई झाल्यासारखे वाटत होते. तिने त्या पिशव्या आपल्या बागेत बेताचे ऊन लागेल अशा जागी नेऊन ठेवल्या. दररोज नम्रता सकाळी उठल्या बरोबर त्यांना पाणी घालायची. त्यांच्याशी बोलायची आणि कोंब कधी फुटतील ह्याची वाट पाहायची….
त्यांच्या टीचरांनी अजून एक गोष्ट करायला सांगितली. मे महिन्यात आंबे खाल्यावर त्याच्या कोयी फेकायच्या नाहीत. त्यांची सुध्दा प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये घालून रोप तयार करायची. त्याप्रमाणे नम्रताच्या घरी सगळेचजणं आंबे खाऊन झाले की सगळया कोयी जमा करून पिशव्यांमध्ये रूजवून ठेवायची. अश्याप्रकारे नम्रताने जांभळाच्याही बिया रूजवून ठेवल्या. होता होता पंधरा दिवस उलटले…..
त्यादिवशी सकाळी नम्रता नेहमीप्रमाणे बागेत गेली आणि आनंदाने जणू वेडीच झाली. पिशव्यां मधल्या सहा बियांना कोंब फुटले होते. नम्रताने जोरातच आई – बाबांना हाक मारून इवलेसे हिरवे दाखवले. त्यांनाही खूप आनंद झाला.
जून महिन्यात शाळा उघडल्यावर नम्रता आणि तिच्या वर्गातले सारे मित्र – मैत्रिणी झाडांबद्दलच चर्चा करत होते. आता प्रत्येकाच्याच पिशवीत कोंब फुटले होते. होता होता पाच जून- जागतिक पर्यावरण दिन उजाडला. आज शाळेत आल्यापासून प्रत्येकालाच उत्सुकता होती. स्वाती टीचरांनी सगळयांना शाळेच्या बसमध्ये आपआपल्या झाडांच्या पिशव्या घेऊन बसायला सांगितले. आता बस निघाली शहराच्या बाहेर असाणा-या डोंगराच्या दिशेने. नम्रताच्या शहराबाहेर डोगंर होता आसपासचे लोक त्याला खंडोबाचा डोंगर म्हणायचे. गेल्या काही वर्षात आजूबाजूच्या लोकांनी डोंगरावरची झाडं तोडून डोंगर अगदी बोडका केला होता. आज शाळेतली मुलं तो परत हिरवागार करण्याच्या दिशेने पावले उचलणार होती.
पायथ्याशी बस थांबल्यावर मुलांनी झाडांच्या पिशव्यासकट डोगंर चढायला सुरूवात केली. स्वाती टीचर प्रत्येकाला मदत करत होत्या. आता प्रत्येक मुलांने आपली झाडे ओळीने डोगंरावर लावली. नम्रतानेही अगदी काळजीपूर्वक आंबा, जांभूळ, कडुनिंबाची रोपे लावली. प्रत्येक झाडांमध्ये वाढीसाठी आवश्यक अंतरही सोडले. सारी मुले चिखलाने छानपैकी माखली होती. इतक्यात आकाशात ढग गडगडायला लागले. टीचरांसकट मुलांनी टाळया वाजवल्या, आरोळया ठोकल्या. पहिल्या पावसाचे थेंब मुलांबरोबर, रूजवलेल्या झाडांवरही पडले. आता ही झाडे मोठी होणार ह्या आनंदात मुले बसच्या दिशेने जाऊ लागली. इतक्यात स्वाती टीचरांना ठेका धरला, ”एक तरी झाड लावू या हो, एक तरी झाड जगवू या” मुलांनीही त्यांना साथ दिली. अशा तर्हेने नम्रताने अनोख्या रितीने पर्यावरण दिन साजरा केला.
– भाग्यश्री केंगे
विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने ‘हुर्रे’ ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली.
सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ”मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे.” मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना ” हर हर महादेव” म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते.
जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली.
संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ”आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? ” मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या.
टिचरांनी कारण समजावत सांगितले, “विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल”. “कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? “मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.
– भाग्यश्री केंगे