वेध खगोलाचा

khagol वाढत्या शहरीकरणामुळे आजुबाजूच्या इमारतीच्यामधून दिसणा-या आकाशाच्या तुकडयाकडे मान वर करून बघायलाही अनेकांना फुरसत नसते. मोजके काहीजण हौशीने आकाश निरीक्षण करत असले तरी अनेकांचा ग्रहता-यांशी संबंध फक्त पत्रिकेपुरताच असतो. विज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या शोधांमुळे अधिकाधिक सुखसोयींचा उपभोग घेतांनाही आपल्याकडे अंध्दश्रध्देचं प्रमाण मोठं आहे. विशेषत: ग्रहण,धुमकेतु याबाबत खूप अंध्दश्रध्दा आहेत. म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीचा अभाव आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी खगोलशास्त्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रा. गिरीश पिपंळे यांनी लिहिलेले ‘वेध खगोलाचा’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त माहिती देणारे आहे. खगोल ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धा परींक्षामुळे या विषयाची लोकप्रियता वाढत असली तरीही, हा विषय सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावा, तसेच केवळ छंद म्हणून याकडे न बघता करीअर म्हणूनही खगोल अभ्यासक विद्यार्थ्यांनी या विषयाकडे बघावं. हा लेखकाचा उद्देश या पुस्तकामुळे निश्चितच सफल होण्यास मदत होईल.

ग्रहता-यांचा अभ्यास, निरीक्षण करणा-यांना आपल्या पृथ्वीव्यतिरिक्त कुठे जीवसृष्टी असेल का, याबद्दल कुतूहल फार पूर्वीपासून आहे. पुस्तकात सुरूवातीच्या चार छोटया प्रकरणात परग्रहावरच्या जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमा, याने, उपकरणे, दुर्बिणी, जीवसृष्टींची शक्यता असलेले ग्रह, उपग्रह अशी माहिती यात आहे. सॅगिटॅरस तारका समूहाच्या दिशेने आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी संदेशामुळे तसेच मंगळावरचा खडक अशनी रूपात पृथ्वीवर आल्याच्या शास्त्रज्ञांच्या घोषणेमुळे उडालेली खळबळ अशी रंजक माहितीही यात आहे.

खगोल अभ्यासात पदार्थ विज्ञान व गणिताबरोबरच निरीक्षणातलं सातत्य, चिकाटी, अचूक नोंदी हे अत्यंत आवश्यक असतं. खगोलीय घटनांच्या अशा अभ्यासावरून भविष्यातील घटनांची कल्पनाही पूर्वजांनी केली. मानव खगोलातील कुतूहलांविषयी आजही जाणून घेतोय, विविध ग्रहांच्या अभ्यासाठी यानं पाठवतोय तो या निरीक्षणाच्या पायामुळे. शनीच्या चंद्रावर (टायटन) २००५ साली कॅसिनीहायगेन्स यान उतरले. त्या यानाने ७ वर्षांपूर्वी पृथ्वीवरून उड्डाण केले. आधी शुक्राच्या दिशेने झेपावत, त्याच्या गुरूत्वाकर्षणाचा फायदा करून घेत ऊर्जा मिळवून ते शनीजवळ पोहोचले. तिथे घिरटया घालत निरीक्षण करून मग ते टायटनवर उतरले अशी सारी शास्त्रीय तरीहीअतिशय सोप्या भाषेतली विविध मोहितांची माहिती या पुस्तकात सुटसुटीत प्रकरणांतून देण्यात आली आहे. अंतराळ दुर्बिणवेब, अंतराळातही कच-याचे ढीग, सूर्य एक कुतूहल, कृष्णविवर, चंद्रावरती वेधशाळा, विश्वाचा नकाशा, नेपच्यूनवर हि-यांचा पाऊस, स्टारडस्ट मोहिम, लघुग्रहांचा वेध, वेध दीर्घिकांचा, हबल दुर्बिणीने घडविलेले विश्वरूप दर्शन, अशा भागात हा माहितीचा खजिना विभागला आहे. अशनी पातामुळे ऑस्ट्रेलियात निर्माण झालेले विवर, शुक्रांचे अधिक्रमण, मंगळ आला पृथ्वीच्या भेटीला अशा खगोलीय घटनांची माहिती यात आहे.

तारा ‘तुटतो’ का? शुक्र ‘तारा’ आहे? धूमकेतूचं दर्शन ‘अशुभ’ असतं? अशा अनेक गैरसमजांचे, प्रश्नांचे निराकरण केलेले आहे. प्लुटो हा ग्रह नसून त्याच्या अभ्यासाअंती त्याला आता ‘बटूग्रह’ म्हणण्यात येते अशा ताज्या घटनांची माहिती, दैनंदिन जीवनात खगोल शास्त्राचा संबंध तसेच खगोल शास्त्रज्ञ होण्यासाठी उत्सुक असलेल्यांना मार्गदर्शन या पुस्तकात आहे. महत्त्वाच्या काही खगोलीय घटना, वस्तू यांची छायाचित्रे आहेत. खगोलसंस्था, विद्यापीठे, संशोधन केंद्रे यांची नावे तसेच खगोल शास्त्रातील इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्दही दिलेले आहेत. मराठी भाषेत खगोलविषयक पुस्तके खूपच कमी आहेत. ही उणीव या पुस्तकाने बरीच भरून निघेल. खगोल शास्त्राची आवड असणा-यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

पुस्तकवेध खगोलाचा
पुस्तक परिचय – प्रा. गिरीश पिंपळे
प्रकाशक – श्रीविद्या प्रकाशन, पुणे
किंमत – रु. १००/-