खरा उपदेश

Updesh एका गावात एक शेतकरी रहात होता. त्याला खंडू, बंडू, गुंडू व पांडू अशी चार मुलं होती. मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली मुलबाळ झाली. मुलं वडिलांना कामात मदत करत होती. तरी खर्‍या कष्टाची त्यांना जाणीव नव्हती. शेतकर्‍याला नेहमीच चिंता वाटायची. आपल्या मागे ह्या मुलांचे कसे होणार शेतकरी आजारी पडला. बरं न वाटण्याची चिन्ह दिसु लागली. त्यांनी मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितल, ‘बाळांनो मी काही आता फार दिवस जगत नाही. मी तुम्हाला चार गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा व मी मेल्यावर तसेच वागा’.

मुलांना वाईट वाटलं पण वडिलांची शेवटची इच्छा तरी काय हे जाणुन घ्यायलाच हवं होते , ते म्हणाले, ‘ बाबा काय सांगणार आहांत सांगा. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागू असे वचन देतो’.

शेतकरी म्हणाला, ‘ हे बघा, मी गेल्यावर रोज गोड जेवा, मऊ बिछान्यावर शांत झोपा. उन्हातून कधीही जाऊ नका व गांवोगांवी घर बांधा. ह्या चार गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही’. थोडयाच दिवसांनी शेतकरी देवाघरी गेला. मुलांना वाईट वाटले. वडिलांचे, दहावाबारावा सर्व व्यवस्थित केलं ह्या चार गोष्टींची त्यांना आठवण आली त्यांनी घरात सांगितलं, ‘ऐकलंत कां बाबांच्या इच्छेप्रमाणे रोज जेवणात गोड करत जा. आपल्या गाद्या नवीन चांगला कापूस घालून मऊ मऊ करून घ्या’ दारापासून शेतापर्यंत त्यांनी मांडव घातला उन्हातून जाऊ नका असं सांगितलं होतं. तिन्ही गोष्टी जमल्या पण चवथीच काय करायचं त्यांना काही कळेना.

मित्राच्या मृत्युची बातमी ऐकुन शेतकर्‍याचा जीवाभावाचा मित्र मुलांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी आला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या मुलांनी आपली शंका विचारली. ‘काका बाबांच्या सांगण्याप्रमाणे तिन्ही गोष्टींची अंमलबजावणी आम्ही ताबडतोब सुरू केली. पण काका गांवोगांव घरं कशी बांधणार? शक्य तरी आहे कां?

काका हसले म्हणाले, ‘ मुर्खांनो, तुम्हांला बाबांच्या म्हणण्याचा अर्थच कळला नाही. उद्या पहाटे उठा आणि माझ्याबरोबर शेतावर चला. तिथे सांगतो मी काय करायचे ते’.

मुलं दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठली. सूर्योदयाचे आधीच शेतावर जायला निघाली. जातांना घरातल्या बायकांना सांगीतले दुपारी १२ वाजतां शेतावरच कांदा, भाजी भाकरी असे जेवण पाठवून द्या. एकदम संध्याकाळीच घरी येऊ. सर्वजण शेतावर आले. काकांनी त्यांना कुदळ फावडी घेऊन शेतात काम कारायला सांगितले दुपारी १२ वाजेपर्यंत काम करून मुलं दमली खूप भूक लागली होती. कांदा भाकर खूपच गोड लागली. विश्रांतीसाठी झाडाच्या सावलीत उशाला दगड घेऊन झोपली आणि काय आश्‍चर्य रोज झोप न येण्याची तक्रार करणार्‍या सगळयांना गाढ झोप लागली. थोडया वेळांनी उठुन पुन्हा कामाला सुरवात केली.

सूर्यास्तानंतर सगळे घरी परतले. खूपच दमली होती, तरी काकांभोवती गोळा झाले गावोगावच्या घरांचे काय ते विचारायचे होते. काका म्हणाले, ‘अरे, तुमच्या बाबांच्या सांगण्याचा हेतुच तुम्हाला कळला नाही. उन्हातून जाऊ नका म्हणजे उन्ह पडायच्या आत शेतावर जा व मावळतीला घरी परता. शेतात दमल्याने साधे जेवणही मिष्टान्नासारखे गोड लागले व शेतात दमल्यावर जिथे पडाल तिथेच मऊ गादीवर पडल्यासारखे छान झोप लागेल. आता गावोगाव घर बांधा ह्याचा अर्थ कसा की शेजारी पाजारी जवळ पासचे गांवकरी सर्वांशी इतक्या आपलेपणाने वागा, ह्यांचे आपल्या घरी, आल्यावर अगत्याने आदरातिथ्य करा ते परततांनी म्हणतील या आमच्या घरी रहा चार दिवस संकोच करू नका घर तुमचेच आहे’.

आज मुलांना चारी गोष्टींचा खरा अर्थ कळला. ते वडिलांनी सांगितल्यासारखे वागू लागले, कष्ट करू लागले. व ते खर्‍या अर्थाने जीवनात आनंद मिळवू लागले.

– सुमती निगुडकर

अमोल क्षण

प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.

एका पत्रकाराने विचारले, ‘आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?’ खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, ‘आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, ‘कोण आपण? मी ओळखलं नाही’.

‘साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला’.

खांडेकर म्हणाले, ‘कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय’.

– विनया साठे

← आजीच्या गोष्टी मुख्यपान